X

कुतूहल : ऱ्हेनिअम

आवर्तसारणीमध्ये ऱ्हेनिअमचे स्थान हे तिसऱ्या आवर्तनात आणि सातव्या गणात आहे

या काळपट चंदेरी धातूला ऱ्हेनिअम हे नाव ऱ्हाइन या जर्मन नदीवरून देण्यात आलं आहे. वाचकांच्या ध्यानात आलंच असेल की या धातूचे शोधकत्रे हे जर्मनीचे असले पाहिजेत आणि ते खरंही आहे. नोडाक पती-पत्नी आणि ओट्टो बर्ग या त्रयीने १९२५ मध्ये प्लॅटिनमच्या खनिजामधून आणि कोलंबाइट खनिजामधून ऱ्हेनिअम शोधले. पुढे तीन वर्षे मेहनत करून मॉलिब्डनाइट या खनिजाच्या ६०० किलोच्या ढिगामधून अवघे एक ग्रॅम ऱ्हेनिअम वेगळे करण्यात त्यांना यश मिळाले. अबब! केवढी ही मेहनत, पण अशी मेहनत शास्त्रज्ञ घेतातच; ज्यायोगे मानवाचे आयुष्य ते सुखमय करत असतात. इथे हे नमूद करायलाच हवे की ऱ्हेनिअमच्या शोधाचे श्रेय खरे तर मिळायला हवे होते जपानचे रसायनशास्त्रज्ञ मॅसॅटाका ओगावा यांना! पण त्यांच्या थोडय़ा चुकीमुळे ते हातचे गेले. सन १९०५ मध्ये मॅसॅटाका ओगावा यांना थोरिएनाइट खनिजाचा अभ्यास करताना, त्याच्या अणू-वर्णपंक्तीमध्ये एका अनोळखी मूलद्रव्याचं अस्तित्व आढळलं. हे मूलद्रव्य ओळखण्यात मात्र त्यांची चूक झाली. ऱ्हेनिअमच्या शोधानंतर पुन्हा एकदा ओगावा यांना मिळालेल्या वर्णपंक्तीचे निरीक्षण केले असता ते मूलद्रव्य ऱ्हेनिअमच असल्याचे सिद्ध झाले.

आवर्तसारणीमध्ये ऱ्हेनिअमचे स्थान हे तिसऱ्या आवर्तनात आणि सातव्या गणात आहे. हा एक संक्रमण धातू असून याचा अणुक्रमांक ७५ आहे.

ऱ्हेनिअमचं सगळंच आगळंवेगळं..  प्रचंड घनता, अतिउच्च द्रवणांक तसेच अत्युच्च उत्कलनांक! मानवाने शोधलेले हे शेवटचे मूलद्रव्य, ज्याला स्थिर समस्थानिके आहेत. ऱ्हेनिअमच्या समस्थानिकांची संख्या पण खूप; जवळजवळ २७! पण त्यातील दोनच पृथ्वीवर जास्त प्रमाणात मिळतात, ती म्हणजे ऱ्हेनिअम-१८५ आणि ऱ्हेनिअम-१८७. त्यातील ऱ्हेनिअम-१८५ हे स्थिर तर ऱ्हेनिअम-१८७ हे किरणोत्सारी समस्थानिक आहे. या ऱ्हेनिअम-१८७ च्या एक ग्रॅमचे किरणोत्सारामुळे अर्धा ग्रॅम व्हायला तब्बल १०,००,००,००,००० एवढी वर्षे  लागतात. हे असं मूलद्रव्य आहे की ज्याच्या किरणोत्सारी समस्थानिकाचं प्रमाण पृथ्वीवर त्याच्या स्थिर समस्थानिकांपेक्षा जास्त आहे. वाचावं ते नवलच!

– डॉ. विद्यागौरी लेले, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org