खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. हे तेल म्हणजे मुख्यत: विविध लांबींच्या हायड्रोकार्बनच्या साखळ्यांचे मिश्रण असते. अशा तेलाचे उर्ध्वपातनाद्वारे शुद्धीकरण करून त्यापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, इत्यादी पदार्थ मिळवतात. जमिनीतून झिरपणाऱ्या खनिज तेलाची ओळख चार हजार वर्षांपूर्वीच जगातील अनेक ठिकाणी झाली आहे. परंतु आधुनिक तेलउद्योगाचा पाया घालणाऱ्या जमिनीतील पहिल्या विहिरी कॅनडात आणि अमेरिकेत १८५८-५९ साली खोदल्या गेल्या. त्यानंतरच्या अर्धशतकात जगभर अनेक तेल विहिरींची उभारणी झाली. १८९६ साली अमेरिकेतील सांता बार्बरा खाडीत खोदल्या गेलेल्या विहिरीद्वारे तेलाच्या सागरी उत्पादनालाही सुरुवात झाली.

१९१० सालापर्यंत खनिज तेलाची मागणी मुख्यत: रॉकेलपुरती मर्यादित होती, परंतु त्यानंतर वाढत्या वाहनउद्योगामुळे पेट्रोलची मागणी वाढली. या पाश्र्वभूमीवर लागलेला, खनिज तेलाच्या ‘क्रॅकिंग’चा (भंजन) शोध अतिशय महत्त्वाचा ठरला. पेट्रोलमधील हायड्रोकार्बनच्या साखळ्या कमी लांबीच्या असतात. खनिज तेलात दीर्घ लांबीच्या अबाष्पनशील साखळ्याही मोठय़ा प्रमाणात आढळतात. या दीर्घ लांबीच्या हायड्रोकार्बनच्या साखळ्या पेट्रोलचा दर्जा खालावतात. क्रॅकिंगच्या तंत्राद्वारे या दीर्घ लांबीच्या साखळ्यांचे रूपांतर पेट्रोल, केरोसिन यांसारख्या पदार्थातील कमी लांबीच्या साखळ्यांत करणे शक्य झाले. त्यामुळे या पदार्थाच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली. अमेरिकेच्या विल्यम बर्टनने विकसित केलेली सुरुवातीची क्रॅकिंगची क्रिया ही औष्णिक स्वरूपाची होती. हे क्रॅकिंग पावणेतीनशे ते चारशे अंश सेल्शियस तापमानाला, वातावरणाच्या सहापट दाबाखाली घडवले जायचे.

याच सुमारास फ्रान्समधील पेट्रोलच्या मर्यादित उपलब्धतेमुळे ह्य़ुगेन हाऊड्री हा फ्रेंच रसायनतज्ज्ञ लिग्नाइट या कोळशापासून पेट्रोल तयार करण्याच्या प्रयत्नात होता. सुरुवातीला यासाठी निकेलवर आधारित उत्प्रेरकांचा वापर करून पाहिला गेला. अखेर ‘फुलर्स अर्थ’ हे मातीचाच एक प्रकार असणारे, अ‍ॅल्युमिनियम व सिलिकेटयुक्त खनिज उत्प्रेरक म्हणून वापरल्यावर हाऊड्रीला लिग्नाइटपासून तयार केलेल्या तेलापासून पेट्रोल मिळवणे शक्य झाले. त्यानंतर हाऊड्रीने याच प्रक्रियेचा अमेरिकेतील एका तेल कंपनीत वापर सुरू केला आणि अधिक दर्जेदार पेट्रोलची निर्मिती सुरू केली. कालांतराने या प्रक्रियेत काही बदल होऊन झिओलाइटसारख्या इतर अ‍ॅल्युमिनियम व सिलिकेटयुक्त पदार्थाचा वापर सुरू झाला. उत्प्रेरकावर आधारलेल्या प्रक्रियेद्वारे तयार केलेले उच्च दर्जाचे हे पेट्रोल विमानांसाठी वापरणेही शक्य झाले.

– प्रा. भालचंद्र भणगे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org