पंधरा सदस्यीय लँथनाईड कुटुंबातील अणुक्रमांक ६७ म्हणजे हॉल्मिअम मूलद्रव्य! स्वित्र्झलडमधील जीनिव्हा विद्यापीठात मार्क डेलाफॉण्टेन व लुई सोरेट यांनी १८७८ मध्ये हॉल्मिअमचा शोध लावला. मार्क डेलाफॉण्टेन व लुई सोरेट यांना मिळालेल्या अणूच्या वर्णपटात अनोळखी मूलद्रव्याचं अस्तित्व सापडलं. ते मूलद्रव्य होतं हॉल्मिअम. त्याच वेळी स्वीडनमधील उप्साला विद्यापीठात पेर थिओडोर क्लेव्ह, अरबिया म्हणजेच अर्बिअम ऑक्साइडवर संशोधन करत होते. कार्ल गुस्ताव मोझँडरने शोधलेल्या आयन विनिमय (आयन एक्स्चेंज) पद्धतीचा वापर करून पेर थिओडोरने आधी ज्ञात असलेले मूलद्रव्य वेगळे केले. त्यानंतर त्यांना तपकिरी आणि हिरव्या रंगाचे अज्ञात मूलद्रव्य सापडले. यातील तपकिरी मूलद्रव्याला हॉल्मिअम असे नाव दिले. या मूलद्रव्याचे नामकरण पेर थिओडोर यांच्या स्टॉकहोम या शहराच्या हॉल्मिया या लॅटिन नावावरून करण्यात आले.

आपल्या कुटुबांतील सदस्यांप्रमाणेच हॉल्मिअम हे मूलदव्य निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. आढळताना कुटुंबातील सदस्यांसह तो गॅडोलिनाइट आणि मोनाझाइट या खनिजांत सापडतो. पृथ्वीच्या कवचातील मूलद्रव्यांत विपुलतेच्या छपन्नाव्या स्थानावर हॉल्मिअम आहे. मूलद्रव्यांच्या विपुलतेचा ओड्डो-हारकिन्स निअम (Oddo-Harkinls Rule) आहे. या नियमानुसार साधारणत: सम अणुक्रमांक असणारी मूलद्रव्ये विषम अणुक्रमांक असणाऱ्या मूलद्रव्यांपेक्षा विपुलतेमध्ये अधिक असतात. त्यामुळे हॉल्मिअम नगण्य प्रमाणात आढळतो हे लक्षात येते.

हॉल्मिअम हा धातू मिळवण्यासाठी रसायनशास्त्राच्या दृष्टीने अनेक अडचणी आहेत जसे, त्याचे आढळणारे अत्यल्प प्रमाण, त्याच्या संयुगांचे इतर अनेक लँथनॉन संयुगांशी रासायनिक साधर्म्य असणे इत्यादी. तरीही आधुनिक रसायनशास्त्राच्या प्रगतीमुळे हॉल्मिअम व अशी अनेक मूलद्रव्ये शुद्ध रूपात मिळविता आली.

पेर थिओडोरने हॉल्मिअम शोधलं असलं तरी ते शुद्ध स्वरूपातलं होतं की नव्हतं याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. पण त्यानंतरच्या काळात मात्र आयन विनिमय पद्धत आणि कॅल्सिओथर्मक प्रक्रियेने शुद्ध हॉल्मिअम धातू मिळविता आला. या प्रक्रियेसाठी टँटलमची मूस (crucible) वापरली जाते. त्याऐवजी जर अ‍ॅल्युमिना किंवा झिरकोनिया मूस वापरली तर अन्य प्रक्रिया होऊन हॉल्मिअम ऐवजी, अ‍ॅल्युमिनिअम अथवा झिरकोनिअम धातू मिळतील.

– डॉ. रवींद्र देशमुख मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org