खाडय़ांच्या काठी भरतीचे पाणी अडवून, सुकवून मिठाचे उत्पादन करतात. काही कारणांनी मिठागरे बंद करतात आणि ती जमीन अनुत्पादित होते. अशा पडीक जमिनी किनारी प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर दिसतात. त्या पुन्हा उत्पादनक्षम करण्यासाठी योजनाबद्ध मेहनत करावी लागते. शेतकरी अशा जमिनी नांगरतात, बांधांच्या मदतीने जमिनीचे लहान-लहान भाग करतात, बांधांच्या आतल्या बाजूने उथळ गटारे खणतात. पाऊस पडल्यावर उखडलेली जमीन धुतली जाते, खारे पाणी बांधाकाठच्या गटारातून खाडीच्या दिशेने वळवले जाते. परिणामी शेतातली जमीन निमखारी होते. या निमखाऱ्या जमिनीवर क्षार सहन करणाऱ्या भाताच्या विशेष जातींची लागवड करतात. बांधावर पपई, चिकू अशी क्षार-सहनशील झाडे लावतात. माफक प्रमाणावर का होईना, क्षारयुक्त जमिनीपासून उत्पादन घेतात.

हेच तत्त्व वापरून बंद केलेल्या मोठाल्या मिठागराच्या जमिनी फळबागा, कृत्रिम वने यांद्वारे उत्पादनक्षम करणे शक्य होते. जमीन नांगरून मातीची लहान-मोठी ढेकळे उखडून ठेवतात. नसíगक वाढ झालेले गवत आणि खुरटय़ा वनस्पतीही उखडल्या जातात, पण त्या काढून टाकत नाहीत. पावसाळ्यात मातीची ढेकळे धुतली जातात आणि गवत कुजते. ही कुजणारी वनस्पती मातीचा भाग होतात. पावसाची उघडीप मिळाल्यावर मातीची ढेकळे वरखाली उकरून, हलवून पावसाने आणखी धुतली जाण्याची शक्यता वाढवतात. पावसाळ्यानंतर ढेकळे मोडतात, आसपास वाढलेले गवत त्यात गाडतात. थोडेसे शेणखत मिसळतात. तिवरवनांच्या शेजारच्या जमिनीवर वाढणारी झाडे लावतात, उदा. भेंड, करंज, उंडी, समुद्रफळ, नोनी इ.

दरवर्षी पडणारा पाऊस, वाढणारे गवत, झाडांचा पालापाचोळा यामुळे जमिनीची क्षारता कमी होऊन, गोडय़ा होत जाणाऱ्या मातीत इतरही बऱ्याच प्रकारचे वृक्ष, झुडपे, शोभेची झाडेसुद्धा वाढू शकतात. नारळ, चिकूचे मळे फोफावतात.

मात्र, या झाडांवर नेहमी लक्ष ठेवणे जरुरीचे असते. अनेक वृक्ष-प्रकारांची मुळे खोल वाढतात, जमिनीच्या खाऱ्या स्तरापर्यंत पोचतात. अशी झाडे अशक्त होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ‘ब्लाक सूट फंगस’ यासारखे रोग लागतात. झाडाला धक्का लागला तर काळ्या पावडरचा सडा पडतो. अशी रोगट झाडे पुढे वाढू देण्यात अर्थ नसतो.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

अ‍ॅमस्टरडॅमची पवनचक्की

चीज, लाकडी बूट, टय़ूलिप आणि पवनचक्की ही अ‍ॅमस्टरडॅमची वैशिष्टय़े. विंडमिलने अ‍ॅमस्टरडॅम आणि संपूर्ण हॉलंडचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. इ.स.१४०० पर्यंत हॉलंडमधील सामान्य माणसाचे जीवन तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे अत्यंत खडतर झाले होते. सर्वत्र लहान लहान टेकडय़ा, त्यांच्यामधील जागेत दलदल, पाणी साचलेले, काही वेळा समुद्री पाणी आत येई. सागरी लाटांनी अनेक वेळा आत आलेला पाण्याचा लोंढा गावेच्या गावे वाहून नेई. १४२७ साली अशी ७० गावे वाहून हजारो माणसे मृत्युमुखी पडली. पुढे हे पाणी थोपविण्यासाठी समुद्रकिनारी बंधारे, धरणे बांधली गेली. तुंबलेले पाणी बाहेर टाकण्यासाठी पंधराव्या शतकाच्या मध्यावर प्रथम विंडमिलचा उपयोग सुरू झाला. पुढे पवनचक्कीचा आकार मोठा करून पाणी खेचण्याची क्षमता वाढवण्यात आली. सोळाव्या शतकात विंडमिल बांधणीत अनेक सुधारणा होऊन तिचा वापर तेल निर्मिती, कागद निर्मिती, लाकूड कटाईसारख्या क्षेत्रांतही सुरू झाला. पुढे अ‍ॅमस्टरडॅमच्या जहाज बांधणी उद्योगात पवनचक्कीचा मोठा वापर करून मोठमोठी जहाजे बांधून सतराव्या शतकात जागतिक जहाज बांधणीउद्योगात ते अग्रेसर झाले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस डिझेल इंजिन आणि विद्युतशक्तीच्या साहाय्याने, आधुनिक तंत्राने उभारलेल्या शेकडो पवनचक्क्या अ‍ॅमस्टरडॅमच्या परिसरात काम करू लागल्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात ग्रीक तंत्रज्ञ हेरॉन याने बनवलेली पहिली विंडमिल पुढे नवव्या शतकात युरोपीय प्रदेशात वापरात येऊ लागली. तिचा वापर प्रथम धान्य दळण्यासाठी पिठाची गिरणी म्हणून झाला. अ‍ॅमस्टरडॅममध्ये पवनचक्कीचा वापर बाराव्या शतकात सुरू होऊन पाणी उपसण्याच्या तिच्या उपयोगामुळे इतर कुठल्याही युरोपीयन देशांपेक्षा हॉलंडमध्ये पवनचक्क्यांचे जाळेच तयार झाले. पहिल्या मिल्स खांबावर बसविल्या जात. पुढे त्या बांधीव मनोऱ्यावर बसवून वाऱ्याच्या दिशेप्रमाणे त्यांच्या सेलची म्हणजे पात्यांची दिशा बदलता येऊ लागली. पुढे या पवनचक्कीचा उपयोग विद्युत निर्मितीसाठीही होऊ लागला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com