News Flash

नवदेशांचा उदयास्त : मादागास्करवर फ्रेंचांचा ताबा

१८८३ साली उत्तर भागात फ्रे ंचांचे इमेरिना फौजेशी युद्ध होऊन इमेरिना त्यात पराभूत झाले.

(संग्रहित छायाचित्र)

– सुनीत पोतनीस

मादागास्करच्या बहुतांश प्रदेशावर अंमल करणाऱ्या इमेरिनाच्या राजाने १८६९ साली प्रशासकीय आणि सामाजिक सुधारणांसाठी तसेच लष्करी आधुनिकीकरणासाठी ब्रिटिश सल्लागार नेमले. या काळात फ्रें चसुद्धा मादागास्करचा काही प्रदेश मिळविण्याच्या प्रयत्नात होते. परंतु इमेरिनाच्या राजाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. १८८३ साली उत्तर भागात फ्रे ंचांचे इमेरिना फौजेशी युद्ध होऊन इमेरिना त्यात पराभूत झाले. युद्धानंतर इमेरिनाने फ्रान्सला उत्तर मादागास्करचा मोठा प्रदेश आणि नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कम दिली. अशा प्रकारे फ्रेंच लोकांनी मादागास्करमध्ये प्रवेश मिळवला. साधारणत: या काळात, १८९० मध्ये ब्रिटिशांनी त्या प्रदेशाचे संरक्षक व पालक कारभारी म्हणून फ्रे ंचांना अधिकार दिले. मादागास्करमधील फ्रें चांचा वाढता हस्तक्षेप तेथील काही स्थानिक मालागासी राज्यांना मान्य नव्हता, परंतु त्यांच्यावर आक्रमण करून तो प्रदेश आणि इमेरिनाची राजवट उद्ध्वस्त करून फ्रेंचांनी संपूर्ण मादागास्कर बेटाचा ताबा मिळवला. १८९६ साली फ्रेंच साम्राज्याने मादागास्कर ही त्यांची नवी वसाहत असल्याची घोषणा केली. फ्रें च वसाहतीने मादागास्करचे प्रशासन हाती घेतल्यावर प्रजाहिताची कामे केली. त्यांनी गुलामांच्या खरेदी-विक्रीवर कायद्याने बंदी घालून पाच लाख गुलामांना मुक्त केले. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये भर घालून तेरा वर्षे वयापर्यंत मुलांना शाळेत जाणं सक्तीचं केलं, फ्रें च भाषा शाळांमध्ये शिकवण्याची व्यवस्था करून त्या भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. पुढे पहिल्या महायुद्धात मादागास्करच्या लष्करातल्या बारा तुकड्या फ्रेंचांच्या,अर्थात दोस्तराष्ट्रांच्या बाजूने लढल्या. १९३० मध्ये हिटलरने मादागास्कर बेट ताब्यात घेऊन युरोपातील सर्व ज्यू धर्मीयांना तिथे हाकलून द्यायचा डाव आखला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मादागास्कर ताब्यात घेण्यासाठीच्या लढाईत जर्मन आघाडीच्या फौजा पराभूत झाल्या. या काळात हिटलरच्या नाझी सरकारने फ्रान्सचा ताबा चार वर्षे जर्मनीकडे ठेवून त्यांच्या तोतया विची सरकारकडे प्रशासन दिले होते. त्यामुळे मादागास्करच्या जनतेत फ्रेंच शासनाची दुर्बलता जाणवू लागली आणि फ्रेंच शासकांकडून स्वातंत्र्य मिळविण्याची मागणी मूळ धरू लागली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 12:07 am

Web Title: french occupation of madagascar abn 97
Next Stories
1 कुतूहल : बहुआयामी गणिती लाप्लास
2 नवदेशांचा उदयास्त : मादागास्कर : राणीच्या कारभाराच्या स्मृती
3 कुतूहल – गणिताचे वर्गीकरण
Just Now!
X