20 February 2019

News Flash

जे आले ते रमले.. : उद्यमशील पारशी समाज

पारशांनी व्यापाराबरोबरच दलालीचा (ब्रोकर) व्यवसायही मोठय़ा प्रमाणात केला.

पारशी समाज

आठव्या शतकात दक्षिण गुजरातमधील स्थानिक राजा जदी राणाने आश्रय दिल्यामुळे, इराणमधून धार्मिक छळाला त्रासून आलेली पारशी जमात, त्या भागात प्रथम निर्वासित म्हणून राहू लागली. पहिली ८०० वर्षे शेती हाच व्यवसाय करणारे हे पारशी पुढे सूरत, नवसारी, मुंबई वगैरे ठिकाणी व्यापार करू लागले. सचोटीने व्यापार आणि उद्यमशीलता या त्यांच्या उपजत गुणांमुळे आर्थिक सुबत्ता मिळवलेला हा समाज भारतीय समाजात समरस झाला. पारशी समाजाच्या उद्यमशीलतेतून उद्योजकांची अनेक घराणी प्रस्थापित झाली आहेत. सोराबजी, कामा, मोदी, वाडिया, जीजीभॉय, रेडीमनी, दादीशेठ, पेटिट, पटेल, मेहता, टाटा वगैरे पारशी उद्योजक घराण्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

पारशांनी व्यापाराबरोबरच दलालीचा (ब्रोकर) व्यवसायही मोठय़ा प्रमाणात केला. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख ब्रोकर पारशीच होते. ब्रोकर व्यवसायातल्या सचोटीमुळे ब्रिटिशांनी पारशांना ‘सेठ’ ही उपाधी दिली. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे ब्रोकर हाऊस पूर्णपणे पारशी लोकच चालवीत होते. चीनबरोबर लाकूड, अफू, कापूस यांचा व्यापार पारशी लोकांनीच सुरू केला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुतेक मालवाहू जहाज कंपन्यांचे मालक पारशीच होते.

पारशी लोक भारतीय संस्कृतीत समरस झाले, इथलेच झाले याचे कारण त्यांच्या झोराष्ट्रियन संस्कृतीचे भारतीय वैदिक संस्कृतीशी असलेले साम्य हे असू शकेल. झोराष्ट्रियन पंथाचा पवित्र धर्मग्रंथ ‘आवेस्ता’ हा आवेस्तन भाषेत लिहिलेला आहे. अहुरा मज्दा ऊर्फ होरमज्दा ही त्यांची देवता. त्यांच्यात अग्नीला ईश्वरपुत्र समान पवित्र मानले जाते. अग्नीच्या माध्यमातून हे लोक होरमज्दाची आराधना करतात. त्यांच्या मंदिरांना ते ‘आतिश बेहराम’ म्हणतात.

बहुतेक पारशी उद्योगपतींनी स्वतच्या धर्मादाय संस्था सुरू करून शैक्षणिक संस्था, इस्पितळे सुरू केल्या आहेत. लोककल्याणाची कामे करण्यात तर पारशी समाज इतर भारतीय समाजांपेक्षा पुढेच आहे. नरिमन पॉइंट, सर फिरोजशहा मेहता रोड, जे. जे. हॉस्पिटल, सर जे जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर वगैरे मुंबईतल्या ठिकाणांना, रस्त्यांना आणि सार्वजनिक संस्थांची नावे या कर्तृत्ववान आणि लोक कल्याणकारी पारशी व्यक्तींच्या नावानेच दिलेली आहेत.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

First Published on February 5, 2018 2:56 am

Web Title: entrepreneurial parsi society