सूक्ष्मजीवांच्या विश्वात जिवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि बुरशी, इत्यादींमध्ये दुसऱ्याचे अस्तित्व संपवून स्वतचे अस्तित्व टिकवण्याची धडपड चालू असते. यासाठी ते विविध रसायने निर्माण करीत असतात. ही जैविक रसायने जिवाणूंमुळे झालेल्या संसर्गावरील उपचारांसाठीही उपयुक्त ठरत असून ती प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) या नावे ओळखली जातात. ‘पायोसायानेज’ हे संसर्गावरील उपचारात वापरलेले पहिले प्रतिजैविक असावे. जर्मनीच्या रुडॉल्फ एमेरिश आणि ऑस्कर लो यांनी १८९०च्या दशकात, जखमी रुग्णांच्या संसर्ग झालेल्या बँडेजमधून ‘स्यूडोमोनास एरोगिनोसा’ नावाचे जिवाणू वेगळे केले. या जिवाणूंपासून हिरव्या रंगाचे एक द्रव्य निर्माण होते. या दोन संशोधकांनी या जिवाणूंची द्रव माध्यमात वाढ करून त्यापासून हिरव्या पदार्थाने युक्त असा अर्क काढला. या अर्काच्या सान्निध्यात पटकी (कॉलरा), विषमज्वर (टायफॉइड) यांसारख्या सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जात होती. त्यामुळे हा द्रव त्यांनी औषध म्हणूनही वापरला. परंतु या अर्काच्या मर्यादित यशामुळे त्याचा वापर कालांतराने थांबवण्यात आला.

त्यानंतर अलेक्झांडर फ्लेमिंगला १९२८ मध्ये, ‘स्टॅफायलोकोकस’ बॅक्टेरिया वाढवण्यासाठी ठेवलेल्या एका डिशमध्ये, इतर जिवाणूंची वाढ रोखणाऱ्या एका बुरशीची अनपेक्षित वाढ झालेली आढळली. फ्लेमिंगने या ‘पेनिसिलियम नोटाटम’ बुरशीपासून त्यातले ‘पेनिसिलिन’ हे द्रव्य वेगळे केले व रीतसर औषध म्हणून स्वीकारल्या गेलेल्या या पहिल्या प्रतिजैविकाचा जन्म झाला. फ्लेमिंगला जरी पेनिसिलिनचा शोध अनपेक्षित लागला असला, तरी त्यानंतर अतिशय पद्धतशीर संशोधन करून, जीवाणूंच्या संवर्धनाद्वारे एकामागोमाग अनेक प्रतिजैविके शोधली गेली.

सन १९४० नंतरच्या संशोधनाद्वारे या प्रतिजैविकांची रासायनिक रचनाही कळू लागली, त्यापैकी काही प्रतिजैविकांची रासायनिक संश्लेषणाद्वारे निर्मितीही सुरू झाली. मात्र त्यानंतरही जीवाणूंचा नाश करण्याची त्यांची कार्यपद्धती मात्र समजण्यास गुंतागुंतीची ठरली. १९५० सालानंतर झालेल्या संशोधनात पेनिसिलिनसारखी काही प्रतिजैविक रसायने ही जीवाणूंच्या पेशींवरील आवरण भेदत असल्याचे, तर ‘टेट्रासायक्लिन’ किंवा ‘एरिथ्रोमायसिन’ यांसारखी प्रतिजैविक रसायने त्या जिवाणूंत होणाऱ्या पोषक द्रव्यांच्या चयापचय क्रियेत अडथळा आणत असल्याचे दिसून आले. यातील काही प्रतिजैविके फक्त विशिष्ट प्रकारच्याच जिवाणूंवर परिणाम घडवून आणतात. काही प्रतिजैविके मात्र अनेक प्रकारच्या जिवाणूंचा समाचार घेऊ शकत असल्याचे आढळून आले. ही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या व्याधींवर उपचारांसाठी वापरली जाऊ लागली.

डॉ. रमेश महाजन

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org