23 February 2019

News Flash

कुतूहल : कार्बनच्या अतिवापराचा भस्मासुर

आजही कोळशाचा वापर मोठय़ा प्रमाणात इंधन म्हणून केला जातो.

पृथ्वीच्या गाभ्यातील कार्बन जीवाश्म इंधनाच्या स्वरूपात आढळतो. तेल, कोळसा, नसíगक वायू, पेट्रोलियम इत्यादी पदार्थ जीवाश्म इंधनाचे प्रकार असून, त्यांचे साठे मर्यादित आहेत. जीवाश्म इंधनांच्या निर्मितीला हजारो वर्षांचा काळ लागतो. भरमसाट उपसा व अतिवापरामुळे त्यांच्या तुटवडय़ाबरोबरच पर्यावरणाचा दर्जाही खालावला आहे. यावर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैवइंधन यांसारख्या अक्षय ऊर्जाचे पर्यायच वसुंधरेचे रक्षण करतील.

आजही कोळशाचा वापर मोठय़ा प्रमाणात इंधन म्हणून केला जातो. संपूर्ण जगात ३० टक्के ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाचे इंधन वापरून निर्माण केली जाते. यामुळे मोठय़ा प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन होऊन हरितगृह वायूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी जागतिक तापमानात वाढ व महासागरांचे आम्लीकरण यांसारख्या गंभीर समस्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. जागतिक स्तरावर कार्बन डाय ऑक्साइड व इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.  या अनुषंगाने केलेले प्रयत्न कार्बन फूटिपट्र, कार्बन क्रेडिट, कार्बन ऑफसेट, कार्बन ट्रेड अशा अनेक संकल्पनांतून दिसून येतात.

मानवनिर्मित प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कृतींमुळे उत्सर्जति होणारे एकूण हरितगृह वायू जे कार्बन डाय ऑक्साइडच्या समतोल टनात मोजले जातात त्याला ‘कार्बन फूटिपट्र’ असे संबोधले जाते.

कार्बन फूटिपट्रचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ‘कार्बन क्रेडिटची’ कल्पना पुढे आली. एखाद्या उद्योगधंद्याला एक टन कार्बन डाय ऑक्साइड अथवा तेवढाच हरितगृह वायू  वातावरणात सोडण्याची मुभा देणारे आíथक साधन म्हणजेच कार्बन क्रेडिट. जर एखाद्या देशाने अथवा समूहाने नेमून दिलेल्या हरितगृह वायूच्या उत्सर्जनाच्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जन केल्यास त्यांना ‘कार्बन क्रेडिट’ प्रदान केले जातात.

एखाद्या उद्योगधंद्याने परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात प्रदूषण केले तर, त्यांनी  न वापरलेले कार्बन क्रेडिट नियामक प्रणालीमार्फत ते दुसऱ्या कारखान्याला विकू शकतात याला ‘कार्बन ट्रेड’ म्हणतात.

कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करणे शक्य नसल्यास पर्यावरणाच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साइडची बचत करणारे अथवा कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेणाऱ्या वृक्षांची लागवड व संवर्धन यांसारखे उपक्रम राबवले जातात, याला ‘कार्बन ऑफसेट’ म्हणतात.

मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on February 6, 2018 2:11 am

Web Title: excessive use of carbon