देशातील खाद्यान्नाचे उत्पादन कितीही वाढवले तरी वाढत्या लोकसंख्येस पोषक आहार पुरवणे फक्त शेतीद्वारे अशक्य आहे. कृषी उत्पादनात वाढ करण्यास एक मर्यादा आहे. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत अन्नपुरवठा वाढवण्यासाठी उत्पादनाचे अन्य साधन आणि पर्याय शोधणे अपरिहार्य आहे.
अन्य पर्यायांमध्ये सर्वात फायदेशीर अन्न उत्पादनाचा स्रोत आहे मत्स्यशेती. पाण्याचा सुनियोजित साठा करून त्यात मत्स्यशेती केल्यास अन्न उत्पादनात भर पडेल.
मासे उत्पादनात वाढ करणे दोन पद्धतींनी शक्य आहे. [१] मात्स्यिकी (फिशिंग) [२] मत्स्य संवर्धन (अ‍ॅक्वाकल्चर)
आपल्या देशाच्या तीन बाजूंस सागरी किनारा आहे. त्याची एकूण लांबी ८११३ किमी आहे. किनाऱ्यानजीकच कॉन्टिनेंटल शेल्फ आहे. परंतु यातून आपल्याला मिळणारे मासे उत्पादन फार कमी आहे. किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात मासेमारीला खूप वाव आहे. त्यामुळे जपान, तवान या देशांप्रमाणेच मत्स्य संवर्धन करणे आपल्यालाही शक्य होईल.
किनाऱ्यावरील मात्स्यिकी आणि मत्स्य संवर्धनाशिवाय निमखाऱ्या पाण्यातही मत्स्य/ कोळंबी शेती होते. सागरी किनाऱ्यावरील नऊ राज्यांत आणि सागरी द्वीपांत ही शेती फार प्रसिद्ध आहे. आपल्याकडे खाऱ्या पाण्याचे एकूण क्षेत्रफळ ३९ लाख हेक्टर आहे. त्यातून १४ लाख हेक्टर क्षेत्र कोळंबी आणि मत्स्य संवर्धनास योग्य आहे. परंतु यातील फक्त दीड लाख हेक्टर क्षेत्रातच सध्या निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती होते. वरील सर्व क्षेत्राचा निम्मा भाग जरी मत्स्यशेतीअंतर्गत आणला तरी आपले वार्षकि मत्स्य उत्पादन दुप्पट होऊ शकते.
आपल्याकडे सागरी आणि निमखाऱ्या क्षेत्राव्यतिरिक्त देशांतर्गत सरोवरे, पाटबंधारे, तळी, नद्या असे गोडय़ा पाण्याचे भरपूर क्षेत्र आहे. या क्षेत्रातून होणारे मत्स्य उत्पादन मात्र वर्षांला प्रति हेक्टर केवळ १५ ते १६  किलोग्रॅम आहे. रशियामध्ये हेच प्रमाण वर्षांला प्रति हेक्टर २०० किलोग्रॅम आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून तसेच जास्तीत जास्त पाण्याचे स्रोत मत्स्यशेतीखाली आणल्यास हे उत्पादन

जे देखे रवी..  – कुत्रे आणि फेरीवाले
टिळक रुग्णालयात कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला मुलींमुळे. एक दिवस ‘सर, सर’ असे म्हणत आल्या आणि म्हणाल्या, ‘‘आमच्या लेडीज रूममध्ये हे कुत्रे फिरतात आणि आमच्या डब्याकडे बघत बसतात. किळस वाटते.’’ मी सुरक्षा रक्षकांच्या मुख्याला विचारले तर म्हणाला, ‘‘माणसे सांभाळता येत नाहीत, कुत्र्यांच्या कुठे पाठी लागणार.’’ मग साखळ्या आणल्या, एका कर्मचाऱ्याला चार पैसे देऊन साखळीने कुत्रे पकडू लागलो आणि ते एका झाडाला बांधून ठेवू लागलो.
मग प्राणीमित्रांच्या संस्थेला फोन केला ते म्हणाले, ‘‘छोटीशी श्वान घरे बांधून घ्या.’’ मग लाकडाची छान घरे केली. त्या पिंजऱ्यात ते एवढे भुंकू लागले की लोक जमले. मग त्यांना सोडावे लागले. मग एक म्हणाला, ‘‘मी या कुत्र्यांना अशा ठिकाणी सोडतो की, ते परत येणार नाहीत. इतके मांस तिकडे पडले आहे.’’ मी म्हणालो, ‘‘पण परत यांना गोळा कोण करणार?’’ तेव्हा त्याने एक माणूस आणला. हा माणूस थोडासा वेडसर होता. त्याने कुत्र्यासारखे आवाज काढायला सुरुवात केली आणि अक्षरश: लगेच दहा कुत्री गोळा झाली. मग त्या सगळ्यांना वांद्रय़ाच्या खाटिकखान्याजवळ सोडण्याचे काम केले.
थोडे दिवस गेले, मग कुत्रे परत दिसू लागले. मी ते परत पकडू लागलो तेव्हा मुलींचे प्रतिनिधी मंडळ परत माझ्याकडे आले. ‘‘सर, सर या दोघी कुत्र्या आहेत यांना लेडीज रूममध्ये पिल्ले झाली आहेत तेव्हा तुमची मोहीम थांबवा.’’ मी म्हटले तेही योग्यच. रुग्णालयाबाहेरच्या फेरीवाल्यांची कथा तशीच गलिच्छ खाणे तिथे मिळे. मी अधिष्ठात्यांना म्हटले, ‘‘ लोक तिथे खातात, आजारी पडतात आणि इथे येतात.’’ ते म्हणाले, ‘‘मी फुटपाथचा डीन नाही’’ आणि विनोदाने म्हणाले, ‘‘आजारी पाडणारे आणि आजार बरे करणारे असे दोन विभाग जगात असतात.’’ मी नगरपालिकेत तक्रारींचा मारा सुरू केला. त्यांच्या गाडय़ा यायच्या आत हे फेरीवाले पळून जात असत.
मग कळले अतिक्रमणाच्या गाडय़ांचे चालक फेरीवाल्यांना मोबाइलचे फोन करीत. यांच्या बंदोबस्तासाठी एका निवृत्त पोलिसाची खासगी सुरक्षा नेमली. तो मला म्हणाला, ‘‘मी करतो, पण महानगरपालिका विभाग आणि पोलीस या दोघांची व्यवस्था करावी लागेल; परंतु पैसे रोकडे लागतील.’’ मी म्हणालो, ‘‘रोकड मी कसे देणार.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘दोन काल्पनिक कर्मचारी नोकरीवर ठेवा त्यांचा पगार बेअरर चेकने काढा आणि मला द्या.’’ आणि त्याने मला टाळी देण्यासाठी हात उचलला, माझ्याकडे बघून मग खाली केला. मी ही गोष्ट एका फार मोठय़ा अधिकाऱ्याला सांगितली. ते म्हणाले, ‘‘मला माहीत नाही, असे काहीतरी सांगा.’’
मी म्हटले, ‘‘तुम्ही सर्वज्ञ आहात, मी काय सांगणार?’’
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस –  उदानवायू विकार (भाग २) आत्मिक बलक्षय
‘शरीराने दणकट, बळकट, दणदणादण अशी प्रकृती असणारी पण अभ्यास वा आपल्या दैनंदिन कामात कसलाच इंट्रेस्ट न घेणारे’ बालबच्चे वा तरुण मंडळी घेऊन पालक नित्य येत असतात. ही बालबच्चे वा तरुण मंडळी आपला नेहमीच अभ्यास वा घरची कामे सोडून अन्य कामात लक्ष घेत असतात का? का पूर्णपणे उदासीन, नैराश्याने ग्रासलेली, चिंतामग्न, एकलकोंडी आहेत याचा शोध घ्यावा लागतो.  शरीरात उदानवायूचे योगदान दोन प्रकारचे आहे. आत्मिक व शारीरिक. अशा रुग्णांकडे शारीरिक बलाची कमतरता नसते. कमतरता असते ‘प्रेरणा मिळण्याची’! यालाच काहीजण औदासिन्य, नैराश्य, घाबरटपणा, ढ बुद्धी अशा विविध प्रकारे संबोधत असतात. तथाकथित ढ, बुद्धू, आळशी, मंदबुद्धी, कशातच इंटरेस्ट न घेणाऱ्या बालक-बालिका, तरुण मुले-मुली, यंग ब्रिगेडला कोणते काम जमते, कोणते जमत नाही याचा मागोवा निवांतपणे पालकांनी, वैद्यकीय चिकित्सकांनी घ्यायला लागतो. घरच्या कामचा कंटाळा, बाहेर खेळण्या-बागडण्यात खूप इंटरेस्ट असे आहे का; गणिताची, इंग्रजी, संस्कृतची नावड आहे का? नुसते बसून, खाऊन पिऊन राहण्यामध्ये रस आहे का? असे वेगवेगळे प्रश्न विचारून माहिती घेतली तर मार्ग शोधता येतो.
माझेकडे गेल्या तीस-पस्तीस वर्षांत किमान सात-आठ तरुण मुले, ज्यांच्या पालकांनी त्यांना ‘write of’ केले गेले आहे, अशी आणली गेली. चेहरेपट्टी, हसणे, बोलणे यांचा मागोवा घेत; त्यांना कदापि कमी न लेखता; त्यांच्या जोगते ‘एकावेळी एकच मोजके काम’ देण्याचा यशस्वी प्रयोग मी केला. पालकांनी ‘टाकाऊ’ म्हणून सोडून दिलेली मुले बऱ्यापैकी पगार मिळवत आहेत. ज्या पालकांना अशा आपल्या बालबच्चांचे नस्य, अभ्यंग, पादपूरण करता येते ते करायला सांगून पंचगव्यघृत, ब्राह्मीवटी, सारस्वतारिष्ट, अणुतेलनस्य असे उपाय ३ महिन्यांकरिता सांगतो. काळ्या मनुका, गाईचे दूध, सायंकाळी लवकर, कमी जेवण, जोडीला दीर्घश्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्कार असे उपाय सुचवितो. आत्मबल निश्चयाने येते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – ६ सप्टेंबर
१७९० > थोर मराठी कवी- चरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांचा जन्म. ‘भक्तविजय’, ‘संतविजय’ आणि ‘संतलीलामृत’ हे ओवीबद्ध चरित्रग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांच्या लिखाणाचा भर मात्र संत तुकारामांच्या शिकवणीपासून अगदी निराळा होता.. शनिमहात्म्यासह ‘माघमहात्म्य’, ‘एकादशीमहात्म्य’, ‘कथासारामृत’, ‘तुलसीमहात्म्य’,  ‘वैशाखवृत्त’ अशा अनेक मराठी पोथ्या महिपतीबुवा ताहराबादकरांनी लिहिल्या!
१८७७ > ‘सत्यप्रकाश’ या मराठीतील पहिल्या बेने इस्रायली धर्म-समाज विषयक मासिकाची सुरुवात. रेऊबेने व अब्राहम कोर्लेकर हे त्याचे संपादक होते.
१९४९ > मराठीतील बेने इस्रायली नाटककार आणि ‘आलम आरा’ या पहिल्या भारतीय बोलपटाचे कथाकार जोसेफ दाविद पेणकर यांचे निधन. ‘मक्काबी वीरांचे शौर्य’, ‘राजपुत्र अबुसालेम’, ‘एस्तर
राणी’, ‘सत्त्वशील आबिगाएल’, ‘रशियातील यहुदी कन्या’, ‘रोमन राजा टेटस’ अशी नाटके लिहून त्यांनी बेने इस्रायली धर्मकथांचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. ‘दाविदाख्यान’ आणि ‘महाराणी एस्तरचे बुद्धिचातुर्य’ आदी मराठी कीर्तनांच्या पद्यावली त्यांनी रचल्या होत्या.
– संजय वझरेकर