२००१ मध्ये अध्यक्षपदी आलेल्या जोसेफ काबिला यांनी डीआर काँगोमधून रवांडा आणि इतर देशांमधील सैन्य व सशस्त्र संघटनांना काँगोबाहेर काढून युनोच्या साहाय्याने काही काळ तरी शांतता प्रस्थापित केली. मात्र, राजकीय विरोधकांनी शेजारच्या शत्रुराष्ट्र रवांडाबरोबर हातमिळवणी करून सरकारविरोधी उठाव, यादवी युद्ध, हत्या सुरू करून सर्वत्र अनागोंदी माजवली. २०१५ पासून विरोधकांनी जोसेफ काबिला सरकारला खाली खेचण्याच्या हालचाली अधिकच हिंसक केल्या. विरोध दडपून टाकण्यासाठी काबिला सरकारने सशस्त्र सैनिकांची भरती करून हजारो लोकांची हत्या केली. डिसेंबर २०१८ मध्ये डीआर काँगोमध्ये सार्वत्रिक निवडणुका कशाबशा पार पडल्या.

फेलिक्स सेसेकेदी हे राष्ट्राध्यक्षपदासाठी निर्वाचित होऊन ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांचे आघाडी सरकार स्थापन झाले. सध्या फेलिक्स यांचे सरकार डीआर काँगोत कार्यरत आहे. गेल्या शतकात वसाहतींपासून स्वातंत्र्य मिळवून अस्तित्वात आलेल्या आफ्रिकेतल्या नवदेशांच्या बाबतीत लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे वसाहतवाल्या युरोपीय राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळविताना या आफ्रिकी देशांमधील जनतेला जेवढा संघर्ष करावा लागला, त्याच्या अनेक पटींनी मोठा संघर्ष व जीवितहानी स्वातंत्र्यानंतर झालेल्या सत्तास्पर्धा, वंशविद्वेष यांपायी यादवी युद्धात झाली.

डीआर काँगो हा देश विविध मौल्यवान खनिजांनी समृद्ध असलेल्या देशांपैकी एक असल्याने, अर्थव्यवस्था या खनिजांच्या निर्यातीवर निर्भर आहे. हा देश जगाला कोबाल्ट या धातुखनिजाचा सर्वात मोठा पुरवठादार, हिरे आणि तांबे यांचा जगाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार आहे. डीआर काँगोत स्वातंत्र्य मिळवून स्वयंशासन सुरू झाल्यापासून तीन दशके येथील अर्थव्यवस्था उत्तम होती. नंतरची  दोन युद्धे, भ्रष्टाचार, सत्तास्पर्धा यांमुळे येथील अर्थकारण कोलमडले आहे. काँगोतून निर्यात होणाऱ्या खनिजांपैकी ५० टक्के निर्यात चीनला केली जाते. गृहयुद्धे, भ्रष्टाचार, रोगराई अशी संकटे झेलणारा डीआर काँगो जगातल्या अत्यंत गरीब देशांपैकी एक आहे. फ्रेंच ही डीआर काँगोची राजभाषा आहे, तर ११ कोटींच्या या देशातील ९५ टक्के जनता ख्रिस्ती धर्माचे पालन करते.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com