साधारणपणे १८०३ सालापासून लॅन्थॅनाइडच्या गटातल्या एकेका मूलद्रव्याचा शोध लागायला लागला. सिरीअमपासून सुरुवात झाली. १८४० च्या दरम्यान कार्ल मोझ्ॉन्डर यांनी ‘डीडायमिअम’ शोधल्याचा दावा केला. कालांतराने ‘डीडायमिअम’ हे मूलद्रव्य नसून ते मूलद्रव्यांचं मिश्रण असल्याचं आढळलं. मग १८८५ साली कार्ल वेल्सबॅकने, प्रेसोडायमिअम आणि निओडायमिअम या दोन मूलद्रव्यांना, ‘डीडायमिअम’मधून भागश: स्फटिकीभवन करून वेगळं केलं. मध्यंतरीच्या काळात याच ‘डीडायमिअम’पासून सॅमॅरिअम हेही एक लॅन्थॅनाइड वेगळं केलं गेलं. प्रेसोडायमिअम, निओडायमिअम, सॅमॅरिअम ही सारी मूलद्रव्यं बाजूला काढूनही ‘डीडायमिअम’ अजूनही अशुद्ध होतं. आणखीही त्यात काही मूलद्रव्यं असावीत असा वैज्ञानिकांना संशय होता. तो खराही ठरला. १८८६ साली जीन चार्ल्स या वैज्ञानिकाला ‘डीडायमिअम’पासून ‘गॅडोलिनिअम’ वेगळं करण्यात यश मिळालं. तरीही ‘डीडायमिअम’मध्ये काही तरी राहिलेलं होतंच.. आणि ते होतं ‘युरोपिअम’!

युजेन डीमार्के या वैज्ञानिकाने १९०१ मध्ये अतिशय कष्टाने, सॅमॅरिअम मॅग्नेशिअम नायट्रेट या क्षारांची भागश: स्फटिकीभवनाची प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण केली आणि त्या सगळ्या प्रक्रियेत त्याला एका नवीन मूलद्रव्याचा शोध लागला. लॅन्थॅनाइडच्या गटातल्या अणुक्रमांक ६३ असलेल्या या मूलद्रव्याचं ‘युरोप’ खंडाच्या नावावरून नाव ठेवलं गेलं.. ‘युरोपिअम’!

विश्वामध्ये काही मूलद्रव्यं अगदी कमी किंवा नगण्य प्रमाणात आढळतात. त्यामध्ये युरोपिअमची गणना होते. इतर सर्व लॅन्थॅनाइड मूलद्रव्यांप्रमाणेच युरोपिअम त्याच्या ‘+३’  स्थितीत संयुग करताना आढळतं. ‘युरोपिअम’ हेलॅन्थॅनाइड गटातलं सर्वात क्रियाशील मूलद्रव्य आहे. ‘युरोपिअम’ हवेतल्या ऑक्सिजनशी लगेच संयोग पावतं आणि ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतं. त्यामुळेच तर शुद्ध युरोपिअमचा रंग राखाडी, चंदेरी असा असला तरी तो तसा कधीच आढळत नाही. हवेचा संपर्क आला की लगेच ऑक्साइड होऊ नये, म्हणून त्यावर तेलाचा थर चढवला तरीही काही प्रमाणात का होईना, युरोपिअमचं ऑक्साइड तयार होतंच. कॅल्शिअमसारखं, ‘युरोपिअम’देखील पाण्याशी अभिक्रिया करतं आणि युरोपिअम हायड्रॉक्साइड तयार होतं. सल्फ्युरिक आम्लाशी संपर्क आल्यास युरोपिअम त्याच्याशी अभिक्रिया करून सुरेख फिक्या गुलाबी रंगाचं सल्फेटचं रसायन निर्माण करतं.

बाकी व्यवहारात युरोपिअमचा तसा फारसा काही उपयोग होत नसला तरी, प्रकाशमान होणाऱ्या काही उपकरणांत युरोपिअमचा मोठाच सहभाग आहे.

– मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org