24 April 2019

News Flash

कुतूहल : थोरिअम

थोरिअमची पूड मात्र हवेत लगेच पेट घेते आणि काळजीपूर्वक हाताळावी लागते.

शुद्ध थोरिअम हा चंदेरी रंगाचा मृदू धातू असून त्याची तन्यता आणि वर्धनीयता चांगली असते. त्यामुळे या धातूची तार किंवा पत्रे तयार करणे सोपे असते. १७५० अंश सेल्सिअसला वितळणाऱ्या थोरिअमवर हवेचा लगेच परिणाम होत नाही. बरेच दिवस हवेच्या संपर्कात राहिल्यानंतर थोरिअम आधी राखाडी रंगाचा होतो आणि नंतर काळा पडतो. हायड्रोक्लोरिक आम्ल वगळता इतर आम्लांमध्ये थोरिअम विरघळत नाही. मॅग्नेशिअमची ताकद वाढविण्याकरिता त्यात थोडय़ा प्रमाणात थोरिअम मिसळून संमिश्र धातू बनवतात. थोरिअमची पूड मात्र हवेत लगेच पेट घेते आणि काळजीपूर्वक हाताळावी लागते.

थॉर या प्राचीन व्हायकिंग लोकांच्या वादळाच्या देवतेच्या नावावरून या मूलद्रव्याला थोरिअम हे नाव स्वीडिश शास्त्रज्ञ बर्झेलिअसने दिले. थोरिअमच्या शोधाचा पण एक किस्साच आहे. १८१५ साली बर्झेलिअसला कुणीतरी एक खनिज पाठवले. बर्झेलिअसने त्यावर स्वत:च्या घरातच प्रयोग करून एक धातूसदृश पदार्थ मिळवला आणि त्याला थोरिअम हे नाव दिले. परंतु काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की त्याने वेगळा केलेला पदार्थ मूलद्रव्य किंवा धातू नसून यिट्रिअम फॉस्फेट हे संयुग होते. पुढे १८२८ मध्ये नॉर्वेच्या हाँस एस्मार्कने त्याला एक नवीनच सापडलेले खनिज पाठविले. कदाचित आधीच्या खनिजाशी या खनिजाचे साधर्म्य असल्यामुळे किंवा आधी ठेवलेले नाव आवडल्याने, बर्झेलिअसने या नवीन मूलद्रव्याचे नाव थोरिअम असे ठेवले.

थोरिअमवर अनेक प्रयोग करून बर्झेलिअसने त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म निश्चित केले असले तरी थोरिअमच्या किरणोत्साराबद्दल त्याला माहीत नव्हते. किरणोत्साराचा शोधच हेंरी बेक्वेरेलने १८९६ साली बर्झेलिअसच्या मृत्यूनंतर लावला. तसाही थोरिअमचा किरणोत्सार अतिसौम्य स्वरूपाचा असतो. त्यातून उत्सर्जति होणाऱ्या अल्फा कणांची ऊर्जा इतकी कमी असते की साधी काच किंवा मानवी त्वचाही त्यांना थोपवू शकते. थोरिअमची सहा नैसर्गिक समस्थानिके आढळतात. ळँ- 232 हे समस्थानिक सर्वात स्थिर असून त्याचा अर्ध- आयुष्यकाल १४ अब्ज वर्षे इतका आहे. यामुळेच पृथ्वीवर आढळणारे सर्व थोरिअम पृथ्वी इतकेच अथवा जास्त वयाचे आहे.

– योगेश सोमण

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on November 7, 2018 12:44 am

Web Title: facts about thorium