कृत्रिम मूलद्रव्ये तयार करण्याच्या शृंखलेत अणुक्रमांक १०८ची भर पडली ती १९८४ मध्ये. या मूलद्रव्याची २६३ ते २७७ अशी पंधरा समस्थानिके आहेत; पण त्यातील आठ समस्थानिकांचा अर्धआयुष्यकाल फक्त काही मिलिसेकंदाचा, एक मिलिसेकंद म्हणजे ०.००१ सेकंद म्हणजे पलक झपकतेही आधा. उर्वरित सात समस्थानिकांपैकी पाच समस्थानिकांचा अर्धआयुष्यकाल एका मिनिटाच्या आतला. सर्वात जास्त म्हणजे १.१ तासाचा अर्धआयुष्यकाल असलेले हासिअमचे एकमेव समस्थानिक हासिअम-२७६.

खरं तर रशियातील जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेत १९७८ मध्ये हासिअम तयार करण्याचा पहिला प्रयत्न झाला. युरी ओग्नेसिअन, व्लादिमिर उटय़ोनकोव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेडिअमवर कॅल्शिअमच्या कणांचा मारा करून हासिअम-२७० हे समस्थानिक तयार केले. त्याच वर्षी शिसे या मूलद्रव्यावर लोहकणांचा मारा करून हासिअम-२६४ तयार केले. या दोन्ही प्रयोगांच्या निष्कर्षांबद्दल असलेल्या संदिग्धतेमुळे जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेने हे संशोधन जाहीर केले नाही. १९८३ मध्ये बिस्मथवर मँगेनीजच्या कणांचा मारा करून हासिअम-२६३, कॅलिफोर्निअमवर निऑन कणांचा मारा करून हासिअम-२७० ही समस्थानिके तयार केली आणि शिसे या मूलद्रव्यावर लोहकणांचा मारा करून पुन्हा एकदा हासिअम-२६४ तयार केले.

१९८४ साली जर्मनीतील डार्मस्टॅड येथील जी.एस.आय. या जड आयन संशोधन केंद्रामधील पीटर आर्मबस्टर आणि गॉटफ्रिड मुंझनबर्ग या शास्त्रज्ञांनी शिसे आणि लोह या मूलद्रव्यांचा वापर करून हासिअम-२६५ तयार केले. जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेच्या संशोधनापेक्षा जी.एस.आय.ने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष जास्त विश्वासार्ह असल्याने ते ग्राह्य़ धरले गेले आणि हासिअमच्या संशोधनाचे श्रेय जी.एस.आय. या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना देण्यात आले.

भविष्यात सापडतील अशा शोध न लागलेल्या काही मूलद्रव्यांचे नामकरण दिमित्री मेंडेलीव यांनी केले होते. अणुक्रमांक १०८चे नाव इका-ऑस्मिअम असे त्यांनी सुचविले होते. आयुपॅकच्या नवीन मूलद्रव्यांच्या नामकरणाच्या नियमानुसार या मूलद्रव्याचे नाव अन्निलऑक्टिअम (unniloctium) असे सुचवले गेले. अणुक्रमांक १०८च्या मूलद्रव्याला इका-ऑस्मिअम म्हणावे, अन्निलऑक्टिअम म्हणावे की, या कृत्रिम मूलद्रव्याला त्याचे ज्या ठिकाणी संशोधन झाले त्या ठिकाणाचे नाव द्यावे, असा प्रश्न ट्रान्सफर्मिअम गटाकडे आला. नामकरणाची संधी या मूलद्रव्याच्या संशोधकांना देण्यात आली. पीटर आर्मबस्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जी.एस.आय. संशोधन केंद्र असलेल्या जर्मनीतील हेस (Hesse) राज्याच्या लॅटिन ‘हासिया’ नावावरून या मूलद्रव्याला हासिअम हे नाव दिले. ट्रान्सफर्मिअम गटाने हासिअम नावाला मान्यता दिली.