मत्स्य व्यवसाय चिकाटीचा पण सोप्या स्वरूपाचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या पद्धतींनी हा व्यवसाय करता येतो.
१. मत्स्यबीज पुरवणे: महाराष्ट्रात लहान- मोठे मत्स्य तलाव, शेततळी, लहान-मोठी धरणे आहेत. उच्च प्रतीचे बीज योग्य वेळी उपलब्ध होणे, ही मत्स्य संवर्धनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मत्स्यबीजांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून मत्स्यबीज सहजरीत्या उपलब्ध होते. मत्स्यशेती करणाऱ्या इच्छुकांपर्यंत मत्स्यबीज पोहोचवून स्वयंरोजगाराचे चांगले साधन उभे करता येऊ शकते.
२. लघू व मोठय़ा धरणांमध्ये मत्स्य संवर्धन: लहान व मोठय़ा धरणांमध्ये कटला, रोहू, मृगल माशांची शेती होऊ शकते. सोबत गोडय़ा पाण्यातील झिंगेदेखील वाढवता येतात. यांच्या संवर्धनाचा कालावधी एक वर्षांचा असून त्यांना बाजारात चांगली मागणी व किंमत असते. मत्स्य सोसायटी स्थापन केल्यास या माशांच्या संवर्धनासाठी मत्स्य विभागाकडून आपणांस लघू व मोठे तलाव भाडेतत्त्वावर उपलब्ध होऊ शकतात.
३. शोभिवंत माशांचे मत्स्य तलावातील संवर्धन: आपल्याकडे शेतजमीन असल्यास त्यात गोल्डफिश, एंजल, मोली, गप्पी आणि स्वर्डटेल या गोडय़ा पाण्यातील शोभिवंत माशांचे संवर्धन करता येईल. या माशांचे बीज तळ्यात सोडल्यास ३-४ महिन्यांत बाजारात विक्री करता येईल एवढय़ा आकारापर्यंत त्यांची वाढ होते. त्यांना बाजारात चांगली किंमत मिळते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शोभिवंत माशांना अतिशय चांगली मागणी आहे.
४. अॅक्वेरियम (मत्स्यटाकी) बनवणे व विकणे: मत्स्यटाकीला घर, हॉटेल, कॉलेज, दवाखाने, मॉल या ठिकाणी मागणी असते. मत्स्यटाकीला लागणारे सामान पुरवणे, मत्स्यटाकीत शोभिवंत माशांची वाढ व विक्री असे व्यवसायही यात करता येतील.
५. मत्स्यपदार्थ तयार करणे व विकणे: कमी दर्जाच्या तसेच स्वस्त असलेल्या मासळीपासून मत्स्यशेव, मत्स्यचकली, मत्स्यवडा, कोळंबी लोणचे वगरे पदार्थ बनवता येतात. महिला बचत गट हे पदार्थ बनवून हॉटेल, मॉल तसेच घराघरांत जाऊन विकू शकतात. हे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षणही
उपलब्ध आहे.

जे देखे रवी.. – उंदीर, कुंपण आणि हत्ती
असे म्हणतात की, कोठल्याही समाजात दहा टक्के लोक दुर्जन असतातच. ते असे का असतात याचे उत्तर हा निराळा विषय आहे; परंतु समाजाचे स्वास्थ्य हा टक्का जसा वाढतो त्या प्रमाणात बिघडते असे एक प्रमेय आहे. शेत असेल तर उंदीर असणार हे सिद्ध आहे. उंदीर फार खाऊ लागले तर परिस्थिती गंभीर बनते. उंदीर निसर्गाचे अपत्य असते; परंतु कुंपण निसर्गात जन्मलेल्या माणसाने हेतुपूर्वक बनविलेले असते आणि कुंपण ही गोष्ट नेहमी तारेचीच असते असे नाही तर दगड-विटांचेही असू शकते, कारण मोठी जनावरे शेत फस्त करणार नाहीत, अशी अपेक्षा असते. उदा. हत्ती. हा प्राणी प्रचंड असतो आणि हा हत्ती शेत नुसते खात नाही तर तुडवतोही. अर्थात दगड-विटांचे कुंपण शेतकऱ्याला अशक्य असते. हे एक आणि दुसरे कसलेही कुंपण असो, ते जर शेत खाऊ लागले तर उंदीर परवडले, असे म्हणण्याची वेळ येते. याही पुढे जर हेच कुंपण हत्ती आल्यावर फाटक उघडू लागले तर मग असामान्य संकट तयार होते. भारतातली सध्याची स्थिती अशी आहे. आधी समाजवादाचा नारा देत उत्पादनाचा स्रोत जवळजवळ बंदच होता. त्या वेळी जे थोडे पिकत होते त्यातले थोडे उंदीर खात होते. नंतर उदारीकरण आले आणि सरकार नावाच्या कुंपणाच्या आजूबाजूला अनेक उद्यमशील आणि धूर्त प्राणी जमा झाले.
यातले अनेक एकतर राजकारणात शिरले आणि लोकप्रतिनिधी झाले किंवा लोकप्रतिनिधींचे ते पित्तेपुत्र किंवा पितर होते. तेव्हा या सरकार नावाच्या कुंपणाने आपले फाटक दर ठरवून उघडण्यास सुरुवात केली. त्यातले एक ताजे उदाहरण एका तथाकथित उद्योग समूहाचे आहे. केवळ पैशाचा खेळ करणाऱ्या या उदारमतवादी समूहाने सगळे त्यांचे नोकरदार हेच खरे मालक असे नाटक वठवले, मग कुठे जमिनी बळकाव, कुठे नवीन शहरे उभी कर, कुठे क्रिकेटच्या टीम्स विकत घे, अशी थेरं केली. मग सामान्य जनतेकडून लाखोंच्या संख्येने हजारो कोटी रुपये व्याजी घेतले. गंमत अशी की ही उलाढाल बँका आणि रोखे व्यापाराचा नियंत्रक (सेबी) यांच्या नजरेआड केली. पुढे काहींना जाग आली तेव्हा तक्रारी झाल्या. सरकार ऊर्फ कुंपण गप्प बसले.
या कुंपणानेच दार किलकिले ठेवले होते. काही लोकांनी मामला लावून धरला, तेव्हा असे दिसू लागले की, हे पैसे गुंतविणारे लोक सापडतच नाहीत. शेवटी कोर्टाने कडक पवित्रा घेतल्यावर असे लक्षात येऊ लागले आहे की, कुंपण आणि हा हत्ती साथीदार होते. भ्रष्टाचारात तयार झालेला हा काळा पैसा पांढरा होऊन नव्या प्रकारचा पांढरा हत्ती तयार होऊ घातला होता.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस श्र्लीपद : –  हत्तीरोग
श्र्लीपद- हत्तीरोग पूर्णपणे बरे व्हायला खूपखूप काळ लागतो. रोगी कंटाळतो. मधेच औषधोपचार थांबवतो. या रोगाची कारणपरंपरा पुढीलप्रमाणे आहे. रक्तगत व मांसगत कफाधिक दोष, अडसंधी, मांडय़ा इत्यादी शरीराच्या खालच्या भागी जाऊन काही काळाने पायास सूज उत्पन्न करितात. ही सूज हळूहळू वाढते व कठीण असते. त्यास श्र्लीपद म्हणतात. पाय शिळेप्रमाणे जड होतो म्हणून श्र्लीपद म्हणतात.
प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथात या रोगाने ग्रस्त रुग्ण खूप थंड प्रवेश, दलदलीच्या प्रदेशात आढळतात असे वर्णन आहे. आपल्या महाराष्ट्रात ठाणे विभागात एक प्रकारचा डास चावल्यामुळे खूप मंडळी हत्तीरोगाने त्रस्त होऊन ठिकठिकाणी उपचारांकरिता जात असतात. कारण पाय हत्तीसारखा जड झाल्यामुळे हालचाल मंदावते; चालणे जिकिरीचे होते. एकूण स्वास्थ्य खलास होते. याची आधुनिक वैद्यकाप्रमाणे झोपेत रक्ततपासणी होऊन रोगनिश्चिती केली जाते. डास चावणे हे कारण असते. या रोगात सूजव्यतिरिक्त ताप, त्वचेचा रंग काळा, गडद असणे; व्हेरिकोजव्हेन्स अशी पायाच्या पोटरी मांडीवर सूज असणे; क्वचित जखम होणे अशी ही लक्षणे आढळतात. केवळ पायाची सूज; खूपखूप जडत्व अशी लक्षणे असल्यास उपचार सोपे, कमी पण दीर्घकाळ घ्यावयास लागतात असे आहे.आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, रसायनचूर्ण नियमितपणे घेणे. दोषघ्नलेपगोळीचा दाट, गरम लेप एक वेळेस; महानारायण तेलाचे अभ्यंग दोन वेळा करावे. रक्ताचे प्रमाण तपासावे. ते कमी असल्यास सुवर्णमाक्षिकादिवटी, पुष्टीवटी घ्यावी. व्हेरिकोज्व्हेन्स, खूप काळेपणा, जखमा असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने जळवा लावणे, रक्तमोक्षण करणे उपयुक्त ठरते गणेशप्रसाद, गणेशकृपा किंवा प्रवाळ, कामदुधा या गोळ्या महातिक्तघृताबरोबर; सकाळी उपळसरीचूर्ण, रात्रौ त्रिफळाचूर्ण घ्यावे. त्रिफळाचूर्णाच्या काढय़ाने जखम, सूज धुवावी; एलादितेल लावावे. कटाक्षाने मीठ, जडान्न टाळावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत ११ सप्टेंबर
१८६७ > वेदांचे गाढे अभ्यासक (वेदवाचस्पती) श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. मराठी, हिंदी व इंग्रजी मिळून तब्बल ४०० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
‘वैदिक धर्म’ हे हिंदी व ‘पुरुषार्थ’ हे मराठी मासिक त्यांनी काढले होते. ‘संस्कृत स्वयंशिक्षक’ या मालेत २४ पुस्तके, ‘भारतीय संस्कृती’ हा ५० लेखांचा संग्रह, एक हजार पृष्ठांची ‘उपनिषद भाष्य ग्रंथमाला’ असे लेखन त्यांनी केले.
१८९५> आचार्य विनोबा भावे (विनायक नरहर भावे) यांचा जन्म. ‘गीताई’ हे भगवद्गीताभाष्य व ‘मधुकर’ ही निबंधमाला, याखेरीज स्वराज्यशास्त्र, जीवनदृष्टी, क्रांतिदर्शन, दीक्षा, गुरुबोध, कुराणसार, भागवतसार आणि धम्मपद, तसेच ‘भूदान गंगा’ अशी ४० पुस्तके त्यांनी लिहिली होती.
१९०१ > मराठी कवितेला आधुनिक रूपबंध देणारे कवी ‘अनिल’ तथा आत्माराम रावजी देशपांडे यांचा जन्म. ‘दशपदी’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त संग्रहात दहा ओळींच्या कवितेचा नवा प्रकार होता, तर ‘निर्वासित चिनी मुलास’ हे दीर्घकाव्य, ‘कोंबडा’ सारखी कविता यांतून नव्या जगाच्या नव्या प्रश्नांना भिडण्याची त्यांची ताकद दिसली. अर्थात, अनिल ओळखले गेले ते त्यांच्या संयत प्रेमकवितांसाठी!
– संजय वझरेकर