१९९६ साली जर्मनीतील जी.एस.आय. प्रयोगशाळेत सीगर्ड हॉफमॅन यांनी अणुक्रमांक ११२ चा अणू तयार केल्याचे जाहीर केले. सीगर्ड हॉफमॅन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जड आयन वेगवर्धकात शिसे-२०८ च्या केंद्रकावर जस्त-७०चा मारा केला असता ११२ अणुक्रमांकाचा केवळ एक अणू तयार झाला. पुनप्र्रयोगात २००० साली पुन्हा अशाच एका अणूची निर्मिती दुसऱ्यांदा केली. तत्पूर्वी रशियातील जे.आय.एन.आर. संस्थेने १९७१ साली हे प्रयोग केले होते पण त्यांना अपयश आले. १९९८ पासून रशियाच्या जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेत कोपर्निसिअम- २८३ हे जड समस्थानिक तयार करण्यासाठी प्रयोग सुरू होते. प्रयोगांचे निष्कर्ष खात्रीशीर असल्याशिवाय संशोधनाचे श्रेय दिले जात नाही. जी.एस.आय.ने २००१ आणि पुन्हा २००३ मध्ये ११२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य तयार केल्याचा दावा केला. २००४ साली रिकेन प्रयोगशाळेतील जपानी चमूने याच मूलद्रव्याच्या तीन अणूंची निर्मिती करीत जी.एस.आय.च्या प्रयोगाला दुजोरा दिला. अखेर २००९ मध्ये जी.एस.आय.च्या दाव्याची आयुपॅकने दखल घेतली आणि त्यांना श्रेय देत नवीन मूलद्रव्याला नाव सुचवण्याची अधिकृत विनंती केली.

जी.एस.आय.ने सध्याच्या डिजिटल युगात सदर प्रयोगात भाग घेतलेल्या चार देशांतील २१ संशोधकांशी ई-मेलद्वारे संपर्क साधत, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सूचना व जागतिक रसायनशास्त्र ब्लॉग साइटवरील मतांचा आढावा घेत केवळ चार आठवडय़ांत एकमताने नाव सुचविले. मध्ययुग आणि आधुनिक विज्ञानयुगाच्या उंबरठय़ावरील महान खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकसच्या अतुल्य कार्याच्या सन्मानार्थ ११२ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचे नाव कोपर्निसिअम असे ठेवण्यात आले. तत्पूर्वी मेंडेलिव्हच्या नामकरण पद्धतीनुसार या मूलद्रव्याचे नाव इका-मक्र्युरी(पारा) तर आयुपॅकच्या नवीन मूलद्रव्याच्या नामकरण नियमानुसार अनअनबिअम (ununbium) होते.

कोपर्निसिअम अत्यंत किरणोत्सारी असून त्याची सात समस्थानिके नोंदवली आहेत. सर्वात स्थिर समसाथानिक कोपर्निसिअम-२८५चे अर्धायुष्यमान फक्त ३४ सेकंद आहे. कोपर्निसिअमचे स्थान आवर्तसारिणीत १२ व्या गणात जस्त, कॅडमिअम व पार्याखालोखाल असून रासायनिकदृष्टय़ा तो पाऱ्याशी साधर्म्य दाखवील. परंतु पाऱ्यापेक्षा जास्त अस्थिर असल्याने व सोन्याबरोबरच्या रासायनिक प्रक्रियेत कापरासारखा उडून जाण्याच्या गुणधर्मामुळे सामान्य दाब व तापमानाला तो वायू स्वरूपात असावा असा अंदाज आहे. सद्धांतिक आकडेमोडीवरून या भाकिताला पुष्टी मिळते. असे झाल्यास आवर्तसारणीतील तो पहिला वायुरूपी धातू ठरावा.

– मीनल टिपणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org