पिकाचे गुणधर्म त्याच्या पेशींतील जनुकरचनेवर अवलंबून असतात. त्यामुळे पिकाच्या जनुकरचनेत योग्य बदल केल्यास त्यातून अधिक चांगल्या गुणवत्तेची पिके तयार व्हायला हवीत. मोन्सॅन्टो या अमेरिकन कंपनीतील संशोधकांनी १९८२ साली जनुकीय बदल केलेले असे पहिले पीक तयार केले. मात्र तंबाखूच्या रोपावर केलेल्या या पहिल्या यशस्वी प्रयोगात संशोधकांनी प्रतिजैविकविरोधी गुणधर्म निर्माण केले होते. तंबाखूच्या रोपांतील पेशींची वाढ सहज होत असल्यानेच या प्रयोगासाठी तंबाखूच्या रोपाचा वापर केला गेला.

एखादा जनुक वनस्पतीच्या पेशींत जर थेट टोचला, तर त्या वनस्पतीत जनुकीय बदल घडून येण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच यासाठी ‘अ‍ॅग्रोबॅक्टेरियम टय़ुमेफेशियन्स’सारख्या जिवाणूंचा वापर केला जातो. असे जिवाणू इतर जनुकांना आपल्या पेशींत सहजपणे सामावून घेतातच, पण त्याचबरोबर आपल्याकडचे जनुकही ते दुसऱ्या वनस्पतीत सहजपणे स्थानांतरित करू शकतात. मोन्सॅन्टो कंपनीतील संशोधकांनी यीस्टमध्ये आढळणाऱ्या, एका प्रतिजैविकविरोधी जनुकाचा वापर आपल्या प्रयोगात केला. त्यांनी प्रथम या जनुकाची इ. कोलाय या जिवाणूंत मोठय़ा प्रमाणात निर्मिती केली व तो जनुक जैवरासायनिक पद्धती वापरून इ. कोलायपासून वेगळा केला. त्यानंतर या जनुकाच्या सान्निध्यात अ‍ॅग्रोबॅक्टेरियम जिवाणूची वाढ केली. या क्रियेत अ‍ॅग्रोबॅक्टेरियमने हा जनुक आपल्यात सामावून घेतला. त्यानंतर हे अ‍ॅग्रोबॅक्टेरियम जिवाणू या संशोधकांनी तंबाखूच्या रोपात टोचले. परिणामी जनुकीय बदल झालेल्या पेशींची या रोपात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन, कॅनामायसिनसारख्या प्रतिजैविकांना दाद न देणारे गुणधर्म या रोपात निर्माण झाले.

सन १९८७ मध्ये जनुकांच्या स्थानांतरासाठी ‘जीन गन’चा वापर होऊ लागला. या प्रक्रियेत प्रथम सुमारे एक सहस्रांश मिलिमीटर आकार असणाऱ्या सोन्याच्या सूक्ष्म कणांवर डीएनएच्या रेणूंचा लेप दिला जातो. त्यानंतर ‘जीन गन’द्वारे या कणांचा वनस्पतीवर मारा केला जातो. हे कण वनस्पतीच्या पेशींत शिरतात व त्यानंतर त्या पेशींत जनुकीय बदल घडवून आणू शकतात. या जनुकीय बदलामुळे त्या वनस्पतीचे गुणधर्म बदलतात. आजच्या संशोधनातील जनुकीय रोपणासाठी अ‍ॅग्रोबॅक्टेरियमसारखे जिवाणू तसेच जीन गन या दोन्हीही पद्धतींचा वापर सोयीनुसार केला जातो. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे, नवे गुणधर्म असणाऱ्या नव्या पिकांची निर्मिती करणे शक्य झाल्याने, जनुकीय अभियांत्रिकीची आजच्या आघाडीवरील संशोधन क्षेत्रात गणना होते.

डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org