आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या मेंदूमध्ये नव्या पायवाटा (न्यूरल पाथवे) तयार करता येतात. जन्मल्यापासून आपण हेच करत आलो आहोत. फक्त या सर्व गोष्टी आपल्या नकळत होतात. आपल्याला जसजसे अनुभव मिळत जातात, तशा या वाटा तयार होतात. कोणत्या वाटेवर ताण आहे, अपमान आहे, दु:ख आहे आणि कोणत्या वाटेवर आनंद, समाधान आहे हे पूर्वीच्या अनुभवांवर अवलंबून असतं.

इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की, ज्या गोष्टींपासून दुख मिळतं, त्या शक्यतो टाळायच्या असतात अशीच मानवी प्रवृत्ती आहे. पण अपरिहार्य असेल तर टाळून चालत नाही. उदाहरणार्थ, नावडत्या विषयांच्या परीक्षा, कामाच्या ठिकाणची अवघड पण विशिष्ट जबाबदारी. या झाल्या शक्यतो टाळाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी. नावडत्या विषयाचा अजिबात अभ्यास न करणं, त्यातून कायम पळवाट शोधणं, अभ्यास लांबणीवर टाकत शेवटच्या क्षणी पुस्तक धरणं किंवा कामाच्या ठिकाणी दुसरं कोणी ती जबाबदारी घेतंय का बघणं, हे झालं नेहमीचंच; म्हणजे ही आपली जुनी पायवाट! जुन्या पायवाटेवरून चालल्यामुळे तात्कालिक आनंद मिळत असतो. आता आपल्याला नवी वाट तयार करायची आहे.

पळवाट शोधण्याऐवजी जर आपण तो नावडता विषय आत्मसात करायचाच असं ठरवलं किंवा आपणहून- मेंदूला वेगळं वळण लावून जबाबदारी स्वीकारलीच, तर इथं नवी वाट आपणच तयार करतो. इथं ‘स्वत:कडून करवून घेणं’ हे मात्र जमायला लागतं. परंतु दुसऱ्यावर हुकूम चालवणं सोपं असतं, पण स्वत:वर चालवणं अवघड!

यात काही काळ ताण जाणवणार हे नक्कीच. पण यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो. कारण इथं आपण जुन्या पायवाटेवर मात करून, आव्हान स्वीकारून नवीन पायवाट तयार केलेली असते.

एखादी जुनी सवय जातच नाही, असं आपण नेहमी म्हणतो. कारण पायवाट जुनी झालेली असते. त्यामुळे तीवरून चालणं हे सोपं असतं. ती सवय मोडून नवीन सवय तयार करायची म्हणजे नव्यानं न्यूरॉन्स जुळवायला घ्यायचे. हे जाणीवपूर्वक आणि मुद्दाम करता येतं. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करत राहिलो, तर ती अंगवळणी पडते. जुन्या सवयी मागे पडतात आणि आपल्याला हव्या त्या, नवीन सवयी निर्माण होऊ शकतात.

– डॉ. श्रुती पानसे – contact@shrutipanse.com