पंधरा मूलद्रव्यांच्या लँथनाईड गटातील, प्राप्त करण्यास दुर्लभ असलेले डिस्प्रोझिअम हे एक मूलद्रव्य. अर्हेनीयस आणि गॅडोलिन यांनी सुरू केलेल्या प्रयोगामुळे एक गोष्ट निश्चित झाली की इट्रियामध्ये समान गुणधर्म असलेले अनेक घटक असावेत. परंतु हे नेमके किती मूलद्रव्यांचे मिश्रण आहे यावर बराच काळ वाद चालू होता, अखेरीस एका शतकानंतर इट्रिया नऊ  नवीन मूलद्रव्यांचे मिश्रण असल्याच्या शक्यतेवर रसायनशास्त्रज्ञांचे एकमत झाले. डिस्प्रोझिअम हा त्यापैकीच एक. १८८६मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॉल एमिली यांनी डिस्प्रोझिअमचा शोध लावला पण १९५०पर्यंत डिस्प्रोझिअम वेगळे करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. १९५० साली अमेरिकन-कॅनेडिअन रसायनशास्त्रज्ञ फ्रँक  स्पेडिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आयोवा स्टेट विद्यापीठात आयन एक्स्चेंज क्रोमॅटोग्राफीचे तंत्र विकसित केले आणि त्यानंतर शुद्ध स्वरूपात डिस्प्रोझिअम मिळवण्यात यश आले. आत्ता मात्र आयन एक्स्चेंज क्रोमॅटोग्राफीच्या ऐवजी लिक्विड-लिक्विड एक्स्चेंज ही पद्धत शुद्ध डिस्प्रोझिअम मिळवण्यासाठी वापरली जाते.

अर्बीअम ऑक्साइडच्या विश्लेषणासाठी तीस वेळा केलेल्या प्रयोगाच्या प्रयत्नांतून  डिस्प्रोझिअमचा शोध लागला. या प्रयोगांतील काही प्रयोग पॉल एमिलीने स्वत:च्या घरातील चिमनीवरील (फायरप्लेसवरील) संगमरवरी फरशीवर केले होते. डिस्प्रोझिअम वेगळे करण्यात आलेल्या वेळोवेळी आलेल्या अपयशामुळे, ‘मिळवण्यास कठीण’ अशा अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे नामकरण त्यांनी केले, ‘डिस्प्रोझिअम.’

१९७०मध्ये अमेरिकेच्या नौदल आयुध प्रयोगशाळेत (नेव्हल ऑर्डनन्स लॅबोरेटरी) टर्बिअम, लोह व डिस्प्रोझिअम या धातूंपासून टर्फेनॉल डी (ळी१ऋील्ल’ ऊ) हा मिश्र धातू निर्माण करण्यात आला. १९८०पासून डिस्प्रोझिअमचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. हा मिश्रधातू लढाऊ  जहाजांत वापरतात. ‘टर्फेनॉल डी’ या मिश्रधातूच्या नावामध्ये तीनही मूलद्रव्यांच्या नावांचा उल्लेख आणि प्रयोगशाळेच्या नावाची आद्याक्षरे आहेत.

निसर्गात डिस्प्रोझिअम मुक्त स्वरूपात आढळत नाही. लँथनाईड गटातील इतर मूलद्रव्यांसारखाच तो मोनाझाइट, बास्टनासाइट या खानिजांमध्ये सापडतो. त्याचप्रमाणे झेनोटाइम व फग्र्युसोनाइट अशा अनेक खनिजांत डिस्प्रोझिअम अल्प प्रमाणात सापडतो.

डिस्प्रोझिअमची एकूण सात नैसर्गिक समस्थानिके आढळतात आणि आठ किरणोत्सारी समस्थानिके कृत्रिमरीत्या तयार केली आहेत. डिस्प्रोझिअमची समस्थानिके हा भौतिकशास्त्रातील महत्त्वाचा संशोधनाचा विषय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत या समस्थानिकांचा उपयोग होतो.

मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org