सहज उपलब्ध असणाऱ्या दगडांचा उपयोग जसजसा मानवाला समजला तसतसा मानव वेगवेगळ्या प्रकारची दगडाची हत्यारं तयार करून प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरायला लागला. पण जेव्हा ‘तांबे’ या धातूचा शोध मानवाला लागला तसतसा दगडाचा वापर कमी होत गेला आणि हळूहळू पाषाणयुगाचा अंत झाला. त्याचबरोबर सुरू झालं ते ताम्रयुग!

यानंतर हळूहळू अनेक धातूंचा शोध मानवाला लागला. ज्या पहिल्या दहा धातूंचा शोध मानवाला लागला त्यामध्ये एक धातू होता – बिस्मथ! पण चमकदार चंदेरी रंगाच्या आणि लालसर गुलाबी व इतरही अनेक रंगांच्या छटा असलेल्या या धातूने मानवाला बराच काळ संभ्रमात टाकलं होतं. शिसं, अँटिमनी, कथील हे धातू त्या काळी मानवाला ज्ञात झाले होते. बिस्मथ धातूच्या बाह्यरूपामुळे त्याला त्या वेळी अँटिमनी धातू समजलं जात असे. अरेबियन संशोधकांनी तर त्याला ‘बिइस्मिड’ असं नाव दिलं. ‘बिइस्मिड’ या शब्दाचा अर्थ अँटिमनीसारखा. शिसं, बिस्मथ, अँटिमनी आणि कथील यांच्या काही गुणधर्मात साधर्म्य आढळतं. अल्केमिस्ट-काळात बिस्मथविषयी एक असा समज होता की, बिस्मथ म्हणजे नैसर्गिकरीत्या चांदी तयार होण्याच्या प्रक्रियेतला एक टप्पा आहे. या गैरसमजामुळे बिस्मथला ‘टेक्टम अर्जेण्टी’ म्हणजे ‘चांदी तयार करणारा’ असं संबोधलं जात असे.

पंधराव्या शतकात जर्मन भिक्षू बेसिल व्हॅलेंटाइन याने आपल्या लेखनात बिस्मथचा उल्लेख ‘विस्मट’ असा केला; कारण, जर्मन भाषेत ‘विस्मट’ या शब्दाचा अर्थ ‘पांढऱ्या रंगाचा पदार्थ’ असा होतो. पुढे जॉर्जअिस अ‍ॅग्रीकोला या धातू-खाण तज्ज्ञाने ‘विस्मट’ या नावाचं लॅटिन भाषेत ‘बिसेमटम’ असं रूपांतर केलं. जॉर्जअिस अ‍ॅग्रीकोलाने बिस्मथच्या वेगवेगळ्या गुणधर्माचा अभ्यास केला आणि खनिजापासून बिस्मथ वेगळं करण्याच्या पद्धती सुचवल्या. पण बिस्मथला धातू म्हणून मान्यता मिळाली अठराव्या शतकात; म्हणजेच बिस्मथविषयी माहिती झाल्यावर तीन ते चार शतकांनंतर. जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहानन हेन्रिच पॉट यांनी १७३९ साली आणि फ्रेंचमन फ्रान्स्वां जिओफ्रॉय यांनी १७५३ साली प्रसिद्ध केलेल्या संशोधनकामाच्या आधारे बिस्मथला एक स्वतंत्र धातू म्हणून मान्यता मिळाली.

हेमंत लागवणकर ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org