News Flash

कुतूहल : मूलपेशी

संशोधकांना या उंदरांच्या प्लीहेत पेशींचे समूह निर्माण झाल्याचे दिसून आले.

मूलपेशी म्हणजे अपरिपक्व पेशी – ज्या पेशींना अजून निश्चित रचना लाभलेली नाही, परंतु कालांतराने विशिष्ट प्रकारच्या पेशींचे स्वरूप ज्या धारण करू शकतील अशा पेशी. या पेशी विविध प्रकारच्या असतात. मूलपेशींच्या अस्तित्वाबद्दलची चर्चा १८८०-९०च्या दशकात झाली होती. शरीरातील जैविक वाढीची सुरुवात अशा पेशींपासून होत असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती. रक्तातील पेशींचा उगम अशाच प्रकारच्या मूलपेशींतून होत असल्याचे मतही व्यक्त झाले होते. रक्तनिर्मिती ही अस्थिमज्जेत (बोन मॅरो) होते. सन १९६० सालाच्या सुमारास प्रथम उंदरांत व नंतर व्याधिग्रस्त माणसांत, अस्थिमज्जेचे प्रत्यारोपण करण्यात संशोधकांना काही प्रमाणात यश आले. मूलपेशींचा वैद्यकीय उपचारांसाठी केला गेलेला हा वापर होता!

सन १९६१ मध्ये कॅनडातील आँटेरिओ कॅन्सर इन्स्टिटय़ूटमधील संशोधकांनी केलेला प्रयोग मूलपेशींवरील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या संशोधकांनी प्रथम उंदरांवर तीव्र किरणोत्साराचा मारा करून त्यांची संरक्षण यंत्रणा आणि रक्तनिर्मिती करणारी यंत्रणा निकामी केली. त्यानंतर त्यांनी निरोगी, व्यवस्थित प्रकृती असणाऱ्या उंदरांची अस्थिमज्जा घेतली आणि क्षारांच्या द्रावणाद्वारे ती या उंदरांना टोचली. त्यानंतर बारा दिवसांनी, या संशोधकांनी या उंदरांची प्लीहा (स्प्लीन) बाहेर काढली. नष्ट झालेल्या रक्तपेशी काढून टाकण्यात प्लीहा महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधकांना या उंदरांच्या प्लीहेत पेशींचे समूह निर्माण झाल्याचे दिसून आले. निर्माण झालेल्या या समूहांची संख्या ही, टोचलेल्या अस्थिमज्जेतील पेशींच्या संख्येशी सम प्रमाणात असल्याचे आढळले. अस्थिमज्जेतल्या पेशी मूलपेशी असण्याची शक्यता यावरून दिसून येत होती.

त्यानंतर १९७०-८०च्या दशकात इतर प्रकारच्या मूलपेशींचा शोध लागत गेला. सन १९८२ मध्ये थेट उंदराच्या भ्रूणातून या मूलपेशी वेगळ्या करून त्यांची प्रयोगशाळेत वाढ करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले. प्राण्यांच्या शरीरात किंवा प्रयोगशाळेत या पेशींची वाढ केल्यावर, त्यांच्यात वाढीच्या दृष्टीने अपेक्षित असणारे सर्व बदल घडून येत होते. सन १९९८ मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सन-मेडिसन विद्यापीठातील संशोधकांना मानवी भ्रूणातून मूलपेशी वेगळ्या करून त्यांची वाढ करण्यातही यश आले. ज्या व्याधींत निरोगी पेशींचा नाश होतो, अशा पार्किन्सन किंवा अल्झायमरसारख्या विकारांत मूलपेशींच्या वापराद्वारे निरोगी पेशी निर्माण करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे अशा व्याधींवरील उपचारासाठी मूलपेशींचा वापर भविष्यात मोठय़ा प्रमाणावर होऊ शकेल.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:24 am

Web Title: facts about the root cells zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : चुकीचं भाषाशिक्षण
2 मेंदूशी मैत्री : असं चालतं वाचन..
3 कुतूहल : आरएनएचे कार्य
Just Now!
X