आपण कापड विणताना दोन प्रकारचे धागे वापरतो. एक प्रकार म्हणजे उभा धागा आणि दुसरा प्रकार म्हणजे आडवा धागा, जो उभ्या धाग्याच्या काटकोनात कापडाच्या विणीनुसार गुंतवला जातो. उभ्या धाग्याकरिता जशी पूर्वतयारी करावी लागते तशी आडव्या धाग्याकरिता करावी लागत नाही. चौकडा असलेले कापड किंवा विशिष्ट प्रकारचे कापड यामध्ये आडव्या धाग्याच्या दिशेने काही वेगळा परिणाम साधायचा असेल तर, त्याकरिता एकतर वेगवेगळ्या रंगांचे आडवे सूत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आडवे सूत वापरले जाते. अर्थात या सर्व प्रकारच्या आडव्या सुताची तयारी एकाच प्रकारे करावी लागते.
वाइिडग मशीनवर तयार झालेला कोन आपल्याला मिळाला की त्यावरील सूत मागावर कापड विणण्याकरिता आडवे सूत म्हणून वापरायचे असेल तर मागावर असलेल्या धोटय़ाच्या मध्ये बसेल अशा कांडीवर/ बॉबीनवर हे सूत गुंडाळावे लागते. कांडीची लांबी व जाडी मागावर वापरल्या जाणाऱ्या धोटय़ानुसार लहान/ मोठी असते. सहसा तलम सुताला लहान धोटा व लहान कांडी, तर जाड सुताला मोठा धोटा व मोठी कांडी वापरली जाते. कांडी भरण्याच्या मशीनवर कोनपासून फक्त आवश्यक त्या लांबीचे सूत या मशीनवर गुंडाळून घेतले जाते. एक विशिष्ट ताण देऊन एकसारखे गुंडाळले जाते, जेणेकरून कापड विणताना काही अडथळा येऊ नये. सुतावर दिला जाणारा ताण हा एकेरी सुताकरिता त्या सुताच्या बलाच्या १० ते १५ टक्के एवढा असतो. यापेक्षा जास्त ताण दिल्यास सूत तुटू शकते. त्यामुळे सुतात दोष निर्माण होऊन हे सूत विणाई करताना मागावर जास्त वेळा तुटते आणि सदोष कापड तयार होऊ शकते. त्याचबरोबर मागाचे उत्पादनही घटते हा आणखी एक तोटा आहे.
ही कांडी लाकडाची किंवा प्लास्टिकची असते. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो, पण कांडीला ठरावीक अंतरावर खाचा असतात. त्यामुळे सूत एकमेकांत गुंतायला अटकाव होतो. तसेच कांडीवर सूत एकसारखे गुंडाळले जाते. ही कांडी हातमागावर किंवा यंत्रमागावर विणकर हाताने धोटय़ात बसवतो. तर स्वयंचलित यंत्रमागावर कांडी बसवण्याची यंत्रणा लावलेली असते, त्याद्वारे कांडी बदलली जाते.
महेश रोकडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जुनागढचे विलीनीकरण
११ जुल १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने ‘इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट’ मंजूर करून भारतीय संस्थानांना त्यांच्या अस्तित्वासाठी तीन पर्याय ठेवले : भारतात किंवा पाकिस्तानात विलीन व्हावे, किंवा स्वतंत्र देश म्हणून राहावे. जुनागढ नवाब मुहम्मद महाबत खानजी याने या पर्यायांपकी दुसरा म्हणजे पाकिस्तानात आपले संस्थान विलीन करण्याचा निर्णय घेतला. जुनागढवर या नवाबाचे मुस्लीम पूर्वज गेले दोनशे वष्रे राज्य करीत होते. राज्यातील प्रजा मात्र बहुसंख्य िहदु होती आणि त्या सर्वाना त्यांचे विलीनीकरण भारतात हवे होते. राज्यातील मुस्लीम नेत्यांनीही नवाबाच्या निर्णयाला विरोध केला. लॉर्ड माऊंटबॅटन यांनीही नवाबाला त्याचा निर्णय बदलून स्वतंत्र भारतात सामील होण्याचा सल्ला दिला होता. याला सबळ कारणही होते.
जुनागढ राज्य सर्व बाजूंनी भारतीय प्रदेशाने वेढलेले होते, वेरावळ येथील छोटी समुद्रकिनारपट्टी एवढाच काय तो बाहेरच्या जगाशी संपर्काचा मार्ग असल्याने हे राज्य भारतात सामील होणे हितावह होते. जुनागढचा बहुतेक व्यापार भारतीय प्रदेशाशी होता. नवाब विलीनीकरणाचा निर्णय बदलण्यास तयार होईना हे पाहून भारत सरकारने जुनागढच्या सर्व सीमा बंद करून त्यांचा पुरवठा, व्यापार बंद केला. राज्यातली जनताही नवाबाविरुद्ध आंदोलने, मोच्रे काढू लागल्यावर स्वतच्या जिवाच्या भीतीमुळे नवाबाने आपले कुटुंबीय, स्वकीयांसोबत कराचीत पलायन करून तिथेच हंगामी सरकार स्थापन केले.
इकडे वल्लभभाई पटेलांनी विलीनीकरणाबाबत जनतेला काय हवे याबद्दल जुनागडात जनमताचा कौल घेतला. जुनागढच्या एक लाख नव्वद हजार नागरिकांपकी फक्त ९० लोकांनी आपले राज्य पाकिस्तानात सामील करण्याची इच्छा दर्शविल्यामुळे हा तिढा सुटला!
त्यानंतर ९ नोव्हेंबर १९४७ रोजी भारतीय फौजा जुनागढमध्ये शिरल्या, वल्लभभाईनी सामळदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली जुनागढात हंगामी प्रातिनिधिक सरकार बनविले. पुढे जुनागढ हे मुंबई इलाख्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण बनले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com