उत्तर अमेरिकेतील युरोपियन वसाहतींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य युद्धात १७८१ साली विजय मिळवला. त्यानंतर त्या पहिल्या अमेरिकन वसाहतींना आपले एक संयुक्त सरकार असावेसे वाटू लागले. या तेरा वसाहती एकत्र येऊन त्यांनी त्यांचे फेडरल गव्हर्मेट हा राज्यसंघ तयार केला. त्या राज्यसंघाचे म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या पहिल्या अध्यक्षपदी सर्व वसाहतींमध्ये लोकप्रिय असलेले आणि स्वातंत्र्य युद्धातील कमांडर-इन-चीफ जॉर्ज वॉिशग्टन यांची १७८९ मध्ये नेमणूक झाली. दर चार वर्षांनी अध्यक्षीय निवडणूक घेण्याचा ठराव झाला. जॉर्ज वॉिशग्टन यांचा पहिला कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीतही तेच अध्यक्ष झाले. सन १७८९ ते १७९७ या काळात संयुक्त संस्थानांचे अध्यक्ष म्हणून त्यांचीच निवड झाली. अमेरिकन संयुक्त संस्थानांच्या राजधानीचे शहर प्रथम न्यूयॉर्क हे होते. पुढे या तेरा संस्थानांमध्ये उत्तरेकडील संस्थाने आणि दक्षिणेकडील संस्थाने असे दोन गट तयार झाले. या दोन गटांमध्ये अनेक कारणांवरून वाद सुरू झाले. या वादातूनच फेडरल गव्हर्मेटची राजधानी न्यूयॉर्कहून फिलाडेल्फिया येथे हलवली गेली. पुढे या सर्व तेरा संस्थानांचे एकमत झाले की, राजधानीचे शहर अशा ठिकाणी असावे की, तो भाग कुठल्याही स्टेटमध्ये म्हणजे संस्थानात नसावा पण दक्षिणेकडच्या प्रदेशातच असावा. राजधानीचे ठिकाण निवडण्याचे अधिकार जॉर्ज वॉिशग्टन यांनाच देण्यात आले. जॉर्ज यांनी पोटोमॅक नदीच्या किनारपट्टीत माऊंट व्हेरान ही जागा राजधानीची जागा म्हणून निवडली. त्या जागेजवळच त्यांचे स्वत:चे घरही होते. त्या जागेला ख्रिस्तोफर कोलंबस याच्या नावावरून जॉर्ज वॉिशग्टन यांनी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (डी.सी.) असे नाव सुचविले. उत्तरेकडील वसाहतींचा नेता अलेझांडर हॅमिल्टन आणि दक्षिणेकडील वसाहतींचा नेता थॉमस जेफरसन या दोघांनाही ही जागा आणि डी.सी. हे नाव पसंत पडले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ : प्रो. वि. रा. ज्ञानसागर

प्रो. ज्ञानसागर यांचा जन्म १९१८ साली झाला. त्यांचे शिक्षण कॉलेज ऑफ सायन्स नागपूर (विज्ञान संस्था, नागपूर) येथे झाले. १९४२ साली त्यांनी नागपूर विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण करून विद्यापीठात वनस्पतिशास्त्र या विषयात मेरिट लिस्टमध्ये प्रथम स्थान मिळवले. प्रा. ज्ञानसागर नागपूर विद्यापीठाचे वनस्पतिशास्त्र या विषयाचे पहिले पीएच.डी. होते. १९४६-१९७१ या काळात कॉलेज ऑफ सायन्समध्ये अध्यापन केले. त्याचप्रमाणे १९५१-१९५६ या काळात ते रायपूर येथे कार्यरत होते. येथील वास्तव्यात त्यांनी वनस्पतिशास्त्र विभागाची उत्तम आखणी केली आणि विभागाला वैज्ञानिक साधनसामग्रीने परिपूर्ण केले. प्रा. ज्ञानसागर काही काळ विदर्भ महाविद्यालय अमरावती येथेही कार्यरत होते. १९६२ साली ते विज्ञानसंस्था, मुंबईमध्ये वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांच्या तेथील वास्तव्यात वनस्पतिशास्त्र विभागात सायटालॉजी अँड जिनेटिक्स हा विषय एम.एस्सी.साठी नव्याने सुरू झाला. १९७१ साली स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. रीसर्च आणि पीएच.डी.साठी भ्रूणशास्त्र आणि सायटालॉजी जिनेटिक्स या विषयात मार्गदर्शन केले.

१९५७ ते १९५९ दरम्यान त्यांना परदेशात अभ्यास करण्यासाठी भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा त्यांनी विस्कान्सीन विद्यापीठ, अमेरिका येथील जिनेटिक्स विभागात शोधकार्य केले. परिणामी त्यांना प्रोफेसर डी. सी. कूपर यांच्या मार्गदर्शनात दुसरी पदवी मिळाली. प्रो. ज्ञानसागर यांनी भ्रूणशास्त्र आणि ‘सायटालॉजी जिनेटिक्स’ या विषयात शोधकार्य केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रिकांमधून शोधनिबंध प्रसिद्ध केले.

डॉ. ज्ञानसागर यांना इंडियन बॉटॅनिकल सोसायटीने  १९८० साली व्ही. पुरी सुवर्णपदकाने सन्मानित केले. १९८१ साली झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. १९८३ साली मराठी विज्ञान परिषद, उदगीर तेथे झालेल्या संमेलनात त्यांना वनस्पतिशास्त्रामधील योगदानासाठी विशेष सन्मानित करण्यात आले. त्यांनी वनस्पतिशास्त्रावर मराठीतून लेखनाचे काम केले तसेच व्याख्यानेही दिली. महाराष्ट्र शासनाने वनस्पतिशास्त्रात मराठीमध्ये शब्द असावेत यासाठी एक कमिटी स्थापन केली होती. या कमिटीचे ते चेअरमन होते.

वनस्पतिशास्त्र विषयात भरीव कार्य करणाऱ्या प्रा. ज्ञानसागर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

डॉ. सी. एस. लट्ट,

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org