अ‍ॅलन टय़ुरिंग या ब्रिटिश गणितज्ञाचे संगणक विकासातील योगदान फार महत्त्वाचे आहे. टय़ुरिंगने १९३०-४० च्या दशकात निव्वळ गणितावर आधारलेल्या तर्कशास्त्राने सिद्ध केले की, ज्या गणनविषयक कामासाठी क्रमवार प्रणाली (अ‍ॅल्गोरिदम) मांडणे शक्य आहे, त्या कामांसाठी वैश्विक गणनयंत्र तयार करणे शक्य आहे. टय़ुरिंगने तयार केलेल्या अशा सैद्धांतिक (आणि काल्पनिक) संगणकाला ‘टय़ुरिंग यंत्र’ असे म्हटले गेले. टय़ुरिंगच्या या यंत्रात एक अनंत लांबीची पट्टी (म्हणजे नंतरच्या संगणकातील कागद!) बसवलेली होती आणि त्यावर एकामागोमाग एक चौरस काढलेले होते. या चौरसांत ० आणि १ हे आकडे लिहिलेले असत. हे आकडे क्रमाक्रमाने वाचले जाऊन, त्यानुसार आज्ञावलीतील विविध पायऱ्या पार केल्या जात. आधुनिक संगणकसुद्धा एखादे गणित सोडवण्यासाठी ० आणि १ या अंकांवर आधारलेल्या भाषा वापरतो आणि टय़ुरिंग यंत्राप्रमाणेच क्रमवार पायऱ्यांचा वापर करतो. त्यामुळेच आजचा कुठलाही संगणक घेतला तरी त्याचा वैश्विक टय़ुरिंग यंत्राशी मेळ बसतो.

टय़ुरिंग यंत्राने भविष्यातील संगणकांच्या आज्ञावलीमागील तर्कप्रणाली स्पष्ट केली. टय़ुरिंगचे हे यंत्र विविध अटींनी बंदिस्त केलेल्या विविध फलांची (फंक्शन) उत्तरे शोधू शकत होते, तसेच विविध बहुपदींची (पॉलिनॉमिअल) मुळे आणि ‘पाय’सारख्या स्थिरांकांची अपेक्षेइतक्या अचूकतेची मूल्ये काढू शकत असे. विदा (डेटा) किंवा सूचना साठवून ठेवण्याच्या कल्पनेचा उगमही टय़ुरिंगच्या यंत्रातच आढळतो. टय़ुरिंगने असेही सिद्ध केले की, आपल्या आज्ञावलीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यानंतर, टय़ुरिंग मशीन कधी थांबेल याचा आरंभीच भाकीत करणारा अ‍ॅल्गोरिदम विकसित करणे शक्य नाही; याला ‘हॉल्टिंग प्रॉब्लेम फॉर टय़ुरिंग मशीन’ असे म्हणतात. सैद्धांतिकदृष्टय़ा संगणकाची ही मर्यादा मानली जाते.

टय़ुरिंगने आपले हे संशोधन ‘लंडन मॅथेमेटिकल सोसायटी’च्या शोधपत्रिकेत १९३६ आणि १९३७ साली प्रकाशित केले व संगणकयुगाचा पाया घातला. टय़ुरिंगने अमूर्त संगणकाला त्या वेळी उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मर्यादेत प्रत्यक्ष आकारही दिला. ‘बॉम्बी’ नावाचा असा संगणक तयार करून आणि गणिती पद्धत वापरून त्याने दुसऱ्या महायुद्धात जर्मन नौदलाचे पकडलेले सांकेतिक संदेश उकलून दाखवले. जर्मन पाणबुडय़ांचा वेध घेणे त्यामुळे ब्रिटिश नौदलाला शक्य झाले, ज्यामुळे दुसरे महायुद्ध लवकर संपले, असे म्हटले जाते.

– डॉ. विवेक पाटकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org