फ्लोरेन्स, इटालियन भाषेतले फिरेन्झ किंवा लॅटिनमधील फ्लोरेन्शिया हे शहर मध्य इटालीतील तोस्काना प्रांताच्या फिरेन्स परगाण्याचे प्रमुख शहर होय. इ.स.पूर्व पहिल्या शतकात स्थापन झालेल्या फ्लोरेन्सच्या दोन हजार वर्षांच्या राजकीय इतिहासात प्रजासत्ताक राज्य, टस्कनी सरदाराचे मुख्यालय, १८६५ ते ७० या काळात इटालीची राजधानी आणि पुढे इटालीतील एक प्रमुख शहर असे टप्पे झाले. चौदावे ते सोळावे शतक या कालखंडात फ्लोरेन्सने व्यापार, अर्थकारण, शिक्षण आणि विशेषत: कला क्षेत्रात आपला भरघोस विकास केला. सध्या फ्लोरेन्स शहरातील भव्य इमारती, भव्य चच्रेस, म्युझियम्स वगरे वैभवाच्या खाणाखुणा दिसतात. त्या सर्व गतकाळाचेच वैभव आणि संपन्नता यांचे दर्शक आहेत. या शहराचा ऐतिहासिक भाग युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून नोंदवला आहे. फ्लोरेन्समधील स्थापत्यवैभव आणि कलावैभवाच्या जडणघडणीत जसा तिथल्या वास्तुविशारद, कलाकारांचा महत्त्वाचा सहभाग आहे तेवढाच किंबहुना त्यांच्याहून अधिक सहभाग या कलाकारांना प्रेरणा आणि अर्थसाहाय्य पुरवणारे फ्लोरेन्सच्या धनिक आणि सरदारांचा आहे. अर्थातच फ्लोरेन्सचे राज्यकत्रे आणि तिथले अमिर उमराव यांची कला सांस्कृतिक उच्च अभिरुची हे या संस्कृतिवैभवाचे मूलभूत कारण आहेच! फ्लोरेन्सचे संस्कृतिवैभव उभे करणारे दिग्गज कलाकार लिओनार्दो दा व्हिन्सी, मायकेल अ‍ॅन्जेलो, डान्टे मॅशीवेली, गॅलिलिओ हे सर्व फ्लोरेन्सचेच आणि त्यांना प्रोत्साहन आणि अर्थपुरवठा करणारे राज्यकत्रेही फ्लोरेन्सच्या मेडीसी या राजघराण्याचेच. लहानसे फ्लोरेन्स गाव, केवळ सावकार आणि विणकरांचे गाव, मोठे लष्करी आणि राजकीय पाठबळ नसूनही इटालीत, युरोपात आणि त्याच्या पलीकडे अध्र्याअधिक जगात आपला एवढा प्रभाव पाडू शकते हे चकित करणारे नक्कीच आहे! फ्लोरेन्सची ग्रामीण भाषा ही पुढे इटालियन भाषा बनली, ‘फ्लोरिन’ हे फ्लोरेन्सचे चलनी नाणे सर्व युरोपात प्रमााणित झाले. फ्लोरेन्सची चित्रकारिता, वास्तुस्थापत्य हा एक जागतिक मानदंड बनला! फ्लोरेन्सचाच खलाशी अमेरिगो व्हेस्पुसी याचे नाव अमेरिका खंडाला देण्यात आले हे सर्व अद्भुत आहे!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

ताडगोळा
उन्हाळ्यात किलगड, टरबूज, लिंबू, संत्र, शहाळे आणि अनेक रसाळ फळे आपली तहान भागवतात. नारळाच्या जातीतील ‘ड्रप’ प्रकारातील ताडगोळा हे असेच एक फळ. पण आपण ताडगोळा म्हणून जे खातो ते फळ नसून बियांमधला रसाळ गर आहे. ताडगोळ्याच्या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘बोरॅसस प्लेबेलीफर’ असे आहे. ताड कुलातील ही एक उंच वाढणारी अशाखीय वनस्पती आहे. या वृक्षाची पंखासारखी पाने सर्वात उंच टोकावर वाढतात.
ताडगोळ्याच्या नर आणि मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात. सहजी वाकणाऱ्या दांडोऱ्यावर १ सें.मी. लांबीची नर फुले अर्धगोलाकार पद्धतीने गुच्छात येतात. ती बारीक अरुंद आच्छादनाच्या मागे लपलेली असतात. मादी फुले एकेकटी आणि दांडोऱ्याच्या पृष्ठभागावर असतात. त्यांचा आकार गोल्फच्या चेंडूएवढा असतो. परागीभवनानंतर मादी फुलातल्या बिजांडकोशाचे रूपांतर फळात होते. ह्य़ा फळावर देठाच्या बाजूला तीन हिरवी आच्छादने दिसतात, ती फुलातली कडक संदले असतात. फळ १५ ते २० से.मी. व्यासाचे असते आणि आत १ ते ३ बिया असतात. फळाचे आवरण आधी तपकिरी रंगाचे असते. नंतर जांभळट काळे आणि कडक पण पातळ होते. मधले आवरण अतिशय तंतुमय असते. त्यात तीन खळगे असतात. या खळग्यात बिया असतात. प्रत्येक बीभोवती वेगळे आवरण असते. बी तपकिरी भगव्या रंगाच्या पातळ आवरणाखाली झाकलेली असते. बीच्या आत पांढरा, अर्धपारदर्शक बर्फाच्या तुकडय़ासारखा चकाकणारा मऊ जेलीसारखा लिबलिबीत गर असतो. हा गर प्रथम पाण्यासारखा पातळ असतो. फळ जसे वाढत जाते तसतसे पाण्याचे रूपांतर गरात होते. हा गर म्हणजे आपण खातो तो ताडगोळा. कधी कधी ताडगोळा खाताना त्यातून पाणी येते. कारण फळ पूर्ण पिकलेले नसते, त्यामुळे फळातील गर पातळच राहिलेला असतो. मऊ, पातळ अशा या गरात ८८% पाणी असते. व्हिटॅमीन बी, सी. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ही खनिजे आणि प्रथिनेही असतात. या गरापासून गूळ तयार करतात. हा गूळ शरीराला ऊर्जा देतो तसेच हा गूळ एक प्रकारचे टॉनिकही आहे. ताडगोळ्याचे पाणी पाचक म्हणूनही वापरले जाते.
– डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org