ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजकीय कारकीर्दीत सर्व राज्यांमध्ये लाहोरच्या शीख साम्राज्याचे अधिपती रणजितसिंग यांचे लष्करी सामर्थ्य सर्वाधिक होते. महाराजांच्या फौज ए खासच्या सामर्थ्यांमुळे त्यांच्या हयातीत कंपनी सरकारसुद्धा त्यांना हात लावायला धजावले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या लष्करी सेवेत असलेल्या युरोपीय लोकांनी फौजेचे युरोपियन पद्धतीने केलेले आधुनिकीकरण हे होय.

नेपोलियनच्या वाटर्लूतील पराभवानंतर झालेल्या अस्तामुळे बेकार झालेल्या सैनिक, सैनिकी प्रशासकांपैकी अनेक जण रणजितसिंगांकडे नोकरीसाठी आले. त्यापैकी क्लाऊड कोर्ट या फ्रेंच सेनानीने महाराजांची सेना प्रगत करण्यास मोठा हातभार लावला. क्लाऊड ऑगस्ट कोर्ट याचा जन्म १७९३ मधला, मध्य फ्रान्समधील सेंट सेजायर सीन येथील. वडिलांची फ्रेंच शाही फौजेत नोकरी. पॅरिसच्या इकोल तंत्रविज्ञान संस्थेत शिक्षण झाल्यावर क्लाऊड १८१३ साली फ्रेंच लष्करात दाखल झाला. दोनच वर्षांनी, १८१५ मध्ये वाटर्लू येथे झालेल्या लढाईत फ्रेंचांचा पराभव होऊन इतर अनेक सहकाऱ्यांप्रमाणे क्लाऊड बेकार झाला आणि फिरत फिरत बगदादमध्ये आला. तिथे त्याला त्याचे फ्रेंच सन्यातले पूर्वीचे वरिष्ठ जीन व्हेंचुरा आणि अलार्ड भेटले. ते दोघे पर्शियन सन्यात नोकरीला होते आणि त्यांच्या शिफारशीने क्लाऊडला पर्शियाच्या सन्यात नोकरी मिळाली. त्यानंतर थोडय़ाच काळात व्हेंचुरा आणि अलार्ड पंजाबात महाराजा रणजितसिंगांकडे लष्करात दाखल झाले.

पुढे १८२७ साली क्लाऊडही लाहोरात महाराजांच्या फौज ए खासमध्ये व्हेंचुराच्या शिफारसीने दाखल झाला. नेपोलियनच्या लष्करातले साधारणत ३० सैनिक महाराजा रणजितसिंगांच्या लष्करात विविध पदांवर नोकरी करीत होते. पण सर्वाधिक शिक्षण झालेला क्लाऊड कोर्ट होता, त्याशिवाय त्याचे भौगोलिक आणि तांत्रिक ज्ञान इतरांपेक्षा अधिक होते. कोणत्याही गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची त्याला उपजत सवय होती. रणजितसिंगांनी क्लाऊडला आपल्या फौजेत प्रथम भरती न करता त्याला भाडोत्री व्यावसायिक सैनिक म्हणून काम दिले.

sunitpotnis@rediffmail.com