हेमंत लागवणकर

नैसर्गिकरीत्या झालेल्या प्रक्रियेतून शोधलं गेलेलं शेवटचं रासायनिक मूलद्रव्य म्हणजे ‘फ्रान्सिअम’. त्यानंतरची सगळी मूलद्रव्यं ही प्रयोगशाळेमध्ये काही तरी प्रक्रिया करून मिळवली तेव्हा मानवाला ज्ञात झाली.

फ्रान्सिअम मूलद्रव्याचा शोध मार्गारेट पेरी या महिला शास्त्रज्ञाने लावला. मेरी क्युरीला संशोधनासाठी आवश्यक असणारं किरणोत्सारी अ‍ॅक्टिनिअम युरेनिअमच्या खनिजापासून मिळवून देण्याचं काम मार्गारेट करत असे. जवळपास एक दशकभर मार्गारेटने मेरी क्युरीच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. मेरी क्युरीच्या मृत्यूनंतर तिची प्रयोगशाळा बंद पडली नाही; कारण मार्गारेटने याच प्रयोगशाळेत संशोधन कार्य सुरू ठेवलं.

सन १९३५ मध्ये मार्गारेटच्या वाचनात एक संशोधन निबंध आला. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी अ‍ॅक्टिनिअममधून अधिक प्रमाणात ऊर्जा असलेले बीटा कण उत्सर्जति होतात, असं त्या निबंधात मांडलं होतं. अनेक वर्ष अ‍ॅक्टिनिअमवर काम करत असल्याने मार्गारेटचं कुतूहल जागृत झालं आणि तिने या दृष्टीने संशोधन करायचं ठरवलं. त्यासाठी तिने अत्यंत शुद्ध स्वरूपात अ‍ॅक्टिनिअम मिळवून त्यावर प्रयोग करायला सुरुवात केली.

जवळपास चार वर्ष प्रयोग केल्यावर मार्गारेटला असं आढळलं की, अ‍ॅक्टिनिअमधून किरणोत्सर्गामुळे उत्सर्जति होणारे बीटा कण नसून अल्फा कण म्हणजेच हेलिअमचे केंद्रक आहेत. मार्गारेटने असंही दाखवून दिलं की, अ‍ॅक्टिनिअम-२२७ या समस्थानिकामधून अल्फा कण उत्सर्जति झाल्यावर किरणोत्सारी ऱ्हासामुळे एक नवीन मूलद्रव्य तयार होतं; असं मूलद्रव्य की जे तेव्हापर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. नव्याने तयार झालेल्या या मूलद्रव्याचं नामकरण मार्गारेटने आपल्या फ्रान्स देशाच्या नावावरून ‘फ्रान्सिअम’ असं केलं. मार्गारेट पेरीने जेव्हा या नवीन मूलद्रव्याचा शोध लावला तेव्हा तिचं वय होतं अवघं तीस वर्षांचं!

मार्गारेटने लावलेल्या या शोधामुळे तिला पुढील संशोधनासाठी अनुदान मिळालं. त्यामुळेच १९४६ साली ती पीएच.डी. ही पदवी मिळवू शकली.

मार्गारेटने आयुष्यभर फ्रान्सिअम या मूलद्रव्यावर संशोधन कार्य केलं. तिची अशी धारणा होती की, फ्रान्सिअमचा उपयोग कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्या दृष्टीने तिचे प्रयोग सुरू होते; पण तिला हे माहिती नव्हतं की, फ्रान्सिअम हे मूलद्रव्य ‘कार्सनिोजेनिक’ म्हणजे कर्करोगाला चालना देणारं आहे. या मूलद्रव्याच्या सतत सान्निध्यात राहिल्याने मार्गारेटला हाडांचा कर्करोग झाला आणि त्यामुळे तिला मृत्यू आला.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org