एखाद्याचं नाव पाळण्यातलं वेगळं, हाक मारायचं वेगळं आणि कागदोपत्री वेगळं असंच काहीसं टंगस्टनबाबत झालंय. याचं नाव काय असावं, याबाबत बरेच विवाद झाले. अणुक्रमांक ७४ असलेल्या या मूलद्रव्याच्या नावावर आयुपॅकने वुल्फ्रॅम असं शिक्कामोर्तब केलं खरं; पण बहुतेक जण त्याला टंगस्टन या नावाने ओळखतं. आता वुल्फ्रॅम या शब्दाचा अर्थही तसा फारसा बरा नाही. काय.? तर ‘भक्षक लांडगा’. हे असं तीरपागडं नाव टंगस्टनसारख्या गुणी मूलद्रव्याला का द्यावं? टंगस्टन आणि हिंस्र लांडग्याचा संबंध काय?

पूर्वी खनिजापासून कथिल वेगळं करताना कधीकधी कथिल अपेक्षेपेक्षा एकदम कमी प्रमाणात मिळे. हे असं का होतं, हे शोधताना त्या खनिजात तपकिरी-पिवळ्या रंगाचे दगड असतील तर कथिल कमी मिळतं असं लक्षात आलं. एखाद्या लांडग्याने मेंढीचा फन्ना उडवावा तसे हे दगड कथिलाचा फन्ना उडवतात; याअर्थी जर्मन भाषेत त्या दगडांना वुल्फ्रॅम (Wolf Rahm) असं म्हटलं गेलं. या दगडांना काही देशांत ‘टंगस्टेन’ म्हणजे ‘जड दगड’ असं म्हणत. हे खनिज दगड वुल्फ्रॅमाइट म्हणून ओळखले जातात.

१७८१मध्ये स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ कार्ल शील यांनी दाखवून दिलं की टंगस्टेन खनिजात एका अज्ञात मूलद्रव्याच्या आम्लाचं लवण आहे. पुढे दोन वर्षांनी त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्या जे. जे. एलहुयार आणि एफ. एलहुयार या स्पॅनिश बंधुद्वयांनी खनिजातलं ते नवीन मूलद्रव्य वेगळं करण्यात यश मिळवलं. त्यांनी खनिजाचंच ‘वुल्फ्रॅम’ हे नाव या मूलद्रव्याला दिलं. त्याकाळी स्पॅनिश मुळाक्षरांत ह  हे अक्षर नसल्यानं त्यांनी Wolfram ऐवजी Volfram (व्होल्फ्रॅम) असं लिहिलं (१९१४ नंतर स्पॅनिश मुळाक्षरांत ह हे अक्षर घेण्यात आलं). हे व्होल्फ्रॅम नाव सर्वमान्यही झालं.

शेवटी या नवीन मूलद्रव्याला आयुपॅकने वुल्फ्रॅम हे नाव दिलं. ज्या खनिजापासून हे मूलद्रव्य जास्त प्रमाणात मिळतं त्या खनिजाचं वुल्फ्रॅमाइट हे नाव टंगस्टेनपेक्षा जास्त योग्य आहे. कारण जड दगड तर कोणतेही असू शकतात. हा मुद्दा धरून वुल्फ्रॅम हे नाव नक्की करण्यात आलं. पण त्याबरोबर दुसरं नाव टंगस्टन असंही ठेवलं. पुढे २००५ साली टंगस्टन हे नाव फक्त ‘हाक मारायला’ चालेल, पण आवर्त सारणीत वा रासायनिक संयुगं लिहिताना वुल्फ्रॅम (ह) याच नावाने लिहावं असं ठरलं.

चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org