जिथे कापड वापरले जाणार असेल, त्यानुसार रसायने वापरून ही प्रक्रिया केली जाते. आगीशी झुंजताना वापरणाऱ्या कपडय़ासाठी अग्निरोधक फिनिश, कपडय़ावर डाग पडू नयेत म्हणून डागांना अटकाव करणारा फिनिश किंवा कोणत्याही प्रकारच्या किडय़ांचा परिणाम होऊ नये म्हणून कीड प्रतिबंधक फिनिश असे वेगवेगळे प्रकारचे फिनिश गरजेनुरूप वापरले जातात. प्लाझ्मा फिनिश वापरून त्या कापडावर नक्षीकाम केले जाते. त्याला विशिष्ट पद्धत अवलंबली जाते. पण हा फिनिश टिकाऊ नसल्याने त्याचा वापर तुरळक प्रमाणात आहे. अर्थात हा फिनिश त्या कापडाच्या पृष्ठभागापुरता मर्यादित असतो.

रंगाई आणि फिनििशग या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच कापडाच्या आकाराला स्थिरता येते. सगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांमधून कापड जाताना ते ताणले जाते. त्यामुळे त्याची कापडाच्या दर्जानुसार, पुनस्र्थापना करणे गरजेचे असते. अन्यथा त्या त्या कापडाचा जो अंतिम वापर आहे तिथे ते कमी पडेल, कदाचित काही वेळा आटेलही. कापडाच्या स्थिरीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरात आहेत.
‘कॅलेंडर कॉम्प्रेसिंग’ या पद्धतीत यांत्रिक मार्गाचा वापर करून स्थिरीकरण केले जाते. कापड गरम केलेल्या रोलरमधून पाठवले जाते. यामुळे गुंफाई (निटेड) केलेल्या कापडातील हवेच्या पोकळ्या नियंत्रित केल्या जातात. लोकरी कापडासाठी वापरली जाणारी स्थिरीकरण पद्धत ‘डिकॅटिसिंग’ या नावाने ओळखली जाते. सुती कापडाच्या दोन संचामध्ये लोकरी कापड ठेवून त्यावर दाब दिला जातो. ऑटोक्लेव्हमध्ये ठेवून या कापडावर सुयोग्य दाब देऊन ते गरम केले जाते. या सर्व प्रक्रियेचा उपयोग होऊन लोकरी कापडाला व्यवस्थित आकार प्राप्त होतो. उष्णता स्थिरीकरण ही आताच्या घडीला जास्त प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे. त्याचा उपयोग नसíगक आणि मानवनिर्मित तंतूपासून उत्पादित केलेल्या कापडासाठी केला जातो. काप्रेटसाठी तर याचा उपयोग अनिवार्य म्हणायला हवा. या प्रक्रियेद्वारे सुतावरचा ताण कमी केला जातो. अन्यथा काप्रेट आटले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
कापडाचा अंतिम वापर लक्षात घेता, ही प्रक्रिया बदलणे पण आवश्यक ठरते. सॅनफोरायिझग प्रक्रियेत यांत्रिक पद्धतीचा वापर केला जातो. कापडावर उष्णता आणि दमटपणाचा उपयोग करून दाब असलेल्या रोलरमधून ते पाठवले जाते. परिणामी सुरकुतीविरहित असे कापड आपल्याला मिळते.

 

संस्थानांची बखर

अखेरच्या निजामाची कारकीर्द

हैदराबाद संस्थानाचा बहुचíचत आणि अखेरचा अधिकृत निजाम उस्मान अलीखान (सातवा) असफजाह याची कारकीर्द इ.स. १९११ ते १९४८ अशी झाली. स्वातंत्र्यपूर्व भारतातील संस्थानांपकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेल्या हैदरबादचे राज्यक्षेत्र २,२३,००० चौ.कि.मी. होते. सध्याच्या युनायटेड किंगडमहून अधिक आणि इटलीच्या बरोबर क्षेत्रफळ असलेल्या हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या १९४१ साली दीड कोटीहून अधिक होती.
उस्मानअलीखानाने दोन प्रशासकीय मंडळे स्थापन केली. ‘बाबे हुकुमत’ या मंडळात लष्कर, व्यापार, खजाना, राजकीय व्यवस्था, अदालत अशी महत्त्वाची खाती होती. ‘सदर आझम’ हा या मंडळाचा अध्यक्ष असे. ‘मजलीस वाजे कनानिन’ या मंडळात कमी महत्त्वाची खाती होती. निजामाने देशभरातून सुशिक्षित, कर्तबगार मुस्लीम समाजाचे लोक आणून आपल्या प्रशासनात ठेवले होते. १९३० साली निजामाकडचे पूर्ण १२,००० कर्मचारी मुस्लीम होते. स्थानिक मुस्लीम कर्मचार्याना ‘मुल्की’ तर इतर राज्यांतून आलेल्यांना ‘गरमुल्की’ असा शब्द होता. बहुतेक सर्व कर्मचारी, सरदार आणि किल्लेदार मुस्लीमच असावेत असा निजामाचा दंडक होता.
उस्मान अलीखानच्या कारकीर्दीत ‘बाकायदा’ म्हणजे लष्कर आणि ‘बेकायदा’ म्हणजे पोलीस मिळून एकूण १८,००० ची तनाती फौज होती. लष्कर आणि पोलीस प्रशासनात मुस्लीमांचे प्रमाण ९५% होते. हैदराबाद संस्थानाच्या शासकांनी प्रथम फारसी आणि पूढे उर्दूला राजाश्रय दिला. प्रशासकीय व्यवहारांसाठी उर्दू भाषेचाच वापर केला जाई. निजाम उस्मान अलीखानाने पुरस्कृत केल्यामुळे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हैदराबादेत वझीर सुलतान टोबॅको फॅक्टरी (चारमिनार), हैदराबाद एॅसबेस्टॉस, निजाम शुगर फॅक्टरी, प्रागा टूल्स इत्यादी उद्योग सुरू होऊन हैदराबाद हे एक वैभव संपन्न संस्थान बनले होते. त्या संपन्नतेमुळेच, भारत आणि पाकिस्तानपेक्षा निराळा देश म्हणून हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहू शकेल, असा भ्रम निजामाला झाला होता.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com