विकासाच्या हव्यासापोटी वाढत चाललेल्या कबरेत्सर्जनामुळे (कार्बन इमिशन) जागतिक ऋतुमानातही बदल (ग्लोबल क्लायमेट चेंज) वेगाने होत आहेत. अनेक देशांनी ‘ऋतुमान आणीबाणी’ (क्लायमेट इमर्जन्सी) जाहीर करून या संकटांचा सामना करण्याचे कार्य सुरू केले आहे. जागतिक पातळीवर चर्चा करून उपायांची कठोर अंमलबजावणी करण्याकडे कल आहे. भारताचे धोरण याबाबतीत सशक्त आहे; परंतु अर्धशिक्षित ग्रामीण भागात पर्यावरणीय समस्यांचे आकलन व त्या अनुषंगाने येणारी कर्तव्ये यांचेही आकलन होणे हे एक मोठे आव्हान आहे. दुर्दैवाने भारतात स्थानिक भाषेत शिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची व ते देणाऱ्या शिक्षणसंस्थांची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे. खरे तर मातृभाषेतील शिक्षण प्रभावी असते हे जगमान्य आहे; भारतात मात्र- जागतिक पातळीवर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घ्यायला हवे, ही समजूत दृढ होत चालली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानात झपाटय़ाने प्रगती होत आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांचे धोरण विज्ञानाची परिभाषा स्थानिक भाषेत रूपांतरित करण्यासाठी फारच तोकडे पडते आहे. आज इंग्रजी तांत्रिक शब्दांचे एतद्देशीय भाषांतील पर्याय शोधण्याची व असे शब्द समाजमानसात रुळविण्याची नितांत आवश्यकता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विज्ञान-तंत्रज्ञान शब्दसूची स्थानिक भाषांमध्ये तयार करण्यासाठीच्या आयोगाची स्थापना करूनही हे कार्य हव्या त्या वेगात होत नाहीये.

पर्यावरणशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र असून त्यात विज्ञान-तंत्रज्ञानविषयक अनेक शाखा, तसेच मानवीय विज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेकविध शाखांतील ज्ञानाचा वापर होतो. विकासासाठी हाती घेतल्या जाणाऱ्या मोठय़ा उपक्रमांसाठी सरकारमान्य संस्थांकडून ‘पर्यावरण आघात निर्धारण’ करवून घेणे अनिवार्य आहे. स्थानिक सुनावणीही अपेक्षित आहे; परंतु स्थानिकांच्या आकलनशक्तीच्या बाहेरील निव्वळ तांत्रिक/ पारिभाषिक संज्ञांच्या वापरामुळे त्यांची परिणामकारकता अत्यंत कमी होते.

त्यामुळे अशा संज्ञा मराठीत रुळविण्याचे प्रयत्न आपण सर्वानी हाती घेऊ या. शालेय शिक्षणापासून सार्वजनिक उपक्रमांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी पर्यावरणविषयक संज्ञांची ओळख मराठीतून करून देणे आणि त्याबद्दल जनजागृती होईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. उच्चशिक्षित घटकांनी याबाबत पुढाकार घ्यायला हवा. ‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्ताने या प्रयत्नास सुरुवात करू या!

 डॉ. पुरुषोत्तम काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org