विश्वामध्ये असे काही पदार्थ आहेत, की ज्यांचा वेध घेता येत नाही. अशा पदार्थाच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा फ्रिट्झ झ्विकी या स्वीस खगोलशास्त्रज्ञाच्या अमेरिकेत केलेल्या संशोधनातून मिळाला. झ्विकीने १९३०च्या सुमारास अरुंधती केश या तारकासमूहातील ‘कोमा’ या सुमारे एक हजार दीर्घिकांच्या समूहाचा अभ्यास केला. गुरुत्वाकर्षणामुळे हा समूह एकत्र बांधला गेला आहे. झ्विकीने या दीर्घिकासमूहातील बाहेरच्या भागातील आठ दीर्घिकांचे निरीक्षण करून त्यांचा वेग मोजला. या दीर्घिका सेकंदाला सुमारे एक हजार किलोमीटर या वेगाने समूहाभोवती फिरताना आढळल्या. समूहातील सर्व दीर्घिकांच्या एकत्रित वस्तुमानानुसार या दीर्घिकांचा वेग सेकंदाला फक्त ८० किलोमीटर इतकाच अपेक्षित होता. यावरून या समूहाचे प्रत्यक्ष वस्तुमान हे दीर्घिकांच्या स्वरूपात दिसणाऱ्या वस्तुमानाच्या चारशे पट असल्याचे अनुमान झ्विकीने काढले. म्हणजेच या दीर्घिकांच्या समूहात ‘न दिसणारे पदार्थ’ मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात होते. त्याने या पदार्थाला ‘कृष्ण पदार्थ’ म्हणून संबोधले. हे संशोधन त्याने १९३३ साली ‘हेल्वेटिका फिजिका अ‍ॅक्टा’ या शोधपत्रिकेत आणि सुधारित निष्कर्ष १९३७ साली ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध केले. कालांतराने अशाच प्रकारचे निष्कर्ष कन्या तारकासमूहातील दीर्घिकासमूहाच्या अभ्यासातूनही काढण्यात आले.

कृष्ण पदार्थाचा सबळ पुरावा १९६०च्या दशकाच्या शेवटी व्हेरा रुबीन आणि केंट फोर्ड यांनी अमेरिकेत केलेल्या संशोधनातून मिळाला. या संशोधकांनी वर्णपटमापक वापरून देवयानी दीर्घिकेच्या परिसरातील हायड्रोजन वायूच्या ढगांचा अभ्यास केला. दीर्घिकेभोवती फिरणाऱ्या या ढगांचा वेग दीर्घिकेपासूनच्या अंतराबरोबर कमी होताना दिसेल अशी त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ढगांच्या वेगात कोणताच बदल दिसला नाही. दीर्घिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर न दिसणारा पदार्थ असेल तरच हे शक्य होते. या पदार्थाचे अस्तित्व केवळ त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून जाणवू शकते. या दीर्घिकेतील वेध घेता येऊ  शकणाऱ्या पदार्थापेक्षा किमान पाच ते दहा पट कृष्ण पदार्थ असावेत, असे गणित मांडल्यावर दिसून आले. १९७० साली हे निष्कर्ष ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’ या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले. झ्विकीने १९३०च्या दशकात मांडलेल्या कृष्ण पदार्थाच्या सिद्धांताचा हा खात्रीलायक पुरावा मानला जातो. विश्वातील एकूण वस्तुमानापैकी ८५ टक्के वस्तुमान हे कृष्णपदार्थाच्या स्वरूपात असल्याची शक्यता संशोधक व्यक्त करतात.

– डॉ. वर्षां चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org