08 April 2020

News Flash

कुतूहल : पहिले ‘वृक्ष संमेलन’

वृक्ष लागवड हे एकटय़ाचे काम नाही, त्यासाठी लाखो हात एकत्र येण्याची गरज असते.

वृक्ष हा सुदृढ पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. वृक्ष लागवड, संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलामधील त्याचे सकारात्मक कार्य अधोरेखित करण्यासाठी देशामधील पहिले वृक्ष संमेलन मराठवाडय़ात, बीड शहराजवळील पालवणच्या एकेकाळच्या उजाड डोंगरमाथ्यावर आता फुललेल्या नंदनवनामध्ये १३ आणि १४ फेब्रुवारीस चित्रपट अभिनेते  सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेमधून भरते आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने दिलेल्या दोनशे हेक्टर क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत ‘सह्याद्री देवराई’ हा वृक्ष लागडीचा प्रकल्प शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला गेला. त्यांनी शासन, वृक्षप्रेमी आणि लोकसहभागामधून ‘येऊन येऊन येणार कोण? झाडांशिवाय आहेच कोण?’ अशी घोषणा देत ग्रामीण युवकांमध्ये वृक्षप्रेम निर्माण करून या दुष्काळी क्षेत्रावर विविध प्रकारच्या साठ प्रजातींची तब्बल दोन लाख ९० हजार ३१७ झाडे यशस्वीपणे लावली आहेत.

वृक्ष लागवड हे एकटय़ाचे काम नाही, त्यासाठी लाखो हात एकत्र येण्याची गरज असते. यशोगाथा अशाच तयार होतात हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी हे संमेलन एक निमित्त आहे. या संमेलनाच्या उद्घाटनाचा अध्यक्ष आहे एक वटवृक्ष. साहित्य संमेलनात ज्याप्रमाणे ग्रंथिदडी काढतात त्याचप्रमाणे येथेही वृक्षिदडी निघणार आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारी या दिवशीच्या सांगता समारंभास पक्षिराज गरुड आणि अजगर हजर असणार आहेत. एका पक्षीप्रेमीच्या मदतीने तंदुरुस्त झालेला हा गरुड समारोपाच्या कार्यक्रमात आकाशात मुक्त भरारी घेणार आहे, त्याचबरोबर जखमी अजगरही आता तंदुरुस्त झाल्याने जंगलात जाणार आहे.

पालवणच्या या नंदनवनामध्ये वृक्षप्रेमी, जिल्ह्यामधील सर्व शाळांतील विद्यार्थी आणि नागरिकांना वृक्ष-रूपामधून २७ नक्षत्रे, सप्तऋषी, पंचवटी आणि रॉक गार्डनसुद्धा पाहावयास मिळणार आहे. साहित्य संमेलनामध्ये आपण भरपूर पुस्तकांची खरेदी करतो त्याप्रमाणे येथेही खरेदी करता येईल; मात्र ती अल्प किमतीत मिळणाऱ्या वृक्ष रोपांची! ‘प्रत्येकाने संमेलनास येताना तांब्याभर पाणी या तहानलेल्या वृक्षांसाठी जरूर आणावे’ असेही संवेदनशील आवाहन सयाजी शिंदे करतात.

अशा यशोगाथा महाराष्ट्रातील प्रत्येक उजाड डोंगरावर, माळरानावर वृक्षाच्या हरित लेखणीमधून न मिटता लिहिल्या जाणे आणि त्या ठिकाणी अशा वृक्ष संमेलनाच्या चळवळी लोकसहभागामधून उभ्या राहणे ही काळाची गरज आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 12:15 am

Web Title: first tree conference zws 70
Next Stories
1 मनोवेध : स्नायू शिथिलीकरण
2 मनोवेध : कर्ता आणि साक्षी
3 कुतूहल : प्रवाळांचा रंग गेला कुठे?   
Just Now!
X