शीतीकरण (गोठविणे) ही घरगुती तसेच व्यापारी तत्त्वावर वापरली जाणारी एक अन्नसंरक्षण प्रक्रिया आहे.
घरोघरी रेफ्रिजरेटरमध्ये शिजवलेले अन्न किंवा भाज्या, फळे, दूध वगरे ३ ते ५ अंश सेल्सिअस तापमानात आपण टिकवून ठेवतो. तसेच फ्रीझर या भागाचा वापर, गोठलेल्या अवस्थेत पदार्थ -५ ते -१० अंश सेल्सिअस या तापमानाला जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी आपण करतो.
अठराव्या शतकात सर्वप्रथम क्लॅरेन्स बर्ड्सआय याने भाज्या व मांसजन्य पदार्थ गोठवून जास्त काळ टिकविता येतात, हे दाखवून दिले. त्याला त्याने क्विक फ्रीझ असे नाव दिले. नंतर त्याने धातूच्या पट्टय़ा कॅल्शियम क्लोराइड व ब्राइनच्या द्रावणात बुडवून थंड केल्या व अशा दोन पट्टय़ांमध्ये त्याने अन्न टिकविले. त्यानेच १९३० मध्ये पहिला रेफ्रिजरेटर मॅसेच्युसेट्समध्ये तयार केला. त्याला बर्डस्आय फ्रीझर असे नाव दिले गेले. त्यात पुढे पुष्कळ बदल होत होत रेफ्रिजरेटर, डीप फ्रीझर असे अनेक प्रकार शीतीकरणासाठी उपलब्ध झाले.
दुसरी पद्धत म्हणजे, अन्नातील पाण्याचा अंश कमी करून, वाळवून (व्यापारी तत्त्वावर असेल तर) भाज्या, फळे गोठवितात. यामुळे वस्तू ठेवायला जागा कमी व्यापली जाते व जीवाणूंची वाढ खुंटते.
शीतीकरण यशस्वी होण्यासाठी पॅकेजिंग हाही एक महत्त्वाचा घटक लक्षात ठेवायला हवा. प्लॅस्टिक डबा, ट्रे, बॉक्स हे जास्त करून यासाठी वापरले जातात.
शीतीकरणामुळे पदार्थाचा स्वाद व पोषणमूल्ये सर्वसाधारणपणे टिकतात. परंतु शीतीकरणामुळे जीवाणू संपूर्ण नष्ट होत नाहीत. जर तापमान वाढले तर त्यांची पुन्हा वाढ होऊ शकते व तो पदार्थ खराब होऊ शकतो.
गोठविलेले पदार्थ बाह्य वातावरणात काढल्यावर पुन्हा गोठवून खाणे अयोग्य व हानिकारक आहे. गोठविलेले पदार्थ गोठविलेल्या अवस्थेतच शिजविणे महत्त्वाचे आहे.  
गेल्या सात-आठ वर्षांत व्यापारी तत्त्वावर क्रायोजेनिक फ्रीझिंग ही एक पद्धत उपलब्ध झाली आहे. या प्रक्रियेत पदार्थ गोठविण्यासाठी -१५० अंश सेल्सिअस तापमान ठेवतात. दीर्घकाळ अन्न टिकविण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे.
डॉ. सुधा रावमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २० मार्च
१९११ > साहित्यिक आणि समीक्षक माधव मनोहर (मूळ आडनाव वैद्य) यांचा जन्म. नाटय़समीक्षक म्हणून त्यांनी मोठी कामगिरी केली, त्या निवडक लेखांचे ‘पंचम वेध’ हे पुस्तक कमलाकर नाडकर्णी यांनी संपादित केले. रूपांतरित एकांकिका व नाटके, तीन कादंबऱ्या हे त्यांचे अन्य साहित्य.
१९२२ > सामाजिक व ऐतिहासिक विषयांवरील ४०  नाटके लिहिणारे वसंत कानेटकर यांचा जन्म. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, जिथे गवताला भाले फुटतात तसेच लेकुरे उदंड झाली, अश्रूंची झाली फुले, गगनभेदी ही त्यांची नाटके. त्यांनी १० कादंबऱ्या, चार कथासंग्रह, ‘नाटक: एक चिंतन’ ही समीक्षा व ‘मी- माझ्याशी’ हे आत्मचरित्र हे त्यांचे कार्य!
१९५६ > मराठीत ललितसाहित्यात आधुनिक जाणिवा आणणारे युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांचे वयाची पन्नाशीही न गाठता निधन. ‘प्रेमाचे लव्हाळे’ ही युद्धोत्तर स्थितीची पहिली नवकविता त्यांची, तसेच ‘मग अर्थ काय बेंबीचा?’ हा नात्यांविषयीचा सवालही त्यांचा. कादंबऱ्या, संगीतिका आदी लेखन त्यांनी केले.  ‘कला आणि मानव’ व ‘सौंदर्य आणि साहित्य’ ही समीक्षासिद्धान्ताची पुस्तके लिहिली. त्यांच्या संज्ञाप्रवाही लेखनाचा प्रभाव आजही अमीट आहे.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : एच.आय.व्ही. एड्स : आयुर्वेदीय विचार : भाग- २
एच.आय.व्ही.- एड्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोगाचा इतिहास पाहता याचे पहिले रुग्ण १९८१ सालच्या सुरुवातीच्या काळात आढळले. लॉस अँजेलिस शहरातील हॉस्पिटलमध्ये न्यूमोनियाग्रस्त पाच रुग्णांमध्ये एक वेगळा जंतू मिळाला. त्याच काळात न्यूयॉर्कमधील हॉस्पिटलमध्ये ‘कॅपोसीचा सारकोमा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजाराची सव्वीस तरुणांत नोंद झाली. त्यांच्या हातावर कॅन्सरसारख्या गाठी होत्या. सामान्यत: असे व्याधी असणारे वृद्ध रुग्ण, प्रतिकारशक्ती कमी झालेले आफ्रिकेमध्ये आढळून येत असत. लवकरच असे हजारो तरुण, अमेरिकेत व युरोपमध्ये आढळून आले. रोगप्रतिकारशक्तीचा क्षय (कमतरता) व त्यामुळे एरवी निरुपद्रवी असणाऱ्या जंतूंनी संधी साधून केलेले यशस्वी आक्रमण असे या व्याधीचे स्वरूप होते. संधिसाधू जंतू निरनिराळय़ा प्रकारचे असल्यामुळे निरनिराळी इंद्रिये शिकार होत असत. त्याप्रमाणे रोगचिन्हे विविध प्रकारची होती. त्यामुळे या व्याधीला ‘अक्वायर्ड इम्युन डेफिसियन्सी सिंड्रोम’ अशी संज्ञा मिळाली. शास्त्रज्ञांनी १९८३ साली पॅरिसच्या पाश्चर इन्स्टिटय़ूटमध्ये एड्सग्रस्त रुग्णाच्या लिम्फोनोडच्या तपासणीत विषाणू शोधला. त्याला ‘लिम्फोअ‍ॅडेनोपॅथी असोसिएटेड व्हायरस’ असे नाव दिले. हा विषाणू एड्सचे कारण आहे असे जाहीर केले.
भारतात १९८७ मध्ये या रोगाचे मोठय़ा संख्येने रुग्ण आढळल्यामुळे वैद्यक जग हादरले. १ जून १९८८ या दिवशी पुणे येथे विविध वैद्यकातील चिकित्सकांची एक कार्यशाळा झाली; त्या कार्यशाळेनंतर डॉ. दिलीप वाणी, डॉ. जनार्दन वाटवे यांच्याशी चर्चा करून या व्याधीवर आयुर्वेदीय उपचार सापडतो का, याकरिता संशोधन करायचे मी ठरविले. वर्तमानपत्रात आवाहन करून अशा एड्सग्रस्त काहीसे रुग्णांच्या लक्षणांचा मागोवा घेतला. अशा रुग्णांच्या लक्षणानुरूप आयुर्वेदीय उपचार करायचे. त्याच वेळेस आयुर्वेदीय ओज या मूळ मुद्याला न सोडता ‘अनपायी सुरक्षित’ उपाय करायचे ठरविले.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : विंगेतून नाटक पाहणे..
१९६०च्या आधी नायर रुग्णालयात मराठी वातावरणाचा अभाव होता. जे मानद प्राध्यापक खासगी व्यवसाय सांभाळून इथे शिकवत असत, त्यात बोटावर मोजण्याइतकीच मराठी माणसे होती. केईएम या दुसऱ्या रुग्णालयात मात्र परिस्थिती निराळी होती. तिथे मराठीचा माहोल होता. हा माहोल नायरमध्ये आणण्यासाठी मराठी नाटक करायचे ठरले तेव्हा लोकांनी भुवया उंचावल्या. नाटक होते ‘स्वामिनी’ आणि दिग्दर्शन केले दिवंगत नटवर्य मामा पेंडसे यांनी. काय माणूस होता तो! त्यांच्या करडय़ा मुद्रेने मला भयभीत झाल्यासारखे झाले. एखाद्या पंतोजीने छडी मारीत शिकवावे तसे यांनी नाटक बसवून घेतले. एक चांगल्या दिसणाऱ्या मुलाला नायकाचे काम दिले होते आणि मी एक कणभर रोल करणार होतो, पण का कोणास ठाऊक या आमच्या हीरोने माघार घेतली आणि पात्रांची अदलाबदल होऊन मी हीरो झालो. नाटकात तीन मुली होत्या आणि हा हीरो वधूपरीक्षेत त्या तिघांची चाचपणी करतो आणि मग एक बालबोध पण करारी स्त्रीला पसंत करतो, असे काहीतरी हल्लीच्या मानाने अगदीच प्रतिगामी कथानक असल्याचे आठवते. नाटक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उतरले. प्राथमिक फेऱ्यांमध्ये भारतीय विधान भवनच्या मोठय़ा सभागृहात आमचे नाटक लोकांनी डोक्यावर घेतले. जबरदस्त टाळ्या पडल्या. माझ्याकडे कॉलेजमध्ये लोक निराळ्या तऱ्हेने बघू लागले, त्यात सर्व भाषिक होते. नाटक फायनलमध्ये पोहोचले तेव्हा तर उत्कंठा शिगेला पोहोचल्याचा भास मला होऊ लागला.  शेवटच्या फायनलच्या फेरीत मात्र आमचे नाटक अनाकलनीय कारणामुळे पडले किंबहुना लोकांना शेवटी शिट्टय़ा मारायला सुरुवात केली. ते का, कसे पडले हे कळायला मार्ग नाही.
दोन दिवस कधीच सारखे नसतातच, पण काही दिवस एकदमच भकास जातात, तसेच हेही. दोष माझाच असणार, कारण नाटक माझ्या पात्राभोवतीच लिहिलेले होते. नाटक पडल्यावर कॉलेजमध्ये काही उघड उघड हसले, काही गुपचूप हसले, काही मला टाळू लागले. काहींना काय घडले हे माहीतच नव्हते, काहींनी मनापासून पुढच्या वर्षी नक्की जिंकू या, असे उद्गार काढले. तेव्हा आपले आयुष्य हेही या नाटकासारखे खालीवर होत आले आहे, असा प्रकाश माझ्या डोक्यात पडल्याचे आठवते.
जेमतेम वीसही नसेन मी, पण वरखालीबद्दलचा तो प्रकाश पुढे आयुष्यभर पुरला. अर्थात त्यासाठी आधी नाटक करावे लागले. माझ्या छोटय़ाशा विश्वात पुढे आणखीही नाटके झाली, काही मीही केली, पण तेव्हापासून विंगेत उभे राहून स्वत:चे नाटक बघण्याची सवय लागली ती आजपर्यंत सोडलेली नाही. झोप उत्तम येण्यासाठी हा अक्सीर इलाज आहे.
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com