पर्यावरण म्हणजे आपल्या परिसराशी असलेले आपले नाते. हे नाते अनेकदा आपल्याला जाणवत नाही इतके सहज असते. आपल्या परिसरातील निसर्गाशी आपले नाते असते, तसेच आपल्या परिसरातील अनैसर्गिक गोष्टींशीही आपले नाते असते. परिसरातील या सर्व गोष्टींशी जुळवून घेणे म्हणजे पर्यावरणात्मक वागणे.

‘विज्ञान’ या संकल्पनेशी आपला परिचय शालेय शिक्षणादरम्यान होतो. आता ‘पर्यावरण’ही आपल्या शालेय अभ्यासक्रमात आले आहे. ‘विज्ञान म्हणजे प्रगती’ अशा समीकरणाने आपल्याला विज्ञानाच्या सर्व शाखांचा परिचय सहजपणे होतो. विज्ञान आणि प्रगती हे पर्यावरणाच्या विरोधात आहे, अशा प्रकारची मांडणी सर्वसाधारणपणे केली जाते. अनेकदा विज्ञान आणि प्रगती हे परस्परविरोधी शब्द आहेत, असेही मत मांडले जाते. पण विज्ञान आणि पर्यावरण या गोष्टी एकमेकांच्या विरोधात नाहीत. उलट पर्यावरणाचेही विज्ञान आहे.. त्यास ‘पर्यावरण विज्ञान’ असे म्हणतात. पर्यावरणाचे विज्ञान सर्वसमावेशक आहे. अनेक प्रकारच्या विज्ञानांचा यामध्ये अंतर्भाव आहे. जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र यांसोबतच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, संगणकशास्त्र या सर्व शास्त्रांचा यात समावेश आहे.

पर्यावरण माणसाचे आणि निसर्गाचे नाते जोडते. माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जणू प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे स्वत:शी ठरवले आहे. त्या निर्मितीदरम्यान तो स्वत: हळूहळू निसर्गापासून दूर होऊ लागला आहे. ज्या गोष्टी सहजपणे निसर्गाची निर्मिती म्हणून उपलब्ध होत्या, त्या नाकारून कृत्रिम पद्धतीने त्याने स्वत:साठी सुखसोयी निर्माण करण्याचे ठरवले आहे. यामध्ये तो पृथ्वीवरील सर्व मूलस्रोत निर्वेधपणे वापरत आहे. या स्रोतांच्या अनिर्बंध वापरामुळे ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या अनुपलब्धतेमुळे यापुढील जीवन निसर्गानुकूल राहणे दुरापास्तच. मग कृत्रिम आणि मानवनिर्मित संसाधने वापरल्याशिवाय जगणे शक्य होणार नाही.

माणसाचा इथपर्यंतचा हा प्रवास पाहता, इथून पुढे आपण करत असलेल्या अनेक गोष्टींमध्ये पर्यावरणाचा विचार सातत्याने करायला हवा, आपणच निर्माण केलेल्या प्रदूषणाच्या राक्षसाला संपवण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हायला हवा- म्हणजेच पर्यावरणानुकूल जगण्याचे विज्ञान संशोधित करायला हवे. या सदरातून वर्षभर ‘पर्यावरण दक्षता मंडळ’ या संस्थेच्या सहकार्याने हा प्रयत्न करणार आहोत!

– विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org