News Flash

उष्णतेचे स्वरूप

ग्रीक पुराणात प्रोमेथिअसची कथा आहे.

अग्नीच्या- म्हणजेच उष्णतेच्या अनुभवाने जंगलात वावरणारा तो पुरातन आदिमानव जितका स्तिमित झाला असेल तेवढा अन्य कशानेही झाला नसेल. अग्नीचा वापर करण्याची आणि त्याला ताब्यात ठेवण्याची शक्ती मानवाला जेव्हा साध्य झाली, तेव्हापासूनच तो इतर प्राण्यांपेक्षा वरचढ ठरू लागला. म्हणूनच तर सर्व पुरातन संस्कृतींमध्ये आणि धर्मामध्ये उष्णतेला- म्हणजेच अग्नीला- अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

ग्रीक पुराणात प्रोमेथिअसची कथा आहे. त्याने स्वर्गातून अग्नी पळवून आणला आणि मानवाला दिला. त्याला ‘मानवाचा कायमचा उद्धारकर्ता’ असे म्हटले जाते. आपल्याकडे ‘यज्ञ’ या संकल्पनेचा उदय आणि विकास झाला, त्यामागेदेखील ही अग्नीबद्दलची-उष्णतेबद्दलची- भीतीयुक्त आदराची भावनाच होती, यात शंका नाही. पारशी लोकांमध्ये तर अग्निकुंडाचीच उपासना करतात.

आधुनिक विज्ञानाच्या पद्धतींचा उदय झाला, विकास होऊ लागला, आणि उष्णतेच्या स्वरूपाचा शास्त्रज्ञ शोध घेऊ लागले. मात्र उष्णतेच्या स्वरूपाबद्दल शास्त्रज्ञांना बराच काळ नेमकी कल्पना येत नव्हती. सुरुवातीला असे मानले जात असे की, उष्णता हा एक द्रव पदार्थ आहे. त्याला ‘कॅलरीक द्रव’ असे नाव देण्यात आले होते. या द्रवाची उच्चपातळी म्हणजे उच्च तापमान, आणि खालची पातळी म्हणजे कमी तापमान. पाणी जसे वरून खाली वाहाते, तसाच हा पदार्थदेखील वाहतो. म्हणून उष्णता नेहमी गरम पदार्थाकडून थंड पदार्थाकडे वाहाते, अशी ही कल्पना होती.

पण यातील विसंगती दाखवणारी काही निरीक्षणेही समोर येत होती. त्यातला सर्वात महत्त्वाचा होता तो रूमफोर्ड या अभियंत्याने केलेला एक प्रयोग. लंडनच्या रॉयल सोसायटीच्या संशोधन पत्रिकेमध्ये १७९८ मध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. रूमफोर्डने धातूचा एक गोळा (तोफ-गोळा) एका धातूच्या भांडय़ात यंत्राच्या साहाय्याने सतत फिरता ठेवला. धातूचे भांडे पाण्यात बुडलेले होते. पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागले. अखेरीस अडीच तासानंतर पाणी चक्क उकळू लागले. रूमफोर्डने विचारले की, ‘यासाठी लागणारे एवढे कॅलरीक द्रव आले कुठून? घर्षणाची क्रिया जणू अक्षय कॅलरीक द्रव पुरवत होती. हे कसे शक्य आहे?’

१७९८ मध्ये रूमफोर्डने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर पुढे १८४०च्या सुमारास ज्युलने शोधून काढले. नेमके प्रयोग करून व काटेकोर मोजमापे घेऊन. त्यासंबंधी पुढच्या लेखात.

– डॉ. सुधीर पानसे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. केदारनाथ सिंह- साहित्य सन्मान

केदारनाथ सिंह यांच्या कवितेची मुळे ही गावात रुजलेली आहेत. त्यामुळे गावच्या मातीतील असंख्य प्रतीके, प्रतिमांच्या रूपाने व्यक्त होताना दिसतात. अनेक लोककथा, लोकपरंपरा, श्रद्धा, लोकसमजुती या साऱ्यांशी त्यांच्या कवितेचे अतूट असे नाते आहे.

‘कुछ सूत्र जो किसान बापने बेटे को दिए’ या कवितेत अनेक लोकधारणा सूक्ष्म रूपात प्रगटताना दिसतात. या कवितेतील शेतकरी आपल्या मुलाला काही गोष्टी सांगतो. ती सूत्रे अशी-

‘माझ्या पोरा,

विहिरीत कधी वाकून बघू नकोस..

लाल मुंग्या कधी दिसल्या तर समज,

वादळ येणार आहे.

माझ्या पोरा,

विजेसारखा कधीच कोसळू नकोस

आणि कधी कोसळलाच

तर गवताच्या पात्यासारखा उगवून यायला

कायम तयार रहा..’

या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद बळवंत जेऊरकर यांनी केला आहे.

एकवीस भाग असलेली त्यांची दीर्घ कविता आहे ‘बाघ’. बैल, वाघ, सारस पक्षी अशा पक्षी, प्राण्यांबद्दलही ते आपल्या कवितांतून लिहितात ‘बाघ’ या कवितेत वाघाची निरनिराळी रूपे पेश करीत, या निमित्ताने कवीचे चिंतन, आयुष्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन या कवितेत व्यक्त झाला आहे.

गाव आणि महानगर यातील ताण त्यांच्या कवितेला एक नवी ऊर्जा देतो. पण शहरातून गावाकडे आल्यावरही एक प्रकारची तुटलेपणाची भावना व्यक्त करताना ते लिहितात-

‘क्या करू मै? क्या करूँ, क्या करूँ कि लगे

मै इन्हीमें से हूँ..’

ज्या अज्ञेय यांनी संपादित केलेल्या ‘तिसरा सप्तक’च्या माध्यमातून केदारनाथ सिंह यांची कविता पुढे आली. ‘मी लोकांच्या जिभेवील भाषा कवितेत ओतण्याचा प्रयत्न करतो’, असे सांगणाऱ्या या कवीचा गौरव ज्ञानपीठ पुरस्काराने होतो हा खरंतर त्यांच्या कवितेचाच गौरव आहे. सााहित्य अकादमी, मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, कुमारन आशान पुरस्कार, दिनकर पुरस्कार, जीवन भारती सन्मान, व्यास सन्मान असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 3:06 am

Web Title: formation of heat
Next Stories
1 डेसिबल
2 ध्वनीची उच्च-नीचता, लहान-मोठेपणा
3 कुतूहल : सूर तेचि छेडिता..
Just Now!
X