16 January 2019

News Flash

कुतूहल : सेलेनिअम

सेलेनिअमचा अभिलाक्षणिक गुणधर्म म्हणजे त्याची विद्युतवाहकता. ते एक अर्धवाहक आहे

सेलेनिअम

सन १८१७ साली प्रख्यात स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉन्स जेकब बर्झिलियस हे आपल्या सल्फ्युरिक आम्ल बनवण्याच्या कारखान्यात काम करीत असताना, त्यांचे लक्ष आम्ल-कक्षात तळाला उरलेल्या लाल-तपकिरी गाळाकडे वेधले गेले. सुरुवातीला त्यांना ते टेल्युरिअम (Tellurium) हे मूलद्रव्य वाटले. पण मग त्यांच्या लक्षात आले की ते एक अज्ञात मूलद्रव्य आहे. अधिक शोध घेता त्यांना हेदेखील जाणवले; हा पदार्थ बराचसा सल्फरसारखा आहे आणि त्याचे गुणधर्म सल्फर आणि टेल्युरिअमसारखे आहेत. त्या नवीन पदार्थाला त्यांनी नाव दिले ‘सेलेनिअम’, ज्याचा ग्रीक भाषेत अर्थ होतो, ‘चंद्र’. सेलेनिअमचे रासायनिक चिन्ह री आणि ३४ त्याचा अणुक्रमांक! करडय़ा रंगाचे हे मूलद्रव्य धातुसदृश आहे आणि म्हणून त्यामध्ये धातू आणि अधातू यांची अभिलक्षणे दिसून येतात.

सेलेनिअमची बहुविध अपरूपे आहेत, जी तापमानाच्या बदलानुसार एकमेकात परिवर्तनीय आहेत. सेलेनिअमची 74 Se (०.८७%), 76री (९.०२%), 77 Se (७.५८%), 78 Se (२३.५३%), 80 Se (४९.८२%) 82 Se (९.१९%) ही सहा निसर्गत: आढळणारी समस्थानिके आहेत. सेलेनिअम हे अतिशय दुर्मीळ मूलद्रव्य आहे. सेलेनिअम शक्यतो अपद्रव्य (impurity) स्वरूपात, अनेक धातूंच्या (उदा. तांबे, पारा, शिसे, रौप्य) सल्फाइड धातुक स्वरूपात आढळते. सेलेनिअमची निर्मिती ही धातू शुद्धीकरणातील उपउत्पादन म्हणून होते.

सेलेनिअमचा अभिलाक्षणिक गुणधर्म म्हणजे त्याची विद्युतवाहकता. ते एक अर्धवाहक आहे. त्यामुळे त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये केला जातो. उदा. संगणकातले ट्रान्झिस्टर्स, सेल फोन्स, इलेक्ट्रॉनिक खेळ इत्यादी. तसेच सेलेनिअम प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. प्रकाशाच्या तीव्रतेनुसार त्याची विद्युत संवाहकता बदलते आणि म्हणून त्याचा उपयोग छायांकन यंत्रणा, लेझर मुद्रण, सौर-घट, छायाचित्रीय प्रकाशमापक यांमध्ये केला जातो. तसेच छायाचित्रीय मुद्रणामध्ये टोनर म्हणून सेलेनिअमचा वापर होतो. सेलेनिअमचा सर्वात महत्त्वाचा उपयोग काच उद्योगात समावेशक म्हणून होतो. काचेला लाल रंग देण्यासाठी त्याचा वापर होतो. तसेच काचेतील अनावश्यक रंग घालवण्यासाठी सेलेनिअमचा वापर होतो. संमिश्र धातू उत्पादनात तसेच पोलाद उद्योगात सेलेनिअमचा उपयोग होतो. अनेक रासायनिक अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून त्याचा वापर होतो.

– डॉ. तनुजा प्र. परुळेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

First Published on May 31, 2018 3:37 am

Web Title: facts about selenium