मुक्त गॅलिअम निसर्गात मिळणं कठीणच. गॅलिअमची संयुगं जास्त प्रमाणात असतील, अशी खनिजंही नाहीत. बॉक्साइटमध्ये (अ‍ॅल्युमिनिअम जास्त प्रमाणात असलेलं खनिज) काही प्रमाणात गॅलिअमची संयुगं मिळतात. बॉक्साइटमधील अ‍ॅल्युमिनिअम वेगळं करताना गॅलिअमही वेगळं करून मिळवलं जातं. जस्ताच्या स्फॅलेराइट या खनिजामध्येही गॅलिअम मिळतं, पण अगदी कमी प्रमाणात. गॅलिअमचे जागतिक वार्षिक उत्पादन अगदीच कमी आहे. २०१६ मधील अंदाजानुसार कमी प्रतीच्या गॅलिअमचे जागतिक  उत्पादन प्रतिवर्ष फक्त ७३० टन आहे. यातून ३२० टन शुद्ध गॅलिअम आणि २७० टन दुय्यम प्रतीचं गॅलिअम मिळतं.

गॅलिअम इतर धातूंशी सहज मिसळला जातो. त्याचे संमिश्र बनवायला सोपे असले तरी त्यामुळे मूळ धातूच्या गुणात विशेष सुधारणा (बदल) होत नाही. उच्च तापमानास गॅलिअमच्या संपर्काने बहुतेक सर्व धातू ऱ्हास पावतात. या दोषामुळे आणि किमतीने महाग असल्यामुळे गॅलिअम धातू प्रयोगशाळेखेरीज इतर ठिकाणी विशेष वापरला जात नाही. गॅलिअमची काही संमिश्रे अगदी कमी तापमानाला वितळू शकतात.

गॅलिअम, इंडिअम आणि कथील यांचे संमिश्र वैद्यकीय तापमापीमध्ये वापरलं जातं. या संमिश्राला गलिस्तान असं म्हटलं जातं. त्याचा वितळणांक पाण्यापेक्षाही कमी आहे. दातात भरण्यासाठी पाऱ्याच्या संमिश्राऐवजी गॅलिअमच्या संमिश्रांना प्राधान्य दिलं जातं.

गॅलिअमचे बरेचसे उपयोग प्रायोगिक स्वरूपाचे आहेत. उच्च तापमान मोजणाऱ्या तापमापकातील द्रव म्हणून या धातूचा उपयोग करतात. आस्रेनाइड, फॉस्फाइड, टेल्यूराइड, सेलेनाइड या स्वरूपांत अर्धसंवाहक म्हणून त्याचा उपयोग करण्यात येतो.

अतिशय उच्च शुद्धतेच्या गॅलिअमला अर्धसंवाहक पदार्थ बनवणाऱ्या व्यवसायांमध्ये जास्त मागणी आहे. गॅलिअम आस्रेनाइड आणि गॅलिअम नायट्राइड या संयुगांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये केला जातो. अ‍ॅल्युमिनियम गॅलिअम आस्रेनाइड (अलगॅस) हा हाय-पॉवर इन्फ्रारेड लेझर डायोडमध्ये वापरला जातो. इंडिअम गॅलिअम नायट्रेटचा वापर ऑप्टोइलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो. गॅलिअम हा प्रकाशाचा अतिशय उत्तम परावर्तक आहे.

उपग्रहाला ऊर्जा पुरवण्यासाठी असलेल्या फोटोव्होल्टिक सेलमध्ये गॅलिअम आस्रेनाइड, इंडिअम गॅलिअम फॉस्फॉइड किंवा इंडियम गॅलिअम आस्रेनाइडचे पातळ थर लावले जातात. गॅलिअमच्या कॉपर इंडिअम गॅलिअम सेलेनियम सल्फाइड या संयुगाचा वापर सिलिकॉनचा पर्याय म्हणून केला जातो.

चारुशीला सतीश जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२  

office@mavipamumbai.org