टिटॅनिअम तीन वर्षे जरी समुद्राच्या खाऱ्या पाण्यात ठेवले तरी त्याच्यावर गंज चढत नाही. अ‍ॅक्वा रेजिया हे द्रावण हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नत्रस आम्ल हे ३:१ या प्रमाणात एकत्र करून बनविले जाते. या द्रावणात सोन्यासारखा राजस धातूसुद्धा विरघळतो, तिथे टिटॅनिअम मात्र तग धरून राहते. टिटॅनिअमला विरघळवायचे झाल्यास हायड्रोफ्लोरिक आम्लच घ्यावे लागते. टिटॅनिअममध्ये चुम्बकीय गुणधर्म नाहीत तसेच ते विषारीही नाही आणि त्याने अ‍ॅलर्जीही होत नाही किंबहुना शरीरातील मांस पेशी आणि हाडे यांच्यावर टिटॅनिअमचा परिणाम होत नाही. पुढे जाऊन असंही म्हणता येईल की शरीर त्याच्याशी स्वत:ला जुळवून घेतं; आहे की नाही खासियत!

या त्याच्या अनोख्या गुणांमुळे त्याचा विमानाशिवाय इतरही अनेक ठिकाणी वापर होऊ शकतो जसं, दातांच्या कवळ्या, दातांची मूळ (रूट कॅनल). यापुढे दातांच्या डॉक्टरकडे गेल्यास टिटॅनिअमला विसरू नका बरं का; टिटॅनिअमपासून बनविलेल्या भागांची २० वर्षांची हमी! तसेच शरीरातील वेगवेगळे कृत्रिम भाग, जसं की हाडांना जोडण्यासाठी वापरलेले खिळे, पट्टय़ा हे टिटॅनिअमपासून बनवल्याने ते वजनाने हलके, अतिशय टिकाऊ आणि झिजतातही फार कमी त्यामुळे खूप वर्षे चालतात. याच बरोबरीने खेळाच्या साहित्यात उदाहरणार्थ टेनिसच्या रॅकेट, फुटबॉलची हेल्मेट्स, शर्यतीच्या सायकलचे सांगाडे, शर्यतीच्या घोडय़ांच्या नाला, अगदी लॅपटॉपमध्येसुद्धा टिटॅनिअमचा वापर केला जातो.

टिटॅनिअम अतिशय क्रियाशील असल्याने ऑक्सिजनसह असलेले त्याचे टिटॅनिअम डायऑक्साइड हे संयुग खूप ठिकाणी वापरले जाते. टिटॅनिअम डायऑक्साइडच्या पातळ आवरणामुळे गंजविरोधी गुण त्यात निर्माण होतात. हे संयुग शुभ्र पांढऱ्या रंगाचे, रासायनिकदृष्टय़ा तटस्थ आणि अपारदर्शक असते. यामुळे याला रासायनिक रंग, जहाजांचे इंजिन, त्याचे भलेमोठे पंखे, त्याच्या तळाचा रंग या सगळ्यांत प्रचंड मागणी असते.

असे हे सुरेख चंदेरी, पाण्यापासून सुरक्षित आणि वजनाने हलके टिटॅनिअम हे अंगठीसारखे दागिने आणि घडय़ाळांमध्येही वापरतात जे पोहोताना अंगावर घातलं तरी खराब होत नाही.

या गुणवान टिटॅनिअम धातूची किंमत पण खूप भारी असते बरं! १०० ग्रॅमला जवळपास चाळीस हजार रुपये! असे हे बहुढंगी टिटॅनिअम!

– डॉ. विद्यागौरी लेले 

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org