‘ज्या माणसाला भरपूर अनुभव आहेत, त्या माणसाचा मेंदू म्हणजे जणू काही डेन्ड्राइट्सचं जंगलच,’ असं मत शिकागो मेडिकल स्कूलचे डॉ. लिसे इलियट यांनी मांडलं आहे. न्यूरॉन्सबद्दल आपल्याला माहीत आहेच. या न्यूरॉन पेशीच नव्या अनुभवांचं उत्साहाने स्वागत करण्याचं काम करत असतात. या प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक असतं. त्याच्या बाजूने अनेक शाखा फुटलेल्या असतात, या शाखांना डेन्ड्राइट्स (Dendrites) म्हणतात. प्रत्येक न्यूरॉनला एक लांब धागा असतो, त्याला अ‍ॅक्झॉन (axon) म्हणतात.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक माणसं ही स्वत:साठीच जगत असतात, पण तरीही ते स्वत:साठी जगणं नसतंच. स्वत:चं आरोग्य, स्वत:चा सन्मान, स्वत:साठी बौद्धिक खुराक, स्वत:साठी कलेचा आस्वाद – अशा गोष्टींमुळे मनाला निश्चितपणे नवी उमेद मिळते. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन ताजा होतो. नवी, आधिक अवघड, अधिक आव्हानात्मक कामं करण्याकडे कल वाढतो. स्वत:वरचा विश्वास वाढीला लागतो. थोडक्यात काय, तर आपण ‘सुधारतो’!

यासाठी चार गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी, माझं घर, माझं शिक्षण / नोकरी / व्यवसाय आणि माझा परिसर.

मी- रोज रात्री झोपताना स्वत:शी बोलायला हवं. आज विशेष चांगलं काय चांगलं झालं, काय चुकलं, याचा हिशेब रोज ठेवायचा. त्याचवेळेस उद्या कोणत्या चुका टाळायला हव्यात. उद्याच्या दिवसातली महत्त्वाची कामं कोणत्या प्रकारे पार पाडायला हवीत, याचं व्हिज्युअलायझेशन रोजच्या रोज व्हायला हवं.

माझी माणसं- माणूस हा समाजशील प्राणी आहे. घरातल्या आणि अन्य सर्व व्यक्तींशी सुसंवाद म्हणजे स्वत:शी सुसंवाद साधल्यासारखंच आहे.

माझं शिक्षण / नोकरी / व्यवसाय- शिक्षण आणि काम यांवर लक्ष केंद्रित करणं, हे मेंदू सुस्थितीत ठेवण्याचं लक्षण आहे.

माझा परिसर- अशी एखादी गोष्ट ज्यामुळे आपल्या परिसराला, तिथल्या लोकांना, निसर्ग – पर्यावरणाला उपयोग होईल. आपला संकल्प एकटय़ानेच पूर्ण करायला हवा असं नाही.  एखादं काम एकत्र, सगळ्यांनी मिळून करण्यात एक वेगळीच मजा असते. त्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटत राहतो. संपर्क वाढतो. या सर्वातून दुसऱ्या कोणाला तरी मदत होते तशी आपल्यालाही मदत होणार असते.

डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com