डॉ. श्रुती पानसे

शाळेत शिकताना सर्वात जास्त वेळा कोणती गोष्ट करावी लागत असेल तर ती आहे- प्रश्नांची उत्तरं सोडवणं. तेच तेच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारांनी विचारले जातात. कधी कारणं द्या, कधी स्पष्टीकरणं द्या, गाळलेल्या जागा भरा किंवा जोडय़ा लावा. हे सगळे प्रश्न सोडवायचे कसे याच्या उत्तरांचा साचादेखील ठरलेला असतो. त्यात आपलं उत्तर बसवायचं असतं. कधीकधी तर तेवढाही विचार करावा लागत नाही.

आत्ताचं काम सोपं करण्याच्या नादात एकूण आयुष्यभराचं काम मात्र अवघड होऊन बसतं. याची कल्पना कोणालाच येत नाही. भूगोलात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला परिसराच्या भूगोलाचं ज्ञान नसतं किंवा गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्याला बाजारात जाऊन हिशेबाने वस्तू आणता येतातच असं नाही.

वास्तवातले प्रश्न कसे सोडवायचे, खऱ्याखुऱ्या आयुष्यात जे प्रश्न नेहमी पडणार आहेत, त्याची झलक शालेय जीवनात मिळायला हवी. यासाठी जॉन डय़ुई यांनी असं सांगितलं आहे की, जीवनाची खरी ओळख शाळेत व्हायला हवी.

अशी ओळख होण्यासाठी शालेय जीवनातच भरपूर अनुभव मिळायला हवेत. म्हणजे समजा, तुमच्या शाळेच्या बागेतल्या झाडांची पानं अचानक पिवळी पडून गळायला लागली, तर काय करायचं, हा प्रश्न तुमच्यापर्यंत येतो का? शाळेच्या आवारात सायकली लावण्यासाठीची सोय आहे, पण ती जागा आता अपुरी पडू लागल्यामुळे शाळा भरताना आणि सुटताना खूप गोंधळ होतो, तर अशा वेळी काय करावं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडू शकतं का?

या प्रश्नांची उत्तरं तुम्हीही सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला योग्य अनुभवी बागकामतज्ज्ञाकडून त्याची माहिती मिळवावी लागेल आणि तसे उपाय योजावे लागतील. शाळेतल्या किंवा अगदी घरातल्याही व्यवस्थांशी निगडित अशा किती तरी प्रश्नांची उत्तरं आपसात चर्चा करून सोडवता येईल. या खऱ्याखुऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हा मेंदूला व्यायाम आहे. या व्यायामातून मेंदू घडणार आहे.

कागदावर प्रश्नांची उत्तरं सोडवणं हा एक छोटासा भाग झाला. वास्तवातले प्रश्न सोडवता येणं हेच जास्त महत्त्वाचं आहे.

आपल्या प्रश्नांशी सोडवणूक करण्याचा अनुभव आपल्याला मिळतो. जेवढय़ा या न्यूरॉन्सच्या जुळण्या जास्त, तेवढीच आपल्यातली प्रगल्भता जास्त आणि हाच तर शालेय जीवनाचा हेतू असायला हवा.

contact@shrutipanse.com