News Flash

पर्यावरण

२०२० सालच्या सदराचा विषय आहे- ‘पर्यावरण’! हे सदर चालवण्यासाठी सद्य:काळापेक्षा आणखी योग्य काळ नाही.

आपणा सर्वाना २०२० या नवीन वर्षांच्या शुभेच्छा! गेल्या वर्षी या सदरात विज्ञानातील शोधांबद्दलची माहिती अनेक लेखकांनी आपल्यासमोर आणली. त्या सदराचे संयोजन डॉ. राजीव चिटणीस यांनी केले होते. नेहमीप्रमाणे सदरातील सर्व लेखांचे वाचकांनी भरभरून स्वागत केले. कित्येकांनी सदर लेखकांना खासगीत पत्रे लिहून तो विषय आणखी समजावून घेतला. या सदरात मर्यादित शब्दांतील लेखांतून त्या-त्या विषयासंबंधी तुमचे कुतूहल जागृत करणे हे आमचे काम आहे. ते एकदा जागृत झाले की, तुमच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. त्यांनी तुम्हाला स्वस्थ बसू देता कामा नये आणि त्या विषयातील आणखी काही वाचावयास वाटावे.

२०२० सालच्या सदराचा विषय आहे- ‘पर्यावरण’! हे सदर चालवण्यासाठी सद्य:काळापेक्षा आणखी योग्य काळ नाही. भारताच्याच काय, जगातल्या सगळ्या मोठय़ा शहरांतली हवा प्रदूषित झालेली आहे. मागच्या वर्षी सुरू झालेला पाऊस संपेचना. मराठवाडय़ात ऑक्टोबपर्यंत पाऊसच नव्हता आणि तेथे कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागणार होता, तेवढय़ात परतीचा पाऊस सुरू झाला; आणि तो एवढा झाला की, आता ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. भारतातील जंगलाखालची जमीन चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. कोकणात समुद्राचे पाणी गावात शिरले. कुठे तिवरांची झाडे तोडल्याने असे झाले, तर कुठे आणखी काही कारण घडले. देशभर एवढी अस्वच्छता आहे, की पंतप्रधानांना स्वच्छतेची मोहीम चालू करावी लागली. उष्णता काबूत ठेवण्यासाठी ‘कार्बन फूट पिंट्र’चे कार्यक्रम जगभर सुरू करावे लागले. जागोजागची तळी-विहिरी बुजवल्याने आणि नद्यांची गटारे केल्याने पाण्याची टंचाई सुरू झाली. अशा वेळी या सदराद्वारे माहिती देणे आणि जागृती करणे असे दुहेरी काम आम्ही करू इच्छितो. यंदा या सदराचे संयोजन प्रा. विद्याधर वालावलकर करणार आहेत. सदरात वर्षभर पर्यावरण दिन, पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरण चांगले राहावे म्हणून जागतिक पातळीवर होत असलेले प्रयत्न.. अशा नानाविध गोष्टी वाचायला मिळतील. यातून तुमचे कुतूहल जागृत व्हावे, अशी अपेक्षा!

– अ. पां. देशपांडे मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 3:50 am

Web Title: environment akp 94
Next Stories
1 मैत्री
2 ‘मागोव्या’चा मागोवा..
3 मेंदूशी मैत्री : स्त्री आणि पुरुष
Just Now!
X