15 December 2018

News Flash

कुतूहल : फ्लोरीन-निर्मिती : जीवघेणे आव्हान

फ्लोरीन हॅलोजेन कुटुंबातील पहिल्या क्रमांकाचा सदस्य आहे.

फ्लोरीन हॅलोजेन कुटुंबातील पहिल्या क्रमांकाचा सदस्य आहे. सतराव्या गणातील या मूलद्रव्याचा अणुक्रमांक आठ आहे. सामान्य तापमानालावायू स्वरुपातील फिकट पिवळ्या रंगाचे हे मूलद्रव्य स्फोटक, ज्वालाग्रही व विषारी आहे. निसर्गात फ्लोरीन संयुग स्वरुपात आढळतो. मुख्यत: कॅल्शियम आणि अ‍ॅल्युमिनिअम बरोबर हे मूलद्रव्य आढळते. सोळाव्या शतकात जर्मन खानिजतज्ज्ञ ‘जीओरिजीअस अगीकोला’ याने फ्लोरीनच्या खनिजाचे पहिले निरीक्षण नोंदविले. खनिजांचा वितळण िबदू कमी करणारा प्रवाही घटक अशी नोंद त्याने केली. या खनिजाची  फ्लोर्सपार आणि नंतर फ्लोराइट अशी नावे प्रचलित होती.

१६७० मध्ये काचकाम करणाऱ्या एका कामगाराला असे लक्षात आले कीकाचेवरच्या नक्षीकामासाठी फ्लोरीनच्या खनिजाचा उपयोग करता येतो. १८१२ मध्ये अ‍ॅंड्री मेरी अ‍ॅंपिअरने दाखवून दिले किफ्लोर्सपार आम्लातील हायड्रोजन आणि अज्ञात घटकाच्या संयुगामुळे ही  क्रिया घडून येते. अ‍ॅंपिअरने लॅटिन शब्द फ्लुरे (प्रवाही) यावरून क्लोरीनशी साम्य दाखवणारा घटक म्हणून त्याचे नामकरण फ्लोरीन केले. अशाप्रकारे फ्लोरीनच्या नावाची उत्पत्ती फ्लोर्सपार या खनिजावरून झाली.

हायड्रोफ्लोरीक आम्लातील फ्लोरीन मूलद्रव्य वेगळे करणे अत्यंत अवघड व जीवावर बेतणारे होते. हंफ्री डेव्हीनी केलेल्या प्रयत्नात त्याच्या डोळ्यांना इजा झाली. ‘थॉमस आणि जॉर्ज नॉक्स’ या द्वयीला फ्लोरीन वेगळं करण्याच्या प्रयोगामुळे अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले. एकाचा मृत्यू  झाला तर दुसऱ्याला कित्येक वर्षे अंथरुणाला खिळून राहावे लागले. हे परिणाम माहित असूनदेखिल बेल्जिअन रसायनशास्त्रज्ञ ‘पॉनिन लॉयेट’ आणि फ्रेंच शास्त्रज्ञ ‘जेरोम निकेलस’यांनी फ्लोरीन वेगळा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनासुद्धा मृत्युने गाठले. १८६० मध्ये जॉर्ज गोअरना फ्लोरीन वेगळा करण्यात यश आले पण प्रयोगाची परिणीती स्फोटात झाली.

१८६६ मध्ये हेन्रीमोइझनने फ्लोरीन वेगळा करण्यासाठी अतिशय कमी तापमानाला पोटॅशियम बायफ्लोराईड आणि हायड्रोजन फ्लोराइडच्या द्रावणाचे विद्युत अपघटन केले. दरम्यान आजारपण व इजा यांची मालिका त्यांच्या मागे लागली व चार वेळा फ्लोरीन बाधेमुळे प्रयोग थांबवावे लागले. स्वास्थ्य पूर्वपदावर येताच त्यांनी काम सुरू करून फ्लोरीन द्रावणाच्या स्वरूपात वेगळा करण्यात यश मिळवले. १९०६चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन ‘हेन्रीमोइझन’ यांचा गौरव करण्यात आला.

मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on February 27, 2018 2:10 am

Web Title: fluorine creation