17 December 2017

News Flash

इंधनसाठा मापक

टाकीतल्या भागात धातूचा दांडीच्या एका टोकावर इंधनावर तरंगणारा एक गोलक असतो

लोकसत्ता टीम | Updated: October 10, 2017 2:45 AM

प्रतिमा सौजन्य : http://blog.autointhebox.com

दुचाकी किंवा चारचाकीच्या टाकीत इंधनाचा किती साठा आहे हे सांगणाऱ्या उपकरणाला इंधनसाठा मापक म्हणतात. हे उपकरण टाकीतल्या इंधनाची पातळी मोजते आणि टाकीच्या आकारानुसार गणित करून टाकीत किती इंधन शिल्लक आहे ते दर्शविते. या मापकाचे दोन भाग असतात.

भाग १ इंधनाच्या टाकीत असतो आणि संदेश पाठवतो म्हणून त्याला प्रेषक म्हणतात; तर भाग २ गाडीत असतो आणि भाग १ कडून येणाऱ्या संदेशानुसार आपल्याला इंधनाची स्थिती दाखवतो, त्याला दर्शक म्हणतात.

टाकीतल्या भागात धातूचा दांडीच्या एका टोकावर इंधनावर तरंगणारा एक गोलक असतो आणि दांडीचे दुसरे टोक एका रोधकावर घासत इंधनाच्या पातळीनुसार वर-खाली होत असते. या रोधकातून विद्युतप्रवाह अशा रीतीने पाठविलेला असतो की रोधक आणि गोलकाला जोडलेली दांडी यांच्यामधून एक विद्युतमंडळ पूर्ण होईल. टाकीत जेवढे इंधन जास्त तेवढी त्याची पातळी जास्त आणि तेवढा या विद्युतमंडळातील विद्युतरोध कमी आणि जेवढी पातळी कमी तेवढा रोध जास्त. म्हणजेच जेवढी पातळी जास्त तेवढी भाग क्र. २ ला जाणारी विद्युतधारा जास्त आणि जेवढी पातळी कमी तेवढी विद्युतधारा कमी.

भाग २ म्हणजे दर्शकाची रचनाही सोपी असते. भाग १कडून येणारी विद्युतधारा एका जोडधातूच्या (बायमेटॅलिक) पट्टीमधून जाते. या विद्युतधारेमुळे या पट्टीत उष्णता निर्माण होते आणि दोन्ही पट्टय़ा प्रसरण पावतात; पण हे दोन धातू भिन्न असल्यामुळे त्यांचे प्रसरण असमान होते आणि पट्टी वाकते. जेवढी उष्णता जास्त तेवढे प्रसरण जास्त म्हणजेच तेवढा पट्टीला बाक जास्त. या जोडधातूच्या पट्टीचे टोक आपल्या समोरच्या दर्शकाच्या काटय़ाला जोडलेले असते. जेवढा पट्टीचा बाक जास्त तेवढा काटा जास्त फिरतो आणि आपल्याला इंधन टाकी त्या प्रमाणात भरलेली असल्याचे दाखवतो. जसजशी इंधनाची पातळी खालावते तसतसा विद्युतप्रवाह कमी होतो आणि काटा हळूहळू टाकी रिकामी होत चालल्याचे दाखवतो.

आजकालच्या नवीन गाडय़ांमध्ये भाग २मध्ये एक सूक्ष्मप्रक्रियक (मायक्रोप्रोसेसर) म्हणजे छोटा संगणक असतो. हा इतरही काही कामे करतो. इंधन एका ठरावीक पातळीखाली आले की एक इशारादर्शक छोटा दिवा प्रकाशमान करतो. तसेच दर्शक काटय़ाच्या प्रणालीला अवमंदन (डॅम्पिंग ) करून काटा सरासरी पातळीवर स्थिर ठेवतो.

शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

राजेंद्र शाह यांचे  काव्यसंग्रह

गांधीयुगानंतरच्या ज्या कवींनी युरोपीय रोमँटिसिझमची नवी वळणे गिरवली, त्या गुजराती कवींमध्ये राजेंद्र शाह यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

‘निरुद्देशे’ ही त्यांची अतिशय गाजलेली कविता आहे. यात कवी स्वत:विषयी बोलतो आहे. गुजरातीत ज्याला ‘निजानंदी’ कवी म्हणता येईल. कोणत्याही ‘इझम’चा त्यांच्यावर प्रभाव नाही. स्वत:वर आणि जीवनावर पूर्ण विश्वास असणारा हा कवी आहे आणि या दृष्टिकोनातूनच निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंवादी नाते मांडताना ते म्हणतात –

संसारी माझे मुग्ध भ्रमण निरुद्देश

धूळ भरलेला वेश

कधी मला वेढुनी घेई

मोहक पुष्पगंध..

कधी मला साद घाली

मधुर कोकिळ कंठ..

खुलावती नेत्र, पाहता

येथले अवघे रंग..

मीच विहरतो सर्वासंगे..

माझाच राही अवशेष’

राजेंद्रजींच्या चिंतनशीलतेचा प्रत्यय त्यांच्या ‘आयुष्यना अवशेषे’ या दीर्घकवितेत येतो. १९७८ मध्ये ‘कुमार’ या नियतकालिकात ती प्रथम प्रसिद्ध झाली. यामध्ये ‘घराकडे’ (घरभणी), प्रवेश, स्वजनांची स्मृती, परिवर्तन आणि ‘जीवनविलय’ या पाच सुनीतरचनेमध्ये त्यांचा वैचारिक, लौकिक, आध्यात्मिक प्रवास त्यांनी मांडला आहे. आपल्या जीवनाची प्रक्रिया उलगडत आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न या कवितेत दिसतो. कधी काळीच्या भरल्या घराचे आजचे सुनेसुने रूप तरलपणे व्यक्त करताना ते म्हणतात –

भरल्या घराच्या, सुन्या धूळ भरल्या अंगणात

उरलेल्या आयुष्याचं चिमणं गाठोडं ठेवलं

तिथल्या धुरकटलेल्या विषण्ण प्रकाशाची

रक्तरेघ उमटली आकाशात,

जागवत अनुकंपेच्या दिशा’

अशाप्रकारे पाच सुनीतामध्ये प्रतिमांच्या भाषेत बोलणारी ही कविता, बालपणापासून वृद्धत्वाकडे झुकलेला आयुष्याचा पट चित्रित करते. सुरुवातीची व्याकूळ अवस्था हळूहळू बदलत जाते. अशाप्रकारे विविध टप्पे असले तरी आयुष्याचा शोध घेणारी ती एकसंध, एका सूत्रात बांधलेली कविता आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on October 10, 2017 2:45 am

Web Title: fuel capacity measures fuel tank