स्कँडिअमच्या गुणधर्मामुळे  त्याचे अनेक उपयोग आहेत. पण त्याचा मुख्य उपयोग केला जातो ते अवकाश तसंच हवाई साधनांत आणि विविध प्रकारची यंत्रं बनवण्यासाठी. अ‍ॅल्युमिनिअममध्ये अगदी थोडं. थोडं म्हणजे किती.?  तर फक्त ०.१ टक्के ते ०.५ टक्के इतकंच स्कँडिअम मिसळून त्याचं संमिश्र तयार केलं की त्याची अनोखी वैशिष्टय़े दिसून येतात. हे संमिश्र वजनाला हलकं तर असतंच; पण त्याची मजबुती अ‍ॅल्युमिनिअमपेक्षा १५० टक्क्यांनी वाढते. दणकटपणा वाढतो. ते गंजतही नाही त्यामुळे त्याचा टिकण्याचा कालावधी वाढतो. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, या संमिश्राच्या पत्र्याचं सांधण (वेल्डिंग) करताना चिरा पडत नाहीत, त्यामुळे सांधणाचा टिकण्याचा काळ चक्क २०० टक्क्यांनी वाढतो आणि फक्त अ‍ॅल्युमिनिअमच नव्हे तर मँगनीज, झिर्कोनिअम, टिटॅनिअम, तांबे या सर्व धातूंना सांधणाच्या बाबतीत स्कँडिअम अ‍ॅल्युमिनिअमइतकीच साथ देतो.

सायकलीचे जोड, माशांचे गळ, गोल्फ शाफ्ट, बेसबॉल, बॅटसारखी क्रीडा साधने वापरण्यासाठीही अ‍ॅल्युमिनिअम-स्कँडिअम संमिश्र वापरलं जातं. खरं तर फक्त स्कँडिअमची साधनं बनवली तरी त्याची गुणवत्ता जास्त असेल; पण स्कँडिअम विपुल प्रमाणात मिळत नाही आणि किमतीनेही महाग! असं असलं तरी काही ठिकाणी स्कँडिअमच वापरावं लागतं. स्कँ डिअमचं एक किरणोत्सारी समस्थानिक रू46  हे तेलशुद्धीकरणात शोधकाचं काम करतं. तेलातील विविध घटकांच्या हालचाली रू 46 मुळेच कळतात. शिवाय जर तेलवाहिन्यांमध्ये काही गळती असेल तर ती रू46 मुळे हुडकता येते. सेंद्रिय रसायनशास्त्रात वापरण्यात येणाऱ्या लुईस अ‍ॅसिडची कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्कँडिअम ट्रायफ्लेट या उत्प्रेरकाचा वापर करतात.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
siddharth jawahar scam marathi news
वित्तरंजन – सिद्धार्थ जवाहर: नव -पॉन्झी
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

अतिशय विरल स्कँडिअम सल्फेटचा वापर कृषीक्षेत्रात धान्यांची उगवणक्षमता वाढवण्यासाठी केला  जातो. स्कँडिअम ऑक्साइड (स्कँडिया)उच्च तीव्रतेचे ‘स्टेडियम लाइट’ तयार करण्यासाठी वापरतात.

सूर्यप्रकाशासारखा प्रकाश हवा असेल तर पाऱ्याच्या दिव्यात स्कँडिअम आयोडाइडचा उपयोग केला जातो.  असे दिवे मुख्यत: चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रांत वापरले जातात.

जागतिक स्तरावर प्रतिवर्षी बल्बमध्ये सुमारे ८० किलो स्कँडिअमचा वापर केला जातो. जरी स्कँडिअमला बिनविषारी समजत असले तरी स्कँडिअमचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो, याचा पूर्ण अभ्यास झालेला नाही. त्यामुळे स्कँडिअम मिळालेच तर हाताळताना काळजी घेणे उत्तम.

-चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org