अनेक आदिवासी समाजांमध्ये अगदी सुरुवातीपासून फिरती शेती किंवा स्थानांतरित शेतीपद्धती आढळते. हिमालयातील आदिवासी जमातींपासून बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दक्षिणेतील केरळ, तमीळनाडूतील जमातींपर्यंत ही पद्धत रूढ होती. झूम, दहिया, बेवोर, पेंदा या नावांनी ही पद्धत ओळखली जाते. गडचिरोली जिल्ह्य़ातील बडा माडिया जमातीत लाहेरीपासून कुवाकोडीपर्यंतच्या भागात ही शेतीपद्धती पेंदा या नावाने अस्तित्वात होती.
आदिवासींचा एखादा समूह अरण्यातील एखाद्या भागात विशेषत: डोंगरउतारावर विशिष्ट जागेवरील सर्व झाडे तोडतो. उन्हाळ्यामध्ये ती झाडे वाळल्यानंतर जागच्याजागीच पेटवतात. झालेली राख पावसाच्या सरीबरोबर मातीत मिसळून दलदल तयार होते. नंतर त्यावर बियाणे फेकून देतात. म्हणून या पेरणीला हवेतून प्रसारण म्हणजे ‘ब्रॉडकास्ट पद्धती’ असेही म्हणतात. जमिनीत राख मिसळल्यामुळे तिचा कस उत्तम असतो. त्यामुळे पीक चांगले येते.  
हे आदिवासी सुमारे दोन-तीन वर्षे एकाच जागी शेती करतात. मग थोडे पुढे जाऊन पुन्हा अशीच जंगलतोड करून शेती करतात. असेच फिरत फिरत बारा ते पंधरा वर्षांनी ते पुन्हा पहिल्या जागी येतात. म्हणून त्यास ‘ब्रॉडकास्ट पद्धती’ वा ‘वर्तुळाकार झूम शेती’ असेही म्हणतात. कोदो, कुटकी अशी कनिष्ठ तृणधान्ये यात घेतात. भात पिकेही घेतात. भूमातेला नांगरायचे नाही, तिला कष्ट होतील ही परंपरागत कल्पना या पद्धतीच्या मुळाशी आहे.
प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ प्रो. फ्यूरर हायमेन्डार्फ यांनी म्हंटल्याप्रमाणे या शेतीसाठी कमीत कमी श्रम व साधने लागतात. त्या तुलनेत उत्पादन मात्र जास्त होते. त्यामुळे जेव्हा जमीन मुबलक होती, माणसे कमी होती, तेव्हा ही पद्धत उपयुक्त ठरली असावी. आता मात्र हे प्रमाण उलट झाल्यामुळे शासनाला ही शेतीपद्धत थांबवावी लागली.
१९५९ ते १९६५ या काळात शासनाने या आदिवासींना सपाट प्रदेशात आणून झोपडय़ा व शेतीसाठी जमीन व बलजोडय़ा दिले. काही गावांना पुनस्र्थापित केले. तरी अजूनही दुर्गम भागात हा प्रकार तुरळक आढळतो.
आज स्थिरवस्ती करून राहाणारे आदिवासी स्थिरशेती करू लागले आहेत. यासाठी परंपरागत अवजारांच्या सोबतच आधुनिक ट्रॅक्टरादी अवजारांचा वापरदेखील ते करत आहेत.
– डॉ. प्रशांत अमृतकर (औरंगाबाद)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. मर्म आणि वर्म
एखाद्याच्या वर्मावरच बोट ठेवले असा एक वाक्प्रचार आहे. सजीवाच्या जनुकांचा (Genes) अभ्यास करणे म्हणजे वर्मावर बोट ठेवणे. ती जनुकेच आपले मर्म आहेत बाकीचा डोलारा त्यांच्या मानाने काहीच नाही. मध्ये एका नातेवाईकाचा फोन आला. त्याच्या बायकोचे वय होते ४० आणि तिला आंघोळीच्या वेळी साबण लावताना स्तनात छोटीशी गाठ लागली. ही तडक एका बाइ डॉक्टरकडे गेली. तिलाही संशय आला. ती म्हणाली आपण एक खास प्रकारचा Xray काढू. त्यातही ती गाठ दिसली तेव्हा ती तपासून बघावी असे ठरले. पूर्वी त्यासाठी कापावे लागे हल्ली पोकळ सुई घालून काहीपेशी खेचून घेतात, तसे लगेचच करण्यात आले. त्या पेशींचे लक्षण काही ठीक नव्हते. तेव्हा आता काय करायचे म्हणून फोन आला होता. शस्त्रक्रिया अपरिहार्य होती. पूर्वी सगळा स्तन त्याच्यावरची त्वचा, काखेत जेवढय़ा गाठी असतील तेवढय़ा काढत आणि वर शिवाय क्ष किरणाचा मारा करून तो सगळा भाग एका तऱ्हेने जाळून टाकत असत. आता परिस्थितीत बदली आहे. कर्करोग प्राथमिक अवस्थेत असेल तर थोडाच भाग काढतात वगैरे सांगून मी त्या दोघांची समजूत घातली. Ultra Sound नावाचा शोध हल्ली लागला आहे. यात ध्वनीलहरी सोडल्या जातात शरीरातल्या प्रतिध्वनीवरून पेशी समुहाचे परीक्षण केले जाते आणि आरोपीने किती हातपाय पसरले आहेत हे ठरते. या परीक्षणात गाठ मर्यादित आहे, असे ठरले आणि लहान शस्त्रक्रिया करून स्तन वाचविला गेला. यानंतरच्या गोष्टीने मीही आवाक झालो. त्या गाठीतल्या पेशी परदेशी पाठविण्यात आल्या. मी त्या सर्जनकडे चौकशी केली तेव्हा तो म्हणाला त्या पेशींच्या जनुकांची तपासणी करणार आहे. त्या परीक्षणावरून पुढची पावले उचलता येतील. स्त्रीचे वय काय तिची पाळी चालू आहे का यावर तिच्यातल्या destrogen या द्रव्याचे मोजमाप ठरते. destrogen हे कोठल्या वयात किती बनवायचे हे जनुके ठरवतात. कर्करोगाच्या पेशीतील जनुके जरी destrogen धार्जिणी असतील तर कर्करोग वाढतो कारण त्यांना अनुकूल परिस्थिती लाभते. हे द्रव्य कर्करोगाच्या पेशीतील जनुकावर काय परिणाम करणार आहे हे तापसण्यासाठी म्हणून त्या पेशींची विमानवारी ठरविण्यात आली होती. विज्ञानाने केवढी मोठी छलांग मारली आहे. हे मलाही यानिमित्ताने कळले. या जनुकांचे मोठे वैशिष्टय़ आहे. ती अगदी छोटय़ा जागेत राहतात आणि तरीही कारभार चालवतात. ती मोठी संवेदनशील असतात शरीरात चालणाऱ्या घडामोडी अचूक ओळखतात आणि काबूत ठेवतात; परंतु संवेदनशीलता एक तर्फी नसतेच. शरीरातच नव्हे तर एकंदरच आसमंतात चालणाऱ्या घडामोडींचा जनुकांवरही परिणाम होतो. त्याबद्दल पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस:गंडमाळा – टी. बी. ग्लँड्स
गंडमाळाचे गांभीर्य लोक लक्षातच घेत नाहीत. विशेषत: गरीबवस्तीत यांचे प्रमाण वाढत आहे. गंडमाळा म्हणजे क्षयच. त्यामुळे लहान मुलांची वाढ होणे थांबते. मोठय़ा वयाच्या बायका झिजून झिजून भोगत राहतात. आयुर्वेदात अमरकंद, कांचनसाल, चुन्याची निवळी यापासून ते लक्ष्मीविलास, सुवर्णमालिनी वसंत अशी रंकापासून रावांपर्यंत परवडणारी स्वस्त-महाग, पण निश्चित टिकाऊ स्वरूपाचे काम करणारी खूप औषधे आहेत. ‘पण लक्षात कोण घेतो?’
स्थूल व्यक्तींच्या गंडमाळा विकारापेक्षा कृश व्यक्तींचा गंडमाळा विकार प्राधान्याने हाताळावा लागतो. शरीराचे योग्य पोषण करणाऱ्या आहाराचा अभाव, नेहमी कदन्न, शिळे अन्न, गार अन्न, दूषित अन्नाचा वापर, ताकदीबाहेर श्रम व अपुरी झोप, विश्रांती, प्रदूषित हवा, ओल, कोंदट हवा, अपुरा सूर्यप्रकाश असणारे घर, शरीरात नेहमीच सर्दी, पडसे, खोकला व ताप यांनी ठाण मांडून बसणे, अशी विविध कारणे या रोगाची आहेत. घरात क्षयाची बाधा असणाऱ्या मोठय़ा माणसामुळे लहान मुलामुलींना, स्त्रियांना संसर्गाने हा रोग  नक्कीच पकडतो. या रोगात कानामागून खाली गळय़ाकडे, दोन्ही बाजूस एक वा अनेक लहानमोठय़ा गाठी असतात. नव्याने आलेल्या गाठी प्रथम येतात, जातात व मग स्थिर होऊन कालांतराने वाढतात. अधूनमधून बारीक ताप येतो, पुढे टिकून राहतो. वजन घटते. अनुत्साह, फिकटपणा, दुबळेपणा ही लक्षणे वाढतात.
या विकारात पथ्यापथ्य व औषधांबद्दल तडजोड, टाळाटाळ करू नये, सर्दी, पडसे कधीच होऊ नये, कफ होऊ नये, रुची राहावी याकरिता, पुदिना, आले, लसूण, ओली हळद अशी चटणी, तुळशीची पाने व सुंठ मिसळलेले गरम पाणी न कंटाळता घ्यावे, दीर्घ श्वसन प्राणायाम करावा. थंड, शिळे, बाहेरचे  अन्न व व्यसने टाळावीत. आरोग्यवर्धिनी, लाक्षादि, गोक्षुरादि, कांचनार, त्रिफळागुग्गुळ चंद्रप्रभा इत्यादी प्रत्येकी ३ गोळय़ा दोनदा, सुधाजल-चुन्याची निवळी लाईम वॉटर ४ चमचे याबरोबर घ्याव्या. दहा ग्रॅम अमरकंदचा उकळून काढा घ्यावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत    :    ८ फेब्रुवारी
१८४४ > भाषांतरकार आणि संस्कृतचे व्यासंगी पंडित गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म. ‘नौकानयनाचा इतिहास’, ‘नेपोलियन बोनापार्ट यांचे चरित्र’ याखेरीज ‘संस्कृत ग्रंथार्थसंग्रह’ या मालिकेचे २५ ते ३० खंड आणि ‘आर्यवृत्त’ व ‘व्युत्पत्तिप्रदीप’ हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ.
१९३१ >  कोल्हापुरातून महादेव विठ्ठल काळे यांनी ‘आत्मोद्धार’ या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित केला. या पाक्षिकावर राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचीही छाप होती. महाराष्ट्रातील सत्यशोधकी नियतकालिकांच्या इतिहासात या पत्राचीही गणना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी केली आहे.
१९९४  >  ख्यातनाम इतिहास संशोधक, कवी, कोशकार, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. शाहिरी वाङ्मयाच्या संशोधनाच्या आवडीतून ‘मराठय़ांचा काव्यमय इतिहास’ हा ग्रंथ त्यांच्या हातून साकारला. याशिवाय, ‘वसईची मोहीम’ , ‘ऐतिहासिक शब्दकोश’ हा
ग्रंथ तसेच ‘इतिहासातील सहली’, ‘भुतावर भ्रमण’ ही ललितगद्य आणि काहीशी कल्पनारम्य  पुस्तके तसेच ‘अंधारातल्या लावण्या’ हा लावणीसंग्रह त्यांच्या नावावर आहेत.
– संजय वझरेकर