News Flash

कुतूहल : प्रयोगाधारित गणित

भौतिकशास्त्रात आणि अभियांत्रिकीत वापरलेले गणित हे काही प्रमाणात गणित मानले जात राहिलेले आहे.

कुतूहल : प्रयोगाधारित गणित

सर्वसाधारणपणे गणित हे निव्वळ तर्कशास्त्राच्या मदतीने विकसित करण्यावर भर राहिला आहे. व्याख्या- गृहीतके- प्रमेय- सिद्धता असा तो प्रवास असतो. या प्रक्रियेत किमान शब्द आणि अधिकाधिक गणिती चिन्हे वापरणे यावरही भर असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड आणि बट्र्रंड रसेल यांचा ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ हा काटेकोरपणे मांडलेला ग्रंथ, ज्याची दुसरी आवृत्ती १९२७ साली तीन खंडांत प्रकाशित झाली. त्याच्या एकूण १८७४ पृष्ठांत केवळ एक आकृती आहे आणि जवळपास १२०० पृष्ठांनंतर २+२=४ हे सिद्ध झाले आहे! फळा-खडू, कागद-शिसपेन्सिल आणि कंपासपेटी इतपत साधने वापरून केलेले शुद्ध गणित म्हणजेच खरे गणित; गणक वा संगणक वापरून केलेले गणित हे खरे नाही, असा मतप्रवाह आजदेखील अनेक ठिकाणी ठामपणे रूढ आहे.

तथापि भौतिकशास्त्रात आणि अभियांत्रिकीत वापरलेले गणित हे काही प्रमाणात गणित मानले जात राहिलेले आहे. गणितावर आधारित संभाव्यता सिद्धांत व संख्याशास्त्र हे केवळ ‘उपयोजित गणित’ मानून ते म्हणजे गणित नाही, असा दृष्टिकोन अजूनही आढळतो. या विचारसरणीला छेद देऊन अलीकडे अनेक गणितज्ञ गणिताकडे ‘प्रयोगशील विज्ञान’ या दृष्टीने बघावे असे गंभीरपणे मांडू लागले आहेत. त्याचे एक उदाहरण म्हणजे ‘एक्सपेरिमेंटल मॅथेमॅटिक्स’ ही संशोधनपत्रिका (जर्नल), जी मागील ३० वर्षे अशा वेगळ्या वाटेने वाटचाल करत आहे. त्यात संगणकाधारित अनुकार पद्धतीने (सिम्युलेशन) केलेल्या गणिती प्रयोगांचे वर्णन, आलेखिकी आणि छायाचित्रांवरून अभ्यासलेल्या कल्पना, आकडेवारीवरून काढलेले अंदाज आणि भौतिक प्रयोगांचे विश्लेषण देणारे शोधलेख प्रसिद्ध केले जातात, ज्यांचे पारंपरिक शुद्ध गणिताच्या संशोधनपत्रिकांना सहसा वावडे आहे.

गणितात भौतिक साधनांनी मोठ्या प्रमाणावर प्रयोग केले जाणे अपरिहार्य होत आहे. त्यात संगणकाची बहुआयामी क्षमता कळीची आहे. यामुळे गणिताकडे बघण्याची ‘शुद्धतावादी’ भूमिका बदलणे, काळाची गरज ठरत आहे. खरे पाहिल्यास शुद्ध आणि उपयोजित गणित तसेच काही प्रमाणात मनोरंजनात्मक गणित हे एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत आणि त्यांच्यात दुजाभाव करणे हे सयुक्तिक वाटत नाही. म्हणूनच आता कित्येक विद्यापीठांत ‘गणिती विज्ञान’ (मॅथेमॅटिकल सायन्सेस) अशा व्यापक छत्राखाली शुद्ध व उपयोजित गणित, संख्याशास्त्र आणि प्रवर्तन संशोधन (ऑपरेशनल रिसर्च) अशा गणिती पाया असलेल्या शाखा एकत्रित करण्याचा कल वाढीस लागला आहे. शालेय स्तरावर गणित प्रयोगशाळा उभारणे हे या नवीन विचारसरणीचे द्योतकच आहे. आगामी काळातील गणितज्ञ सैद्धांतिक आणि प्रायोगिक या दोन्ही पद्धती सोबत घेऊन गणिताला पुढे नेतील याचे संकेत स्पष्ट आहेत. – डॉ. विवेक पाटकर  मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 12:00 am

Web Title: experimental mathematics logic assuming theorem perfection akp 94
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : महायुद्ध काळात युक्रेन
2 कुतूहल : गणितशिक्षणाचा नवीन मंत्र
3 कुतूहल : शिक्षणप्रवाह अखंड राहो! 
Just Now!
X