स्थिरीकरणाच्या प्रक्रिया करताना नेहमी त्या कापडाला त्याच्या वापरादरम्यान पुन्हा कधीच अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेतली जाते. प्रत्यक्ष कापडाच्या पृष्ठभागाशी निगडित यांत्रिक प्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये ब्रशिंग, कॅलेंडिरग आणि उष्णता स्थिरीकरण यांचा समावेश होतो. कॅलेंडिरग प्रक्रियेद्वारे कापडाची चमक वाढवणे, कापडाची जाडी कमी करणे किंवा कापडातील सच्छिद्रता कमी करणे अशा उद्देशांचा समावेश असतो. या उद्देशानुसार वापरली जाणारी पद्धत बदलते. काही वेळेला नक्षी कोरलेले रोलर वापरून त्याचा एक वेगळा नक्षीकामाचा नमुना कापडावर उमटवला जातो. कापडाच्या विविधतेत भर घालणारी अशी ही कृती आहे.

इस्त्री करणे ही फिनििशगची शेवटची पायरी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर कापडावर काहीही करायला वाव राहात नाही. इस्त्री करताना त्या कापडासाठी कोणता तंतू वापरला आहे, त्या कापडाचा पोत आणि वीण कशी आहे, तसेच ते कापड कोणत्या कामाकरिता वापरले जाणार आहे हे तीन महत्त्वाचे निकष आहेत. काही कापडांना स्वच्छ आणि चमकदार फिनिश हवा असतो, तर अन्य काही कापडांना मऊ, गरम आणि जरा नेहमीपेक्षा वेगळा फिनिश हवा असतो.
या उद्देशाने ब्रशने कापड साफ केले जाते, तेव्हा कापडाचा स्पर्श मऊ होतो. ओळीत लागलेल्या तारेच्या ब्रशच्या रोलरद्वारे कापड साफ केले जाते. त्या वेळी कापडाच्या बाहेर आलेले सर्व तंतू काढून टाकले जातात, म्हणून कापडाचा स्पर्श मऊ होतो. कॅलेंडिरगमध्ये कापड रोलरच्या अनेक जोडातून पाठवले जाते. त्यामुळे कापडाला एकसारखेपणा येऊन त्याची चमक वाढते. कधी कधी नक्षीकामही केले जाते. सिजिंग या पद्धतीद्वारे ज्वालेच्या जवळून कापड पाठवून बाहेर डोकावणारे कापडावरचे तंतू जाळले जातात. धुलाईपूर्वी ही पद्धत उपयोगात आणली जाते.
विणलेल्या किंवा गुंफलेल्या कापडाला उबदार स्पर्श द्यायचा असेल तर त्याच्या पृष्ठभागावरील तंतू चक्क ओरबाडून त्याला केसाळ रूप दिले जाते. याला रेिझग पद्धत म्हणतात. ही सर्वात सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. काटेरी रोलरवरून कापड पाठवूनही हे साध्य केले जाते. गरजेनुरूप एक किंवा दोन रोलरचा वापर केला जातो. यामुळे टर्किश टॉवेलसारखे कापडाच्या पृष्ठभागावर टाके उभे राहतात, त्यामुळे कापडाला मऊपणा प्राप्त होतो.

सतीश दिंडे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

म्हैसूर राज्यस्थापना

भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीच्या आधिपत्याखाली एकूण ५६५ संस्थाने होती. त्यातील बहुसंख्य संस्थाने आपल्या राज्यातला महसूल गोळा करणे आणि नागरी सेवा यांची ब्रिटिशांकडून मक्तेदारी घेण्याचेच काम करीत असत. परंतु त्यापकी फक्त २१ संस्थानांचे स्वत:चे सरकार आणि प्रशासन होते. त्या २१ संस्थानांपकी हैदराबाद, म्हैसूर, जम्मू-काश्मीर या तीन संस्थानांकडे स्वत:चे विशाल राज्यक्षेत्र होते. त्यांना ब्रिटिश राजवटीने २१ तोफांच्या सलामीचा मान दिला. म्हैसूरचे राज्यक्षेत्र ७५,६०० चौ.कि.मी. होते. विजयनगर साम्राज्यात म्हैसूर हे एक लहानसे खेडे असताना विजय वोडीयार याने तिथे आपले छोटेसे राज्य १३९९ साली स्थापन केले. इ.स. १३९९ ते १५६५ या काळात म्हैसूरचे हे वोडीयार घराण्याचे राजे विजयनगर राज्याचे मांडलिक म्हणून कार्यरत होते. ‘ओडीयार’ या शब्दावरून ‘वोडीयार’ हे नाव तयार झाले. ओडीयारचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो ‘मालक’ व दुसरा ‘कुंभाराचे चाक’. विजयनगरचे मांडलिकत्व स्वीकारल्यावर यदुराज वोडीयार या राजाची कारकीर्द सन १३९९ ते १४२३ अशी झाली. १५६५ साली विजयनगर राज्याला उतरती कळा लागल्यावर म्हैसूरचा राजा नरसराज वोडीयार याने विजयनगरचे मांडलिकत्व झुगारून स्वतंत्र म्हैसूर राज्याची घोषणा केली. त्याने मदुरा, इक्केरी, नागमंडल हा प्रदेश जिंकून, आपल्या राज्यात सामील केला. स्वत:ची टांकसाळही त्याने सुरू केली. दोडा देवराज या राजाने चामुंडा टेकडीच्या शिखरापर्यंत एक हजार पायऱ्या बांधून त्याच टेकडीवरील एका पाषाणातून कोरून तयार केलेला भव्य नंदी आजही सुस्थितीत आहे. दोडा देवराज वोडीयार याची कारकीर्द इ.स. १६५९ ते १६७३ अशी होऊन या काळातच म्हैसूर राज्याची वाटचाल संपन्नतेकडे सुरू झाली.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com