सुवर्णाचे मुबलक साठे असलेल्या, सध्या घाना या नावाने ओळखल्या जाणाऱ्यापश्चिम आफ्रिकेतल्या या प्रदेशात सोन्याच्या व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज, डच, ब्रिटिश वगैरे युरोपीयांचा प्रवेश झाला. पुढे सोन्याच्या व्यापारापेक्षा गुलामांचा व्यापार अधिक वाढला. पोर्तुगीजांनी या प्रदेशाचे नाव ‘गोल्ड कोस्ट’ ठेवले. १८ व्या, १९ व्या शतकात गोल्ड कोस्टच्या गुलाम व सोन्याच्या मोठ्या किफायतशीर व्यापारात अधिकाधिक हिस्सा मिळवून आपली वसाहत आणि राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आदींमध्ये चढाओढ सुरू होती. ब्रिटिश या चढाओढीत अधिक यशस्वी झाले.

गोल्ड कोस्टच्या बऱ्याच मोठ्या प्रदेशावर ब्रिटिशांनी १८७४ मध्ये ताबा मिळवून तिथे ‘ब्रिटिश गोल्ड कोस्ट’ ही ब्रिटिश साम्राज्याची वसाहत उभारली. पश्चिम आफ्रिकेतल्या अकान या जमातीची चार राज्ये १९ व्या शतकात इतर आफ्रिकी जमातींवर आपले वर्चस्व टिकवून होती. त्यापैकी अशेन्ती या प्रबळ आणि सोन्याच्या व्यापारावर संपन्न झालेल्या राज्याचे या युरोपीय व्यापारी देशांबरोबर अनेक वर्षे सतत संघर्ष होत असे. या राज्याने ब्रिटिश वसाहतींवर अनेक वेळा हल्ले केले. अनेकदा ब्रिटिश फौजेशी झालेल्या युद्धांमध्ये अशेन्तीच्या सैन्याची सरशी झाली. परंतु पुढे १९०० साली झालेल्या अँग्लो-अशेन्ती युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवून अशेन्तींची सत्ता उद्ध्वस्त केली.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांशिवाय बाकीच्या युरोपीय देशांनी गोल्ड कोस्टमधील आपला कारभार बंद केला होता. ब्रिटिशांनी त्यांच्या सत्ताकाळात गोल्ड कोस्टमधील गुलामांचा व्यापार कायद्याने बंद केला आणि इतर काही सुधारणा केल्या. साधारणत: दुसरे महायुद्ध संपता संपता जगभरातील युरोपीय साम्राज्यांच्या अनेक वसाहतींमध्ये राजकीय जागृती येऊन स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. गोल्ड कोस्टमधील सहा प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन १९४७ मध्ये ब्रिटिशांकडे स्वायत्ततेची आणि स्वत:चे सरकार स्थापण्याची मागणी करीत अहिंसक आंदोलन सुरू केले. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com