अ‍ॅक्टिनिअम या किरणोत्सारी धातूचा शोध दोनदा लागला. मेरी क्युरीच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आंद्रे लुई देबियर्न याने रेडिअम काढून उरलेल्या पिचब्लेंड या खनिजापासून १८९९ साली अ‍ॅक्टिनिअम वेगळा करण्यात यश मिळवले. अंधारात निळ्या रंगाचा प्रकाश देणाऱ्या या धातूला देबियर्नने अ‍ॅगक्टिनॉस म्हणजे किरण किंवा प्रकाश या ग्रीक शब्दावरून अ‍ॅक्टिनिअम असे नाव दिले.

देबियर्नच्या शोधाबद्दल पूर्ण अनभिज्ञ असलेल्या फ्रिडरीश ओटो गिझेल या जर्मन शास्त्रज्ञाने १९०२ साली स्वतंत्रपणे अ‍ॅक्टिनिअम वेगळा काढला. त्याने या धातूला इमॅनिअम असे नाव दिले होते. परंतु नंतर त्याने देबियर्नच्या शोधाच्या प्राथमिकतेस मान्यता दिली आणि देबियर्नचे अ‍ॅक्टिनिअम हेच नाव मान्य झाले.

अ‍ॅक्टिनिअमपासून लॉरेंशिअमपर्यंत म्हणजेच अणुक्रमांक ८९ ते १०३ पर्यंतची मूलद्रव्ये सारखेच भौतिक आणि रासायनिक गुणधर्म दर्शवितात. या आधीचा जसा सारखे गुणधर्म दाखविणारा १५ मूलद्रव्यांचा ‘लॅथेनाइड’ गट होतो; तसाच हा ‘अ‍ॅरक्टिनाइड’ गट. अ‍ॅमक्टिनाइड गटातील अ‍ॅक्टिनिअम ते युरेनिअम ही चारच मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. युरेनिअमच्या पुढची मूलद्रव्ये फक्त प्रयोगशाळेत किंवा अणुभट्टीतच तयार केली जातात. १९४०च्या दशकात अमेरिकेत अणुबॉम्ब निर्मितीच्या काळात यातील बऱ्याच मूलद्रव्यांचा शोध लागला आणि अ‍ॅक्टिनाइड गटाचे अस्तित्व लक्षात आले.

अ‍ॅक्टिनिअम हा चंदेरी पांढऱ्या रंगाचा धातू असून हवेतील ऑक्सिजनशी प्रक्रिया करून पृष्ठभागावर ऑक्साइडचा थर निर्माण झाल्याने काळवंडतो. अतिशय दुर्मीळ असलेला अ‍ॅक्टिनिअम एक टन पिचब्लेंड खनिजात फक्त ०.१५ मिलिग्रॅम इतक्या कमी प्रमाणात आढळतो. इतका दुर्मीळ असल्याने शुद्ध अ‍ॅक्टिनिअम खनिजापासून वेगळा करणे अत्यंत खर्चीक असते आणि म्हणून, रेडिअमवर न्यूट्रॉन्सचा मारा करून त्याची निर्मिती केली जाते.

धातुरूपातील अ‍ॅक्टिनिअमची घनता १०.०७ ग्रॅम प्रति घन सेंमी इतकी असून तो १०५०अंश सेल्सिअसला वितळतो. तीव्र किरणोत्सारी अ‍ॅक्टिनिअम आरोग्यासाठी अति धोकादायक समजला जातो. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कर्करोगासारखा दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. अ‍ॅक्टिनिअमचा प्रमुख उपयोग संशोधनासाठीच केला जातो. त्याच्या तीव्र किरणोत्सारितेचा उपयोग अणुभट्टय़ांमध्ये न्यूट्रॉनचा जनक म्हणून होऊ शकतो. २२५अणुभार असलेले अ‍ॅक्टिनिअमचे समस्थानिक कर्करोगावरील उपचारासाठीही वापरले जाते.

योगेश सोमण,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org