सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात पारंपरिक भारतीय पिकांबरोबरच शेतकरी इतर काही नावीन्यपूर्ण पिकांची लागवड करू शकतात. यांमध्ये पंचतारांकित भाज्यांचा विचार केला जाऊ शकतो.
परकीय देशात मुख्यत्वेकरून युरोप खंडात व पूर्वेकडील देशात या भाज्यांचा वापर जेवणात केला जातो. बदलत्या जीवनशैलीनुसार हल्ली जेवणात पास्ता, पिझ्झा इ. पदार्थाचाही समावेश केला जात असल्याचे दिसते. या पदार्थामध्ये मुख्यत्वे वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचा व जेवणानंतर दिल्या जाणाऱ्या फळांचा समावेश हा पंचतारांकित भाज्या व फळे म्हणून केला जातो.
उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामुळे आता शेतकरी अशा अधिक उत्पन्न देणाऱ्या व निर्यातमूल्य असलेल्या या भाज्यांची लागवड करू शकतो. मुख्यत्वे पॉलीहाऊस अथवा ग्रीनहाऊस शेडनेट वा मातीविरहित शेती (हायड्रोपॉनिक्स), भिंतीच्या आधाराने केलेली लागवड, स्पेस फार्मिंग, व्हर्टनिल व्हाल्व याद्वारेही लागवड केली जाऊ शकते.
कोबीसारखा असणारा आइसबर्ग, पॅकचाव, काकडीसारखी असणारी झुकिनी, फुलकोबीसारखी दिसणारी हिरवी ब्रोकोली, लालसर जांभळ्या रंगाचा पानकोबी, आकाराने छोटे असणारे चेरी टोमॅटो, छोटे बेबीकॉर्न यांचा समावेश या भाज्यांमध्ये होतो. यातील काही भाज्या कच्च्या कोशिंबिरीच्या रूपात, तर काही वाफवून वापरल्या जातात. ड्रॅगन फ्रुट, मोठी लाल द्राक्षे यांचीही लागवड शेतकरी करू शकतात.
याचबरोबर या पदार्थात वापरल्या जाणाऱ्या पार्सली, रोझमेरी, मिंट अशा काही मसाल्यांचीही लागवड करता येते. अशी निर्यातक्षम उत्पादने आपण जर आपल्याच देशात उत्पन्न केली, तर आपण काही प्रमाणात परकीय उत्पन्न वाचवू शकतो. पणन व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही सहकारी संस्था अथवा काही शेतकरीच हा माल निर्यात करतात. आपल्या देशात उपलब्ध असणारे पंचतारांकित हॉटेल, साखळी उत्पादक संस्था, अन्नपूर्णा, मॅक्डोनाल्ड, पिझ्झाहट, मोठे कॅटर्स इ. संभाव्य ग्राहकही आपण बांधून ठेवू शकतो.
अशा पंचतारांकित फळे व भाज्यांचे उत्पादन घेतल्यास काही शेतकऱ्यांना तरी नक्कीच फायदा होऊ शकतो
– स्मिता जाधव (ठाणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: माझ्या मुलांचे शिक्षण
गेल्या काही लेखांत मी ज्ञानेश्वरीवर लिहिण्याचा आव आणला. ज्ञानेश्वर काही वेळा भरगच्च लिहितात. ते म्हणतात, ‘मी उपमा श्लोकांची कोंदाकोंदी करून ग्रंथाचा झाडा घेईन.’ एरवी वेळोवेळी ते एवढा समास ठेवतात आणि त्यांचे शब्द एवढे विरक्त आणि अंतरावर असतात की नोंदी करणाऱ्याला जागाच जागा मिळते. त्यावर माझ्या विचाराचे झुडूप गेल्या चार-पाच-सहा लेखांत तगले. पण मी घरात अगदीच Secular (!?) वातावरण असूनही या ग्रंथापर्यंत पोहोचलो आणि त्याचे अर्थ काढू लागलो ह्य़ाचे कारण मी मराठीत शिकलो आणि अकरावीपर्यंत संस्कृतही होते. इंग्रजीत शिकलेल्या अलीकडच्या मुलांना हा प्रवास करण्याची ऊर्मी होणार कशी आणि झाली तरी त्याला मदत करणारी कोण माणसे भेटणार? कदाचित एखादा ह्य़ा विषयावर Research वगैरे करेल पण स्वभाविकपणे तो किंवा ती ज्ञानेश्वरीकडे वळेल असे दिसत नाही. माझी मुले हिने ऐकले नाही म्हणून Bombay Scottish शाळेत शिकली. मी पडते घेतले. हुषार निघाली पण ते काही इंग्रजी माध्यमामुळे घडले नाही. ह्य़ा शाळांमधेही जातिभेद असतो. काही शाळा Convent म्हणून कणभर हिणवल्या जातील. Scottish सारख्या शाळांचे नाकाचे शेंडे हवेत असतात. हल्ली हिंदूंनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत ही तिसरी जात. पण त्याही वर नवश्रीमंतांसाठी लाख दोन लाख फी आणि अवांतर खर्च निराळा  अशाही शाळा आता अवतरल्या आहेत. आमच्याच सहनिवासातली एक व्याकूळ आई मला म्हणाली, आम्ही मुलाला असल्या शाळेत घातले. ह्याचा आपल्या संस्कृतीशी संबंध तुटला आहे. आठवडय़ात दोनदा तुमच्याकडे पाठवला तर चालेल का? तिची व्याकुळता मला कळली, कारण सत्यच सांगायचे झाले तर त्या शाळेमुळे माझी मुले एका अर्थाने मला पारखी झाली. विचार करायची भाषा वेगळी, लहानपणाची पुस्तके वेगळी, बहुभाषिक वर्गमित्र, त्यांच्या चालीरिती वेगळ्या, वाढदिवसाला मेणबत्त्या विझवणार, Valentine’s Day हा सण आणि गुरुपौर्णिमेच्या ऐवजी Teacher’s Day. दैवदुर्विलास असा की तो ही निवडला सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस. त्या दर्शनकाराने गुरू ह्या विषयावर काय लिहिले आहे हे कोणी बघितले असते तर गुरुपौर्णिमाच निवडली असती.
सर्वधर्मसमभावाचे व्यर्थ आणि व्यंगी नाटक आणि पाश्चिमात्यांचे नको त्या गोष्टीत अनुकरण यामुळे सगळा बाजच बिघडला आहे. म्हणूनच अलीकडच्या एका अतिलोकप्रिय सिनेमात विद्यार्थी त्यांच्या शिक्षकाच्या नावाच्या पाटीवर लघवी करतानाचे दृश्य येते. तेव्हा लोक खोखो हसतात आणि टाळ्या वाजवतात आणि त्या शिक्षकाचे नाव असते सहस्रबुद्धे.
 त्या चित्रपटाचा कर्ताधर्ता माझ्या मुलांच्या शाळेतला त्यांचा समकालीन. पण फार ताणत नाही.. उद्यापासून एक रहस्यकथा.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : मूतखडा : भाग ४ : उपचार
मूतखडा असल्यामुळे ज्या मरणप्राय असह्य कळा मारतात त्याकरिता ‘बॅरलगन’सारख्या वेदनाशामक गोळय़ा घेण्यापेक्षा टबबाथ किंवा अवगाह हा तातडीचा, खात्रीचा व दीर्घकालीन फायद्याचा उपाय होय. सर्वागाला कोणत्याही तेलाचे मसाज करावे. मोठय़ा पेटीमध्ये संपूर्ण शरीराला शेक मिळेल असा पेटिकास्वेद घेणे. त्या शेकाकरिता निर्गुडी, एरंड यांची पाने, काढय़ाची वाफ तयार करण्याकरिता वापरावी. परसाकडे साफ होत नसल्यास करंजेल तेलाची पिचकारी व काढय़ाचा बस्ती (एनिमा) घ्यावा.
पथ्यापथ्य- चहा, टोमॅटो, काजू, कोबी, बियांचे वांगे, काकडी, पालेभाज्या, दूध, डालडा, खूप तिखट, उष्ण, खूप थंड, गोड, मसालेदार पदार्थ वज्र्य करावेत. लघवी- परसाकडे अडथळा होईल असे वागणे, झोपणे, व्यायाम, श्रम नसावे, व्यसनापासून लांब राहावे. आहारामध्ये पोटात वायू धरेल असे पदार्थ नसावेत. ठरवून भरपूर पाणी प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी अंघोळीच्या अगोदर नियमाने बलदायी महानारायण तेलाने सर्वागाला मसाज करावा.
रानोमाळ उगवणारे सराटे किंवा गोखरू सर्वाच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या शीत पौष्टिक मधुर मूत्रल या गुणांमुळे किडनीच्या विकारावर विशेष उपयुक्त आहे. दाह, लघवी अडणे, मूतखडा, कंबरदुखी, वातविकार, हृद्रोग, रक्तदाब, रक्त पडणे, मधुमेह, प्रमेह, गर्भाशयाची सूज इ. विकारांत उपयुक्त आहे. लघवीचे प्रमाण वाढवून किडनीला जोम आणण्याचे कार्य गोखरू करते.
या विकाराची चांगल्यापैकी चिकित्सा शेकडो रुग्णांवर केली.  यात सतत प्रोत्साहन देणारा पाठीराखा गोक्षुरादिगुग्गुळ होय. आधुनिक वैद्यकशास्त्रात लाइफ सेव्हिंग ड्रगचा खूप बोलबाला आहे. आयुर्वेदात आरोग्यवर्धिनी व गोक्षुरादिगुग्गुळ ही दोन मोठी लाइफ सेव्हिंग्ज ड्रग्ज किंवा जीवनरक्षक औषधे आहेत असा आमचा अनुभवी विश्वास आहे. जयप्रकाश नारायण मुंबईत घोर किडनीविकाराने त्रस्त होते, त्या वेळेस त्यांना गोक्षुरादिगुग्गुळ व साळीच्या लाहय़ांचे पाणी असा उपाय मी सुचवला होता.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ५ जून
१८८१ > संगीतकार, थोर पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे यांचा जन्म. ‘माझा संगीत व्यासंग’ आणि ‘माझा जीवनविहार’ ही त्यांची आत्मपर पुस्तके, तसेच त्यांच्या स्फुट लेखांचे संग्रहदेखील प्रकाशित झाले होते.
१९१८ > कौटुंबिक कलहाची कहाणी सांगणारे ‘पटावरील प्यादे’ या सडेतोड आत्मकथनाच्या कर्त्यां यमुनाबाई विनायक खाडिलकर यांचा जन्म. ‘संध्याकाळ’ या सायंदैनिकाच्या त्या व्यवस्थापिका होत्या. नाटय़ाचार्य खाडिलकरांच्या जन्मशताब्दीस ‘वटवृक्षाच्या छायेत’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
१९८५ > इतिहाससंशोधक गणेश हरी खरे यांचे निधन. ‘श्रीविठ्ठल आणि पंढरपूर’, ‘मूर्तिविज्ञान’, ‘दक्षिणेच्या मध्ययुगीन (शके ५५२ ते १५२०) इतिहासाची साधने (३ खंड)’ , ‘इतिहासकर्ते मराठी’, ‘अशी आमुची वाई’ आदी ५०हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली वा संपादित केली.  
२००४ > मराठीतील आद्य ‘दिनविशेष’कार डॉ. प्रल्हाद नरहर जोशी यांचे निधन. ‘दिनविशेष’ हे पुस्तकही त्यांचे (१९५०). ते कादंबऱ्या, संतसाहित्याचे संपादन, मराठी साहित्य व व्याकरण अशी २५०पेक्षा जास्त पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
– संजय वझरेकर