भारताचा गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादनात जगात दुसरा क्रमांक लागतो. गोडय़ा पाण्यातील मत्स्यव्यवसायाचा दर ६ टक्के एवढा आहे. एकूण मत्स्यव्यवसायाचा दर ४.५ टक्के आहे. खोल समुद्रातील मासेमारीपासून उत्पन्नात थोडी फार वाढ होऊ शकते. परंतु मत्स्यसंवर्धन क्षेत्रात मात्र प्रगतीसाठी मोठय़ा प्रमाणात वाव आहे.
महाराष्ट्रात गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ३ लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र उपलब्ध आहे. आपल्याकडे गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये मत्स्यजिरे हे मत्स्यबीज या आकारापर्यंत संगोपन तलावांमध्ये वाढवले जातात. दुसऱ्या टप्प्यामध्ये मत्स्यबीज हे मत्स्यबोटुकली आकारापर्यंत वाढवतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये मत्स्यबोटुकली बाजारपेठेला योग्य अशा आकारमानापर्यंत वाढवतात. अशा प्रकारच्या गोडय़ा पाण्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापकी ८५ टक्के एवढा भाग भारतीय प्रमुख कार्प या जातीच्या माश्याच्या संवर्धनापासून मिळतो.
गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंवर्धन उत्पन्न वाढीकरिता शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बीज योग्य वेळी उपलब्ध होणे आवश्यक आहे. जलाशयामधून अधिकतम मत्स्यउत्पादन मिळण्याकरिता मत्स्यबोटुकली आकाराचे बीज सोडले पाहिजे. परंतु बोटुकलीअभावी मत्स्यशेतकरी जलाशयामध्ये मत्स्यबीजाचे अथवा मत्स्यजीरयांचे संवर्धन करतात. मत्स्यबोटुकलींची असणारी प्रचंड मागणी व पुरवठा यांमधील तूट भरून काढण्यासाठी अधिकाधिक मत्स्यबीज केंद्रे व संगोपन तलाव निर्माण होणे आवश्यक आहे.
गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये जम्बो कोळंबी संवर्धन हा एक अधिक आर्थिक नफा देणारा व्यवसाय आहे. गोडय़ा पाण्यातील कोळंबी संवर्धनामध्ये आंध्र प्रदेश हे एक अग्रेसर राज्य आहे. गोडय़ा पाण्यातील कोळंबी संवर्धनामध्ये मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापकी ८७ टक्के एवढे उत्पन्न फक्त आंध्र प्रदेश राज्यामधून मिळते. गोडय़ा पाण्यातील कोळंबी निर्यातक्षम व अधिक नफा देणारी असल्यामुळे याच्या संवर्धन क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात सतत ऊस शेतीमुळे क्षारपड झालेल्या जमिनीमध्ये कोळंबी संवर्धन व्यवसाय यशस्वीरीत्या केला जात आहे.

वॉर अँड पीस – नितळ त्वचेकरिता सुवर्णजल
आयुर्वेदीय औषधी महासागरात शेकडो, हजारो औषधीयोग आहेत. या औषधीयोगात सुवर्णापासून तयार केलेली औषधे यांना खूप खूप अग्रक्रमाचे महत्त्व आहे. सुवर्णभस्म हे घटकद्रव्य असणारी सुवर्णमालिनीवसंत, सुवर्णसूतशेखर, लक्ष्मीविलास, हेमगर्भ ही औषधे सामान्यांच्याच काय, पण खूप श्रीमंत लोकांच्याही आटोक्याच्या बाहेरची होत आहेत. आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाप्रमाणे सुवर्णाला आयुष्यवर्धक म्हणून मोठे अग्रक्रमाचे स्थान आहे. सुवर्ण म्हणजे नुसताच ‘सुवर्ण’ नसून ते कधीही काळे पडत नाही, गंजत नाही, खराब होत नाही. सुवर्ण सदा निर्मळ असते. चांदीचे भांडे काही काळाने काळवंडते. तांब्याचे भांडे हिरवे निळे होते. लोखंडाच्या भांडय़ावर गंज चढतो. सोने, शंभर नंबरी सोने शरीराकरिता योग्य प्रकारे वापरले गेले तर तुम्हा-आम्हाला निर्मळ, निरोगी, निरामय आयुष्य देते. त्याकरिता सुवर्णाचा मूळ धातू न गमावता सुवर्णसिद्धजलाचा निश्चित उपयोग होतो.
शुद्ध सुवर्ण वितळल्याबरोबर लालबुंद होते. त्याची प्रभा सर्वत्र पसरते म्हणून त्याला ‘सुवर्ण’ म्हणतात. ते स्पर्शाने स्निग्ध, कोमल, कसोटीच्या दगडावर घासल्यास पिवळी रेघ उठणारे व वजनाने जड, विशिष्ट गुरुत्व खूप असणारे असते. सोने कापून गरम केल्यावर पांढरे होते. सुवर्णजल सिद्ध करण्याकरिता कदापि तांबेमिश्रित किंवा चांदी मिसळलेले सोने वापरू नये.
सुवर्णसिद्धजलाकरिता एक ग्रॅम शुद्ध सोन्याची तार, दोन कप पाणी, एकत्र उकळावे. पाव कप उरवावे. असे पाणी नियमितपणे सकाळी काही खाण्या-पिण्याच्या अगोदर घ्यावे. तासाभराने नाष्टा किंवा न्याहरी करावी. असे सुवर्णजल तयार केल्याने सुवर्णामध्ये कोणतीही घट होत नाही. त्याला नुकसान पोहोचत नाही. सुवर्णामुळे विषविकार, पित्तविकार, हृदयविकार, दुर्बलता, गर्भदोष, नेत्रविकार यावर सहज मात करता येते. खूप कृश व पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने उपाशीपोटी सुवर्णसिद्धजल घेऊ नये. रक्तीमूळव्याध असणाऱ्यांनी सुवर्णजल टाळावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..  – सरकारी साधनशुचिता
परवा केस कापवायला गेलो होतो तेवढय़ात एक माणूस आला आणि नुसताच उभा राहिला. माझा नेहमीचा कारागीर म्हणाला, ‘‘गया आठवाडीयामा तो आव्या हता.’’ तेव्हा तो महानगरपालिकावाला म्हणाला, ‘‘नवे साहेब आले आहेत. नवा रतीब आजपासून सुरू.’’ मी कारागिराला म्हटले, ‘‘तू का दिलेस’’ तर म्हणाला, ‘‘दिले नाहीत तर उगीचच नोटीस पाठवतात आणि त्रास देतात. प्रत्येकाचे भोग असतात ते सहन करावे लागतात.’’ मग त्याने माझे लाड चालू केले. केस-दाढी, नाकातले केस, मालिश, आंग रगडून देणे. शिवाय थरथर करणारे मशीन डोक्यावर फिरविणे आणि नवरतन तेल लावणे हे सगळे आणि शिवाय गावातल्या बातम्या ऐकणे एवढे सारे मिळून शंभर रुपये होतात. हल्ली बायकाही केस कापतात आणि सेट करतात त्याचे पाचशे होतात.  
मी केशकर्तनालयातून बाहेर पडलो तर हमरस्त्यावर महानगरपालिकेच्या गाडय़ा आल्या होत्या. सगळीकडे फेरीवाल्यांची पळापळ. लाकडी स्टँड तोडत होते. भाज्या उचलत होते. हप्ता दिला होता तरी हे ओढवले होते. हे तोडफोड करणारे कामगार आणि हे फेरीवाले त्याच वस्तीतले होते. आता एकमेकांसमोर उभे ठाकले होते, पण हे महिन्यातून एकदा करावेच लागते. याला सरकारी साधनशुचिता म्हणतात. ही पळापळ होते तेव्हा रस्त्यावरच्या अधिकृत दुकानात माल ठेवला जातो. गाडय़ा गेल्यावर माल बाहेर काढतात. त्या दिवशी एक फेरीवाला त्याची केळी परत घेऊन जात होता तर किरणावाला म्हणाला, ‘‘एक डझन इथेच ठेव. घरातली संपली आहेत. हाही हप्ताच.
मला समाजसेवा करण्याची मोठी हौस, त्याला धर्मदाय संस्था वगैरे लागतात. त्याला देणग्या देणारे विचारतात, इन्कम टॅक्समध्ये किती सूट मिळेल. त्यासाठी एक प्रमाणपत्र मिळते. मग देणाऱ्याला ५० टक्के सूट मिळते. हे प्रमाणपत्र मिळविणे एक दिव्य असते. एकदा एक म्हणाला, ‘‘पैसे दिल्याशिवाय हे काम होत नाही.’’ मग मी इन्कम टॅक्स कार्यालयात गेलो. तिथला कारकून म्हणाला, ‘‘किती पैसे जमवणार आहात?’’ मी म्हणालो, ‘‘दहा लाख जमवीन.’’ तो म्हणाला, ‘‘थोडय़ा दिवसांनी या.’’ मग मी त्याच्या अधिकाऱ्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘‘इतके दिवस झाले प्रमाणपत्र मिळाले नाही. मी पाच हजार रुपये लाच आणली आहे कोणाला देऊ?’’ तो एकदमच उडाला. त्याने कारकुनाला बोलावले. म्हणाला, ‘‘याचे प्रमाणपत्र कुठे आहे?’’ कारकून म्हणाला, ‘‘तयार आहे.’’ मग त्याने ते मला दिले. मग म्हणतो कसा, ‘‘पाचशे रुपयाच्या कामाला तुम्ही ५००० कशाला देऊ केले?’’
 मी म्हणालो, ‘‘मला दर माहीत नव्हता!’’
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – १० सप्टेंबर
१८८०> ‘मराठवाडय़ातील वाङ्मयाचा इतिहास’, ‘श्रीधर चरित्र आणि काव्यविवेचन’ आदी ग्रंथ लिहिणारे, उस्मानिया विद्यापीठाच्या स्थापनेपासून तेथील मराठी विभागप्रमुख झालेले चिंतामण नीलकंठ जोशी यांचा जन्म.
१९०० > सुरुवातीस रॉयवादी नियतकालिकांचे संपादक आणि पुढे गांधीवादाचे समर्थक बनलेले गजानन यशवंत चिटणीस यांचा जन्म. ‘गांधीवादाचे समर्थन’, कुसुम, विजू या कादंबऱ्या, ‘नवा पाईक’ हे नाटक व ‘माझ्या आठवणी’ ही त्यांची पुस्तके.
१९२९> मराठी ज्ञानभाषा व्हावी या हेतूने अनवट विषयांवर लिहिणारे रावजी भवानराव पावगी यांचे निधन. ‘विलायतचा प्रवास (दोन भागांत)’, तसेच ‘राष्ट्रकथनमाले’तून ‘तुर्कस्थान’चा परिचयग्रंथ आणि चार्ल्स ब्रॅडले, एमजी व अ‍ॅनी बेझंट यांची चरित्रे त्यांनी लिहिली होती.
१९३३ > ‘संपूर्ण चातुर्मास’ या धार्मिक ग्रंथाचे कर्ते विश्वनाथ केशव फडके यांचा जन्म. अन्यही अनेक छोटीमोठी पुस्तके त्यांच्या नावावर असून ही संख्या तब्बल १२५ पर्यंत जाते. त्यापैकी ‘गायत्री उपासना’ तसेच फडके यांनी फलज्योतिषाविषयी लिहिलेली पुस्तके विशेष लोकप्रिय झाली.
– संजय वझरेकर